Pages

Wednesday, July 18, 2018

तुझ्या फुलांचे अत्तर

सये तुला मी निरोप देताना डोळे पाणावुन गेले
तुझ्या फुलांचे अत्तर माझ्या श्वासाशी रेंगाळुन गेले

थिजले होते पाय तिथे त्या जागेवरती तू जाताना
किती न जाणो क्षण तैसे नजरेतुन सारे सांगुन गेले

अनेकदा मी आवरले हुंदके नाटकी हसता हसता
फुटला नंतर बांध केवढे मळभ शेवटी वाहुन गेले

कितीकदा वाटले म्हणावे 'थांब, सोडुनी नकोस जाऊ'
कधी वेळ तर कधी धीर नव्हता नि सांगणे राहुन गेले

अता कधी भेटशील तू या प्रश्नाचे काहूर मनाशी
विरहाच्या वणव्यातिल आगीमधुनी राती जाळुन गेले

तुला धाडले पत्र एकदा पत्ता ठाऊक नसतानाही
कुठूनसे मग दोन पारवे तुझी खुशाली सांगुन गेले

पुन्हा चालतो एकटाच मी जुन्या रोजच्या रस्त्यावरूनी
पुन्हा तुझ्या वळणावर भासाचे मृगजळ मज चकवुन गेले

वळून तू बघताना मागे उलगडला पट अपुला सारा
आठवणींतिल रंग नेमके चित्र आपुले काढुन गेले

आदित्य

Tuesday, July 17, 2018

चल होऊया पाऊस आपण

चल होऊया पाऊस आपण
तू माझा हो तसा तुझा मी
भिजवू आणिक भिजून जाऊ
एक होऊनी अंतर्यामी

चल होऊया समुद्र सरिते
मधील नाते विरघळणारे
एकमेकांत मिसळू दोघे
सौख्याने उजळून किनारे

चल खेळूया इंद्रधनूच्या
रंगांसंगे क्षितिजावरती
रंग देऊनी अपुला त्यासी
उधळू आनंदी बरसाती

चल होऊया मित्र नव्याने
मैत्रीचा मृदगंध दरवळू
व्यापुन सारा आसमंत
नवचैतन्याच्या सरी झरू

चल होऊया दोघे ओले
न्हाऊन हिरव्या रंगामधुनी
निथळू दे अंगावर पाणी
चहूकडे आभाळामधुनी

चल होऊया टिपटिपणाऱ्या
थेंबांचा आवाज अनामी
तू माझ्या प्रेमाची झरझर
कोसळता पाऊस तुझा मी

आदित्य

Monday, July 16, 2018

अदृश्य अश्रू संचिताचे

अदृश्य अश्रू संचिताचे हासुनी मी गाळतो
भेगाळल्या मातीत माझे बी सुखाचे पेरतो

जे जे मिळाले ते स्वतःचे मानले अन भोगले
जे जे कधी नव्हतेच माझे, अर्घ्य त्याचे सोडतो

वाटेतले काटे अता गालातुनी हसती मला
की मी अजूनी थेट अनवाणीच त्यांना भेटतो

माझ्याच कुठल्या अपयशाचे भूत वेताळापरी
पाठीवरी घेउन तयाचे रोज ओझे वाहतो

अंधार सध्या वाटतो मज सोबती माझा सखा
माझ्या चुकांना, वेदनांना तोच केवळ झाकतो

प्रत्येक जन्मी धावतो बघण्या यशाची पायरी
विश्राम मी घेतो मधे अन तोच मृत्यू गाठतो

काळोख रात्री वेदनांचे टोचणारे पुंजके
माझेच मानुन मी तयांचे बोचणे कुरवाळतो

आदित्य

Monday, July 2, 2018

वास्तवातला पाऊस

आकाशातील घन मनकवडा
तृषार्त हृदयी चिंब बरसतो
वास्तवातला पाऊस नकळत
स्वप्नांमध्ये रोज झिरपतो

आभाळाचे पुसून काजळ
टिपूस गळती खाली जैसे
डोळ्यांमधला मेघ अचानक
चंद्र चांदण्यातुनी उतरतो

कधी घेउनी येतो वादळ
थेट धडकतो घरास माझ्या
कधी घालुनी हळूच फुंकर
वेदनेस माझिया हसवतो

ओले असुनी दिवस जाळतो
वेदनेतल्या आगीमधुनी
आणि कोरड्या राती देखिल
जागुन डोळ्यांतुनी भिजवतो

आज अपेक्षा, उद्या उपेक्षा
असूनही आशेचा मोहर
रोज नव्या अश्रूंच्या ठायी 
अंधाऱ्या रातीस बहरतो

पाऊस राती काजळवाती
लावून ओल्या चांदण्यामध्ये
मंतरलेला चंद्र पावसामध्ये
मिसळुन मंद उजळतो

घेऊन येतो पाऊस काही
स्मृतींस माझ्या तुझ्या सोबती
पाऊस सरता ओलाव्याचा
भास तेवढा मागे उरतो

आदित्य