भल्या पहाटे एक सिद्ध पुरूष डोळे मिटून समाधिस्थ बसला आहे. न जणो गेली कित्येक वर्ष असा असेल. वाढलेल्या जटा त्याच्या सिद्धतेचा पुरावा देणाऱ्या. कोरीव चेहरा, सावळा काळा रंग, भव्य कपाळ, दाढी मिशांमध्ये झाकलेल्या जखमांच्या खुणा, भक्कम शरीर त्याच्याकडे नजर खिळवून ठेवतात. गळ्यातील मुंडक्यांची माळ थोडी विचित्र भीती निर्माण करून झाते. एखादे भयंकर युद्ध खेळून येउन प्रलय, विनाश आणि संहार या त्रिशूळाला शांत करत आहे असं वाटतं.
क्षितिजाला चिरत एक वीज चमकून जाते आणि तो डोळे उघडतो. काळाच्या पलीकडे पाहणारे त्याचे ते तांबूस डोळे थेट हृदयाचा वेध घेतात . करारी पण शांत डोळे. समाधानी नजर, पण प्रलयानंतरच्या शांततेचं प्रतीक असलेली. हातात त्रिशूळ घेउन तो उभा राहतो तेव्हा अख्खी सृष्टी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असं वाटतं. समुद्राची शांतता आणि उग्रता दोन्ही त्याच्या मूर्तीत सामावलेल्या दिसतात. त्याची पूर्व क्षितिजावर नजर जाते. जणू सूर्याला उगवायची संमती देत आहे अशी. सूर्य नारायण देखील आपली पहिली किरणे त्याच्या चरणी अर्पण करतात. आशीर्वाद देऊन, मंद स्मित करून हा सिद्ध पुरूष अंतर्धान पावतो. सृष्टीची नांदी करून गेल्यासारखा. माझे डोळे मिटतात. समाधानाने ओले होतात. अस्तित्वाला आशीर्वाद देणाऱ्या त्या सिद्ध पुरुषाला मी मनोमन वंदन करतो. सृष्टी आणि विनाशाची काळात गुम्फ़ण करणारा हा भैरव. कोटी कोटी प्रणाम.
No comments:
Post a Comment