Pages

Tuesday, October 6, 2009

युगे उलटली

युगे उलटली शतकांवरती
कधी  सूर्य थांबला नाही
स्थैर्य जीवनी इतुके वेड्या
फुका कशा तू शोधू पाही

गात्रे गाळुन झाड़ बोडकी
पान फुलांचे सडे सांडती
वसंतात परि लगडे वैभव
कुणी किमया केली काही?

जलधारा मग बरसून जाती
बीज अंकुरे अवनी पोटी
गार बोचरा वाहे वारा
खन्ड तया कधी पडला नाही

तुडवून वाटा मागे जाती
रेघा हाती मार्ग दावती
कुणा म्हणावे मार्ग आपुला
वळल्याविण कधी कळले नाही

कुणा लाभली माणिक मोती
कुणा नशिबी राख नि माती
कुणी बांधली बंगली मोठी
कुणास साधे छप्पर नाही

चालत राहणे धर्मं मानुनी
रस्ते वाटा पुन्हा शोधुनी
जगण्याइतके मोल सांग तू
कशास मोठे लागुन राही

----------आदित्य देवधर

No comments: