काळ्या करड्या ओंजळीतुनी
अर्घ्य वाहतो डोंगरमाथा
भव्य ललाटी निळ्या नभावर
पूर्वेला तेजाची गाथा
पहाटवारा होई भैरव
वाजविताना वेणू रानी
सळसळणाऱ्या झाडांमधुनी
सूर-भैरवी पानोपानी
नव्या जगाचे, उत्साहाचे
जणू बारसे रात-दिनाचे
केशर, पिवळे आणि तांबडे
रंग उधळती उल्हासाचे
चाले क्षितिजावरी तयारी
यज्ञ उषेचा मंगल होवो
तिमिराची देताच आहुती
ज्ञानसूर्य नित तळपत राहो
असंख्य किरणे घेऊन येतील
चाहुल अवघ्या उत्कर्षाची
फूल, पाखरे डोलत डोलत
गीते गातील आनंदाची
उजळून जाता दिगंत मंडळ
उजळुन सारे नवे जुने,
दिवसाची सुरुवात सुमंगल
होता जुळतील मने मने
आदित्य