एका अदृश्य दोरीवरून
डोंबारी चालतो आहे,
डोक्यावर एक गाठोडं घेऊन.
त्याचं ओझं पेलून.
एकीकडे जन्म, एकीकडे मृत्यू.
एकीकडे अंधार, एकीकडे प्रकाश.
या द्वंद्वात , स्वतःचा आणि जगाचा
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे
नावाला एक काठी आहे हातात.
तोल गेला तर आधार द्यायला.
पण जिथे थांगच नाही दोन्ही बाजूंचा
तिथे ती टीचभर काठी
फक्त एक उपचार म्हणून
वागवायची आयुष्यभर.
कदाचित टेकेल आणि वाचवेल,
या एक तुटपुंज्या आशेवर ,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे
दोरी कधी संपली तर ..
पाऊले आपली चुकली तर..
नुसत्या प्रश्नांनीच भीतीची वीज चमकते.
अन मग दिसतात .....
अंधारातले घुबडांचे डोळे!
चमकणारे, जणू पूर्वजांची पिशाच्चे
मानगुटीवर घेऊन फिरणारे!
केविलवाणे हसून त्यांच्या ....
हजार जिभांनी आलेले
प्रश्नांचे विषारी बाण
डोंबारी सहन करतो आहे.
जखमांकडे दुर्लक्ष करत,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे
त्याला कधी वाटतं संपवावं सगळं .....
द्यावं झोकून आणि जावं मृत्यू च्या कुशीत.
पण गाठोड्याची जाणीव होताच
पाय कापू लागतात.
कधी काचा, कधी काटे.
कधी विंचू कधी निखारे.
काहीही वाटेत आलं तरी...
पुढे चालू लागतात.
पर्यायच नसतो काही.
पुढच्या जन्माची स्वप्नं बघत...
असे गेले कित्येक जन्म
त्याच अदृश्य दोरीवरून,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे.
डोक्यावर एक गाठोडं घेऊन.
त्याचं ओझं पेलून,
तोल सांभाळत डोंबारी चालतो आहे.
आदित्य