Pages

Monday, August 17, 2015

अंदाज

मी स्वतःशी बोलताना सागराचा भास झाला
लाट आली एक अन माझा मला अंदाज आला

स्वप्न होते की कुणाचे मिथ्य होते वास्तवाचे
जन्म घेण्याचा पुरावा सत्य पाझरता मिळाला

पेलतो डोळ्यात ताकद हिकमती माझ्या ऋतूंची
सांगतो सूर्यास देखिल रोख तू करड्या उन्हाला

सोडुनी गेले पुजारी, भक्त सारे अन भिकारी,
राहतो कंटाळलेला देवही तेथे कशाला ?

वाहुनी नेले किनारे , धार ती कोठून आली
पाट म्हटलो मी जया तो पूर अश्रूंचा निघाला
 

गाज ऐकुन एकदा , म्हटले पहावे कोण आले
सावली माझीच अन आवाजही माझाच आला


--आदित्य 



No comments: