Pages

Monday, January 31, 2022

तुकडे तुकडे

तू हरवलास की मीच हरवले होते
अन् श्रावणात ही धुंद बहरले होते

स्वप्नात काय तू फुंकर घालुन गेला,
बागेत फुलांनी स्वर्ग सजवले होते

त्या आठवणीची वीज लकाकत जाता
आषाढ घनाचे मेघ बरसले होते

मी तुझ्या तेवढ्या एका हाकेवरती
बाकीची नाती पूर्ण विसरले होते

क्षितिज ठेंगणे वाटत होते मजला,
काय न जाणो असे गवसले होते

मी जोडत असते तुकडे तुकडे आता,
या डोळ्यांतील जे स्वप्न विखुरले होते 

आदित्य

Friday, January 28, 2022

शब्द डोळ्यांत दाटले

काळजातल्या जखमांना मोकळे वाटले
ओठावरचे शब्द जसे डोळ्यांत दाटले

बोलुन गेल्या स्मृती जशी सत्याची भाषा
भावनांतले समुद्र खोटे पूर्ण आटले

अंधाऱ्या डोहात निरंतर मूक बापड्या
दुःखाचे निर्माल्य आसवांतुनी साठले

उभारलेले श्रध्देने मी देउळ जे जे
देव त्यातले दुनियादारी करुन बाटले

उधळुन गेले शब्दांना नियतीचे वादळ
अन् पुस्तकातले तुझे तेवढे पान फाटले

स्वप्ने ठरली वाळू मधले महाल माझे
लाटांनी ते विरता पुन्हा नवे थाटले

जगताना सापडले नाही क्षितिज जे कधी
मरता कोणी पैलतिरी ते सहज गाठले

आदित्य

Saturday, January 22, 2022

पैलतीरी वाट पाहे

पैलतीरी वाट पाहे चेहरा भव संभ्रमाचा
अंतरी दररोज चाले खेळ सारा सावल्यांचा

संपता संपेचना वहिवाट पायाखालची अन
दूर जाई रोज थोडा वेध माझ्या मंदिराचा

कोण जाणे कोणत्या जन्मांस मी भोगून आलो
अन् किती जन्मांस अजुनी डाव आहे भोगण्याचा?

घोटला कित्येक वेळा जाणिवांचा श्वास माझ्या
शेवटी ज्वालामुखी उद्रेक झाला संगराचा

लागले आहे मनातुन प्रेम ओहोटीस आता
एकदा भरतीस यावा प्रीत सागर भावनांचा

रोज मी श्रीमंत होतो जाणता ‘ मी मर्त्य आहे!‘
रोज मी मार्गस्थ होतो देह यज्ञी तर्पणाचा

शेवटी ऐसे निघाले फूल सोडूनी तरुला
गंध मागाहुन निरंतर तेथ उरला अत्तराचा

आदित्य



Wednesday, January 5, 2022

निमित्त काही लागत नाही

उगाच काही खुळी कारणे सांगत नाही
तुला भेटण्या निमित्त काही लागत नाही

रोज नवे क्षण जुळूनी यावे तुझे नि माझे,
जुन्या आठवांवरी अताशा भागत नाही

काळ थिजूनी जातो तुझिया सोबत असता
मीच हरवतो असा की पत्ता लागत नाही

पाऊस येतो असा अवेळी मधेच अपुल्या
श्रावणही मग श्रावणापरी वागत नाही

तुझा किनारा अखंड लाभो या लाटांना
समुद्र माझा दुसरे काही मागत नाही

श्र्वासांची येतात जुळूनी गीते माझ्या
शब्दांना शोधावे आता लागत नाही

आदित्य