Pages

Friday, October 30, 2009

चित्रात रंगले

चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने
फूल उमलले होते पिवळ्या सोनसकाळी हर्षाने

पूर्वेकडुनी धावत होती लक्ष लक्ष किरणांची स्वारी
घेउन अपुल्या संगे छाया कोवळी तरतरीत न्यारी
फूल फूल  हासले  होते त्या छायेच्या अंगाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने

किती रंगांची जमली मैफल वसुंधरेच्या ठायी
हिरव्या पिवळ्या पदरावरती काठ मोरपिशी वाही
केशर हलके  मिसळून जाई  बुट्ट्यांमधुनी नवख्याने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने

निळ्या किनारी करडा दगडी घाट सजवला होता
तीवर हिरवा गार गालिचा सुबक ठेवला होता
नाव नेटकी उभी पाहिली नदीकिनारी डौलाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने

खेळत होती लाट स्वच्छ हळुवार किनाऱ्यावरती
तुषार उडवत अल्लड अवघे अवती भवती
रांगोळीही क्षितिजावरती रंगवलेली कुंकवाने
चित्रात रंगले होते अवघे रंग तुझिया स्पर्शाने

---------- आदित्य देवधर

No comments: