Pages

Friday, October 29, 2010

मनातल्या मनात

मनातल्या मनात पावसास वाटले
ढगास बोलवोन कोसळून टाकले
उद्या कधी मिळेल मोकळे वहावया
म्हणोन आजच्या पुरात धाय मोकले

मनातल्या मनात चांदणे शहारले
निवांत शांत मंद रातिला किनारले
टिपून चंद्र ओघळून येत चंद्रिका
मनात कोप-यात प्रेमभाव दाटले

मनातल्या मनात रंग धुंद होऊनी
प्रकाशती मिळून कोवळ्या फुलांतुनी
झणी उभारली अजोड रंगसंगती
घरी बहार आणली तयांस चोरुनी

मनातल्या मनात सांजवेळ नांदली
दिशादिशांमधून प्रीत तार छेडली
समस्त प्रांगणी मधूर सूर भारले
तुला उभी स्वत: समोर धुंद पाहिले

मनातल्या मनात सागरा तुझ्यासवे
निघून दूर जायचे, जगायचे नवे
बुडून जायचे असेच खोल आतुनी
बघायच्या नव्या दिशा नि चेहरे नवे

---- आदित्य देवधर

Thursday, October 28, 2010

तुला काय त्याचे

मनी लाविले मी दिवे अत्तराचे तुला काय त्याचे!!
काळीज वाती जाळून सरलो तुला काय त्याचे!!!

जरी थांबलो मी तुला भेटण्यासी तरी तू न आली
कधी सांजवेळी, कधी भर दुपारी, घराच्याच खाली
भले भेटण्याचे तसे खेळ झाले मनाशी मनाचे
तरी जीव माझा तुझ्यापास धावे तुला काय त्याचे!!

किती धाडली मी गुलाबी गुलाबी पत्रे लिहोनि
कोरून सारे जीवाचे शहारे रडोनी रडोनी
किती पाहिले मी स्वप्नी उतारे तुझ्या उत्तराचे
जरी जाणले मी नकारास तुझिया तुला काय त्याचे!!

उरी गाळली मी किती आसवे  गे मलाही न ठावे
रडली फुलेही , सुकले पिसारे , झुरले पुरावे
वाहून गेले डोक्यावरोनी पाणी पुराचे
तरी थांबलेलो गाळातळाशी तुला काय त्याचे!!

शब्दांस माझ्या किंमत दिली तू कवडी पुरेशी
स्वप्ने उशाशी ओल्या कडांनी निजली उपाशी
तुझिया स्मृतींचे तांडे निघाले ढळत्या घडीचे
मीही निघालो प्रेमा उपाशी तुला काय त्याचे!!

---आदित्य देवधर

जळमटं

हळू निनावी फुंकर आली, थरथरली जळमटं
'कुणा स्मृतींची लागण झाली', पुटपुटली जळमटं

पल्याड भिंतीशी विणता मी अलगद काही जाळी
नवीन शेजारी आल्याने खुसखुसली जळमटं

उगीच गप्पा टाकत होत्या काही जुनाट गोष्टी
अजून गाठी जोडत जाता बजबजली जळमटं

असे  वाटले झाडून घ्यावी जून स्मृतींची नाती
'कशास भ्यावे अस्तित्वाला?' ओरडली जळमटं

विझून जाता कोप-यातली पणती एक बिचारी
कशी एकटी पडली आणि अवघडली जळमटं

कितीकदा तू येऊन गेलीस येथे समोर माझ्या
तुझ्याचसाठी अंधारातून तडफडली जळमटं

अशीच ये अन् घेऊन जा तू उधार काही धागे
मला म्हणाली 'अताच सारी आवरली जळमटं'

------आदित्य देवधर

Wednesday, October 20, 2010

प्रेम हे असं असतं

प्रेम हे असं असतं.... असं असतं....
फार वेगळं काही नसून
मनातल्या मनातलं हसं असतं

पुराच्या पाण्यात झोकलेलं असतं
कुणाच्या स्वप्नात पोचलेलं असतं
डोळ्यांच्या वाटेनं बोलता बोलता
मनातलं गुपित जोखलेलं असतं

शब्दांच्या धारांत भिजलेलं असतं
चंद्राच्या कुशीत निजलेलं असतं
अंधाराचा पडदा पडता पडता
मिठीतून अंतर विझलेलं असतं

मनाच्या मातीत रुजलेलं असतं
लाजाळु लाजाळु बुजलेलं असतं
थोडीशी उन्हं जादा होता
कोप-यात लपून रुसलेलं असतं

उंच झोक्यावर बसलेलं असतं
मातीच्या गंधातून ठसलेलं असतं
पावसाची एक सर कोसळता
दव मनभर पडलेलं असतं

प्रेम हे नसतंच कधी स्वत:चं
आयुष्याचं ते निरांजन असतं
मायेच्या तेलाने चिंब भिजून
देवाच्या समोर जळायचं असतं

प्रेम हे असं असतं ..... असं असतं!

-------- आदित्य देवधर

Monday, October 18, 2010

बंदिवान

स्वातंत्र्याच्या आकाशातील मेघ बंदिवान मी
कोसळणा-या धारांच्यातील रेघ बंदिवान मी

पळता पळता अनोळखी वाटांच्या मागे इथे तिथे
अडखळत्या पायांच्यापाशी वेग बंदिवान मी

तू विरहाच्या चौकटीतुनी कोंडलीस वेदना 
लुसलुसणारी तारुण्याची शेंग बंदिवान मी

कितीक वर्षांनी दिसला मज तेजस्वी दिवा कुठे
उरात केली प्रकाशणारी भेग बंदिवान मी

अंतर राखून राहिलास तू प्रेमाच्या ओळींवरती
सोडूनिया हा समास झाले  रेघ बंदिवान मी

-------आदित्य देवधर

Friday, October 15, 2010

बघ तुला भेटायला कोण कोण आलय


बघ तुला भेटायला कोण कोण आलय
चेह-यावरचं सूत अगदी मऊ मऊ झालय

फक्त एवढे जाता जाता घेउन जा तू
हास्य  बापुडे केविलवाणे रडून आलय 

उगीच  दिसती अनोळखी चेहरे कितीसे
हिशेब सारे आता चुकते करून झालय 

इथे येउनी पहा जरासे सभोवताली
आनंदाच्या वाटेवर अश्रूंचे आलय 

चिंब केवढे ह्रदय दाटले तुझे अचानक
अशा कोणत्या आठवणीच्या तृषेत न्हालय? 

कोप-यातुनी उभी एकटी तिला पाहुनी
ऊर भरोनी काळजीतुनी उगाच भ्यालय!

आज शेवटी गुदमरलो मी फुलात राहून 
कधी एकदा  सरणावरती जातो, झालय.


-------आदित्य देवधर 

Wednesday, October 6, 2010

एक झाड

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

एक झाड मी होतो बहुधा माझ्या गेल्या जन्मी
किती झेलल्या गारा,  किती सोसली गर्मी
देत सावली उभा राहिलो येथे मरेपर्यंत
एक एक अवयव दिधले सरपण जमेपर्यंत
जळलो मीही तसा शेवटी एका साधुसंगे
राखेतूनही सोने घेण्या जमले कितीक भुंगे

देह जळाला तरी तेथला साधू संपला नव्हता
तेजाळ ओंजळीतुनी तेवढा तिथेच उरला होता
हात जोडूनी वदला सस्मित साधू नम्रपणाने
'भाग्य थोर लाभले केवढे तुझ्यासवे जळण्याने
मोक्ष गती प्राप्तीस साजसा कर्मयोग तू जगला
घे वर मागून वृक्षराजसा काय हवा तो तुजला'

समईने वातीस केवढा सन्मान दिला होता
जळण्याच्या संज्ञेस केवढा अर्थ दिला होता
माणूस होउन जगण्याच्या मग इच्छा दाटुन आल्या
नम्र झुकुनी साधूपुढती अशा मागण्या झाल्या
'एकदा तरी मनुष्य व्हावे असे करावे खास
छायेखाली बसुनी मजला घेता यावा श्वास'

जन्म अखेरी मला लाभला एका थोर कवीचा
शब्दांच्या सागरात डुबक्या मारून अवखळण्याचा
झाडे पाने फुले उतरली शब्दांमधुनी थेट
वेळोवेळी सृजनासंगे घडली त्याची भेट
जगला सारे आयुष्यातील आनंदाचे क्षण तो
अन् अचानक वरच्या दारी जाण्यास बुलावा येतो
अखेरच्या श्वासाची होती  एकाच इच्छा त्याची
छायेमध्ये झाडाखाली राम राम म्हणण्याची
सुचती त्याला काही ओळी जगास देण्यासाठी
येणा-यांनी  जाण्यासाठी, जाण्या-यांनी येण्यासाठी

आलो होतो कशास इकडे,सुखे भोगण्यासाठी ?
की गेल्या जन्मांची दु:खे पुढे वाटण्यासाठी,
की नव्हतेच इथे काही मजला माझ्यासाठी

------- आदित्य देवधर

Tuesday, October 5, 2010

भ्रम

फूल एक वाटेवरले, गळून गेले
बंध दोन धाग्यांमधले
, जळून गेले

यातना भ्रमाची हसली उगीच जेव्हा
दु:ख तेच हास्यातून विरघळून गेले

दार बंद होताच उद्याचे उजाडणारे
वादळी नशेचे संकट टळून गेले

पाय देत शब्दांवरती येता जाता
अर्थ मोकळ्या आभाळी मळून गेले

थोर चोर अध्यात्माची घेती शाळा
हेच शेवटी म्हातारे चळून गेले

घाव घालुनी पाठीवर फितूर गेले
रक्त केवढे कडवे भळभळून गेले

भावशून्य गाण्याच्या मैफिली जमवता
सूर आतले दु:खी कळवळून गेले

-----आदित्य देवधर

असावीस तू जवळी

पावसाचा पडदा छेडून लहरत येता वारा
लाटा अवखळ पडद्यावरती झिम्मा धरती न्यारा
तुषार भरती आनंदाची स्वप्नांमधली तळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

पुसती मजला थेंब थेंब हे कुठे हरवले रंग
इंद्रधनुही अवघडलेले, अजब तयाचे ढंग
रंगप्रभाही उतरू लागे
गात्र गात्र ओले अन जागे
कोकिळही मग गाउ लागे तृषार्त ओल्या गळी


एक एक थेंबावर मजला कितीक सुचती गाणी
शब्दांचाही पूर जाहता अडखळते हृद वाणी
ताल धरूनी पानांवरती
सूर वेचुनी गाउन जाती
कोमेजून रडवेल्या माझ्या स्मृतींतली हर कळी

ओघळते संदर्भ न जाणो कुठून येती दारी
सुंदर वळणे घेउन देती नवी नवी खुमारी
अशाच एका वळणावरती
आठवणीही वाट पाहती
कधी पडावी गालावरती गोड गुलाबी खळी
वाटे गुंफून जावे तुझिया हातांमधुनी गळी
वाटे भिजता धारांतुन तू असावीस जवळी

-----आदित्य देवधर