Pages

Monday, August 17, 2015

अंदाज

मी स्वतःशी बोलताना सागराचा भास झाला
लाट आली एक अन माझा मला अंदाज आला

स्वप्न होते की कुणाचे मिथ्य होते वास्तवाचे
जन्म घेण्याचा पुरावा सत्य पाझरता मिळाला

पेलतो डोळ्यात ताकद हिकमती माझ्या ऋतूंची
सांगतो सूर्यास देखिल रोख तू करड्या उन्हाला

सोडुनी गेले पुजारी, भक्त सारे अन भिकारी,
राहतो कंटाळलेला देवही तेथे कशाला ?

वाहुनी नेले किनारे , धार ती कोठून आली
पाट म्हटलो मी जया तो पूर अश्रूंचा निघाला
 

गाज ऐकुन एकदा , म्हटले पहावे कोण आले
सावली माझीच अन आवाजही माझाच आला


--आदित्य 



Thursday, August 13, 2015

क्षितिजाच्या पलीकडे

मला क्षितिजाची  सीमा नव्हतीच कधी. मी त्याच्या पलीकडला आहे. आणि तिथेच जाणार अहे. एवढी छोटी बंधनं मला अडकवू नाहे शकत.  इथे जेव्हा आलो तेव्हा क्षितिजाची पायरी ओलांडून स्वैर धावलोय, खिदळलोय. माझ्या सावलीशी खेळलोय. मला इथे सावली मिळते. माझ्या बाह्यजगात सावली नाही. मीच माझा प्रतिनिधी. इथे वावरताना इथल्या मायेमध्ये कसा अडकलो तेच कळल नाही. पण आता मला बाहेर जायचय . क्षितिजाच्या पलीकडे!

---आदित्य

कर्तृत्वाचा कोण दिखावा!

कर्तृत्वाचा कोण दिखावा करता येतो!
जन्मही आता ठरवुन आम्हा घेता येतो

दु:ख मुळी तू करू नको कोणी मेल्याचे
प्रेतामध्ये जीवही अता भरता येतो

भाव लागतो सध्या भगवंताचा देखिल
खिसा तयाचा अभिषेकाने जिंकता येतो

रक्ताच्या नात्यात असूदे वा मैत्रीच्या
कोणाचा विश्वास कसाही विकता येतो

बेशरमीचा घेत कुंचला उजळपणाने
राजरोस झेंड्याचा रंग बदलता येतो

घरे बदलुनी कुंडलीतल्या दुष्ट ग्रहांची
नियतीचाही डाव पुरा उलटवता येतो

---आदित्य 

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही
अश्या  तुझ्या दानाचा काहीच उपभोग नाही
रिकामा आलास तू आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून

कुठे जाउन आलास की नव्हतच काही द्यायला?
वेळ झाली म्हणून आलास अणि चाललास पुन्हा पोट भरायला
तुझी जमीन तुझी वाट पाहते आहे
कधीतरी येशील अणि मन मोकळ करशील याची
भरभरून येशील आणि चिंब भिजवशील याची

पण तू तर रिकामा आलायस आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून…….
अश्या तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही!

 ---आदित्य 

एक मुसाफिर

एक मुसाफिर वक्त से आगे निकलकर जी गया
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया । 
 
हम नही रोयेंगे ये वादा किया था आज लेकिन
आसमाँ शामिल न था इसमे,  बिचारा रो गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

संगदिलोमे आपका चलता रहेगा कारवाँ
एक सूरज आज बस यूँ मुस्कुराहते ढल गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

---आदित्य 

कर्ज

क्षणाक्षणाला श्वास उरातुन भरतो आहे
असे कोणते कर्ज फेडण्या जगतो आहे

हात पसरुनी जगणारा नशिबाचा कैदी
भीक मागुनी रोज नव्याने मरतो आहे

सहवासाचे तेल संपले तुझे नि माझे
दिवा तरीही हृदयामधुनी जळतो आहे

सवय जाहली आहे अश्रूंना दु:खांची
उगी कोणता थेंब बरे हा रडतो आहे?

मुक्त जाहलो जरी माझिया शरीरामधुनी
तरी वाटते आहे थोडा उरतो आहे

श्रावणातल्या ओल्या प्रेमाला मुकलेला
ढगांतला पाउस कोरडा झरतो आहे

--आदित्य