Pages

Monday, June 29, 2020

फूल माझे...

फूल माझे राहूदे गे तुझ्याच सोबत
शब्द होतील गझल येथे तू दिलेले
गीत होईल फूल तेथे मी दिलेले

फूल माझे माळ तू केसात तुझिया
आठवांचा गंध पसरुन भोवताली
पाकळ्यांचा श्वास होईल वर खाली

फूल माझे हासुनी गाईल गाणे
'काय वेडे मन तुझे झुरते अजूनी?
सांजवेळी तू कुणा स्मरते अजूनी!'

फूल माझे दवकणांनी चिंब होईल
चांदणे स्वप्नातले रडवेल जेव्हा
ते टिपूनी घेत मी उगवेन तेव्हा

फूल माझे ठेव तू जपुनी कुठेशी
भेटलो नाही जरी तुजला कधी मी
देउनी जाइन कळ्या माझ्या तरी मी

फूल माझे लाव तू परसात अलगद
रोज मी येइन स्मृतींच्या ओळखीने
दरवळू होऊन अत्तर सोबतीने

आदित्य

फक्त एकदा

स्वप्न साठले पापण्यांत जे फक्त एकदा
ओघळले, नभ डोह जाहले रिक्त एकदा

पिंजऱ्यामधे लिहून गेलो साधे काही
वादळ उठले अवघे, होता व्यक्त एकदा

व्याकुळ होई चकोर माझा तुझिया वाचुन
यायचेस की पौर्णिमेपरी फक्त एकदा!

बरसुन गेला कलुषित होउन शुभ्र मेघ तो,
जसा जाहला धरेवरी आसक्त एकदा!

काळे, गोरे किती भांडले रंग तरीही
'लाल सांडतो फक्त' म्हणाले रक्त एकदा

आपलाच मी होतो कौतुक करेपर्यंत
ठोकरला गेलो मी होता सख्त एकदा

'इथेच ऐसा उभा राहतो' देव म्हणे, पण
'भेटुन जावा कुणी खरा बस भक्त एकदा!'

अश्रूंचा अभिषेक घालते जर्जर काया
रोज मागणे एकच, व्हावे मुक्त एकदा!

आदित्य

Thursday, June 18, 2020

वेदनांचा बाजार

माणसांच्या वेदनांचा केवढा बाजार भरतो
मी इथे दुःखात असतो अन कुठे दर-भाव ठरतो

गाव माझ्या आत आहे एक वसलेले कुठेशी
सांजवेळी रोज येथे एकटा अज्ञात उरतो

वेळ आणिक प्राक्तनाची कैद मी भोगीत जाता
टोचणारा क्षण घड्याळावर तिथे अडकून पडतो

शून्य ठरते एक बाजू माझिया साऱ्या सुखांची
अन तिथे दुसरीकडे तर यातनांचा ढीग असतो

कोणत्या ऐशा यशाची पायरी अपयश असावी?
पायऱ्या संपूनही मी वाट ती शोधीत बसतो

बोचती नजरा जगाच्या वेगळे करताच काही
जीर्ण पिंपळपान होतो जीव अन विश्वास गळतो

मोजतो कित्येक छिद्रे आणि भेगा जीवनाच्या
शोधतो रंगीत नक्षी त्यात अन तैसेच जगतो

गुंततो नात्यांत साऱ्या मानुनी अपुले तयांना
वाढतो गुंता गळ्याशी अन विखारी फास बसतो

आदित्य

Wednesday, June 17, 2020

वाटले नव्हते..

वाटले नव्हते मला की एवढ्या जुळतील तारा
छेडुनी हळवे तराणे, भारिला तू देह सारा

अडकलो नजरेत मी पहिल्याच भेटीतून पुरता
अन मला कळलाच नाही तू दिलेला तो इशारा

ओळखीचे होत जाता मी कुठे हरवून गेलो!?
शोधले क्षितिजावरीही अन इथे झुरला किनारा

पापण्यांच्या ओंजळीतुन सांडले थोडे उसासे
अन कुठेशी हुंदक्यांचा जाहला मग कोंडमारा

मी जपूनी ठेवलेले पान होते ते गुलाबी
सोबती काळ्या निळ्या शाईतला निव्वळ पसारा

सर्व काही ठीक होते फक्त तू नव्हतीस तेव्हा,
श्वास होते चालले पण व्यर्थ होता अर्थ सारा

आदित्य

Wednesday, June 10, 2020

एवढी का आवडावी

का कळी बघता तुला खुदकन खुलावी
सांग तू मज एवढी का आवडावी

मी तुझ्या मागे पुढे इतके करावे
मात्र तू का मान हसुनी वेळवावी

होत जावे मी तुझे तन अन मनाने
एवढे की तूच केवळ मज दिसावी

मोतीयाचे थेंब व्हावे तू सकाळी
अन स्मृतींनी गे तुझ्या नित सांज व्हावी

स्वप्नही ऐसे पडावे लाघवी की
होऊनी सर पावसाची तूच यावी

एकदा भिडले जसे डोळे तुझ्याशी
तेवढ्या नजरेत माझी हार व्हावी?!

आठवण इतकी तुझी दाटून ये की
रातराणी स्वागताला ओघळावी

प्रीतसंभव फूल हृदयी उमलताना
वेल नाजुक अंगणामध्ये रुजावी

श्वास ऐसे तरळती गझलेपरी की
तूच त्यांचे सूर लय रुजवात व्हावी

आदित्य

Sunday, June 7, 2020

पाऊस

वाजवून दारावर टिचक्या 
रात्री पाऊस निघून गेला
श्वास जुन्याश्या स्वप्नांमध्ये 
मंद सुगंधी भरून गेला

आठवणींचा पूर वाहिला
उंबऱ्यातुनी माझ्या घरच्या
नाव गुलाबी कवितांची मग
माझ्यासाठी सोडुन गेला

जपलेले ते क्षण सापडले 
जुन्याच पिंपळपानावरती
ओलावा मग पुन्हा नव्याने 
ठसे वहितुन उमटुन गेला

एक एक फुटलेला अंकुर 
जळला होता वणव्यामध्ये
थेंब आज भिजलेल्या राखेमधुनी
निखार फुंकुन गेला

पावसात मी भिजता घेऊन 
कवेत पाउस हृदयामधला
स्मृतींतला तो श्रावण आला
परतुन आणिक बरसुन गेला

अजूनही मी गाणे गातो
पावसातले तुझे नि माझे
पाऊस सुद्धा आज अचानक 
गाणे अपुले गाउन गेला

अशी आठवण आली की तो
पाऊस सुद्धा माझा झाला
तुझे चांदणे मिसळुन अवघे
पाऊस मजला भिजवुन गेला

आदित्य

भय इथले संपत नाही

डोळ्यांत उतरती चंद्र
पुनवेच्या क्षितिजावरूनी
पाझरती अश्रू नकळत
परसात चांदण्यामधुनी
सुकलेल्या पिंपळपानी
ओलेती धार उमटते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

कोसळतो मेघ उपाशी
जन्मांचा जणू भुकेला
गहिवरतो जीव बिचारा
घन-चिंब उभा भिजलेला
अन साचत जाता डोही
ओढून मला ती नेते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

अंधार वेदना हृदयी
घेऊन मुसाफिर निघतो
तेजाचा दिवा कुठेशी
शोधीत निरंतर फिरतो
अश्रूंच्या वाटेवर मग
आत्म्याशी ओळख होते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

स्वप्नांच्या गावी येतो
मन कवडा ईश्वर उठुनी
अतृप्त वास्तवामधल्या
तुटलेल्या काचा धरुनी
रंगीत आरसे जुळता
अस्तित्व बिलोरी उरते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते.

आदित्य