अंधाऱ्या रातीस एकटा खिडकीतुन मी पाऊस बघतो
दूर कुठेशी गडगडणारा मेघ इथे डोळ्यातुन झरतो
टपटपणारे थेंब टपोरे नाचुन जाती जमिनीवरती
अन पानांवर ओघळ कुठल्या स्मृतींमधूनी तिथेच रमतो
काळ्या काळ्या नभी साचतो कुठे गुलाबी डोह अचानक
आणि उसळुनी केवळ माझ्यासाठी ओला चंद्र झिरपतो
मनपटलावर क्षणात एका वीज बिलोरी तडकुन जाता,
एकामागुन एक जुन्या जखमांना पुन्हा हुंदका फुटतो
प्रकाशसुद्धा ओला होतो रस्त्यावरच्या पाण्यामधुनी,
कातर कातर होऊन जाता अंधाऱ्या सावलीत विरतो
मोत्यांची लडिवाळ माळ जी एकेकाळी जपली होती
पावसात या एक एक मोती आता डोळ्यांतुन गळतो
खिडकीच्या काचेवर माझ्या धुके दाटते धूसर धूसर
आणिक ओल्या आठवणींचा पाऊस केवळ मागे उरतो
पाऊस अलगद भिजवुन जातो कवितेतील शब्दांना माझ्या
कवितेमधुनी तुला भेटण्यासाठी हल्ली पाऊस पडतो
आदित्य
No comments:
Post a Comment