Pages

Friday, October 30, 2009

वेल

              स्मिता आज खुश होती. तिला बाग़काम करायला परवानगी मिळाली होती. थोडक्यात, चिखल आणि  घाण करायची परवानगी.ती तिची बाग़ परसातल्या विहिरीच्या डाव्या अंगाने कुंपणापर्यंतच्या जागेत करणार होती. बागेतालं मुख्य आकर्षण होतं ..वेल. जुईची वेल. तिने वेलीची जागा पण पक्की केली होती. तिच्या बागेला लागूनच दोन  भिंती होत्या . पडझड झाली होती त्यांची. पण तिला त्या आवडायच्या. तिथेच त्यांना ती जुईची दुलई घालणार होती.  खरंतर त्या भिंती घरच्यांना नकोशा झाल्या होत्या. ते आधीचं बखल्यांचं जुनं घर होतं.   लातूरला ते आणि त्यांचे पूर्वज गेली किमान दीडशे वर्ष तरी राहात होते. त्या त्यांच्या जुन्या घराचे अवशेष शिल्लक होते फक्त. गेल्या महिन्यातच पावसात एका भिंतीचा टवका उडाला होता. त्यामुळे 'तिथे काही उपद्व्याप करू नको' असं बाबांनी तिला बजावलं होतं.
               एका रविवारी स्मिता बाबांबरोबर जाऊन काय काय घेउन आली. बागकाम  साहित्य, तुळस, चाफा, गुलाब, आणि जुईची वेल. बागेचं एकदम साग्रसंगीत 'वेल- कम' झालं. रोपं ठरलेल्या ठिकाणी लागली. त्यांचे बोर्ड लागले. जेव्हा  वेल पडक्या भिंतीवर लावायची नाही असं बाबांनी तिला सांगितलं. मग मला बागच नको म्हणून स्मिता हट्ट करून  बसली. म्हणाली 'वेल भिंतीवर लावायची नसेल तर बाकीची रोपं काढून टाकते. तुम्हीच लावा हवी तिथे.' बरेच रुसवे फुगवे झाले. समजावून झालं. पण स्मिताला ती भिंतच आवडली होती. तासाभाराच्या असल्या कार्यक्रमानंतर..,  स्मिता जिंकली. लगेच डोळे पुसून ती गेलीसुद्धा बागेत. तिची बाग़ आता तिला हवी तशी फुलणार होती.
               सात-आठ  महिन्यात वेल चांगलीच वाढली होती. हिरव्या हिरव्या नाजुक साजावर जुईने सुंदर बारीक नक्षीकाम केलं होतं . परसात जुईच्या मंद वासाने कायमचं घर केलं होतं.  घरच्यांनाही कौतुक वाटत होतं. पडक्या भिंतीचा काहीतरी उपयोग झाला होता. इतर रोपंही छान वाढली होती.तुळस रोज गुलाबाशी गप्पा गोष्टी करत होती आणि जुई नियमाने सडा घालत होती. स्मिता या सगळ्यांची नीट काळजी घ्यायची  .सगळं स्वत:च करायची. बागेत तिने काही नवीन मंडळींना ही बोलावून घेतले होतं. जास्वंद आणि चाफ़्यामुळे परसाला अजुनच शोभा आली होती.  जुनी, नकोशी वाटणारी जागा आता घरचे रोज कौतुकाने पाहात होते. वेल तर भिंतीला अशी चिकटून होती की एखादी नातलगच असावी. वेलीला भिंत आवडली असावी. जुनी असली तरी. तिच्यात मायेचा एक ओलावा होता . वेल त्यावर टरारून वाढत  होती. स्मिता खूप खुश होती या सगळ्यामुळे.  
               काही महिन्यांनी बखले कुटुंबिय पाच- सहा  दिवसांसाठी कोल्हापुरला जाणार होते. स्मिताच्या मावस बहिणीच्या लग्नासाठी.  एक दिवस अगोदर स्मिता दोन अडीच तास नुसतीच  बागेत बसून होती. बागेतल्या सगळ्यांशी तिने गप्पा मारल्या. पुढचे पाच दिवस तिला तिच्या बागेत घालवता येणार नव्हते.  शेजारच्या काकुंना सांगुन ठेवलं होतं  तिने, कसं आणि कधी पाणी घालायचं ते. आपल्या बागेचं आता कसं होणार असं तिला वाटत होतं.
                   तिला काही कळलं होतं की काय कोणास ठाउक. बखले कोल्हापूरहून परत यायच्या एकच दिवस आधी लातूरला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. खूप नुकसान झालं होतं. घरं, रस्ते खचले होते. अनेकांचे प्राण गेले होते. या प्रकारामुळे स्मिता दोन पाच दिवस उशीराच आली. त्यांच्याही घराचं खूप नुकसान झालं होतं. स्मिता आल्या आल्या रडत रडत धावत परसात गेली. शेजारच्यांची दोन झाडं बखल्यांच्या विहिरीवर  पडली होती. तिच्याही बागेतली झाडं पडली होती. रोपांची नासधूस झाली होती.  तिचं लक्ष वेलीकडे गेलं. ती आनंदाने, आश्चर्याने भिंतीकडे बघत राहिली  . एवढ्या सगळ्यामध्ये ती तशीच शांतपणे उभी होती, वेल अंगावर चढवून. वेलीने भिंतीवर काय जादू केली होती! वेल तिला अशी बिलगली होती की भिंत पडू नये म्हणून घट्ट पकडून ठेवल्यासारखी.   तिची वेल आणि भिंत दोन्ही सुखरूप होत्या. तिचा साज कोणीही टरकवला नव्हता. तिचा गंध अजुनही तसाच प्रसन्न होता.आगंतुकाचं स्वागत करणारा. स्मिताही लगेच  भिंतीला जाऊन बिलगली. तिचं डोळ्यातलं पाणी कुठल्याकुठे पळालं होतं. वेल मायेने स्मिताला जवळ घेत होती. स्मिताही त्या वेलीच्या कुशीत दु:ख विसरली  होती.  भिंत तशीच उभी होती. या भूकंपाला ती बधणार होती थोडीच!!! तिला वेलीची  काळजी घ्यायची होती. गेली कित्येक वर्ष ती हे काम चोख करत आली होती.

--आदित्य
        

No comments: