Pages

Saturday, April 17, 2021

निचरा

पाऊस ओळखीचा जेव्हा पडून गेला,
निःशब्द भावनांचा निचरा करून गेला

ही कोणत्या स्मृतींची चाहूल आज लागे
की पेटता निखारा, नुकता जळून गेला?

मी न्याय आंधळ्यांचे जेव्हा अमान्य केले
जो जो दिसेल तो तो मजला हसून गेला

हा दोष ना तुझा की हे प्रेम होत गेले,
मी मोहरून गेलो तो क्षण जगून गेला

मी मानले स्वतःचे गुणदोष सर्व काही
तेव्हा अहं स्वतःचा पुरता जळून गेला

मी वेचल्या फुलांचे निर्माल्य आज पुन्हा
आषाढ आठवांचा ताजे करून गेला

श्वासांत चांदण्याचे स्फुरले सुरेल गाणे
ओठांस चंद्र माझ्या वेणू करून गेला

आदित्य

Thursday, April 15, 2021

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा

राहिल्या मागे कुठेशी सावल्या डोहातुनी,
आजही येतात ऐकू खोल जखमांच्या कळा

सांडतो शब्दांमधूनी भावगंधाचा सडा,
सोसतो प्राजक्त राती चांदण्याच्याही झळा

सत्य माझे शोधण्या प्रतिबिंब माझे पाहिले,
भासला मज आरसाही सत्यवादी आंधळा

जन्म मृत्यू जोडणारा एक माझा पूल हा,
दुःख माझे एकट्याचे, एकट्याचा सोहळा

सोडुनी जाता कधी मी देवळातिल पायरी
देव झाला बंधनामधुनी स्वतःच्या मोकळा

आदित्य

Monday, April 12, 2021

रंगवू अंधार माझा

आंधळ्या अश्रूंमधूनी दाटतो हुंकार माझा,
'कोणत्या रंगात आता रंगवू अंधार माझा?'

स्वप्न दैवी सूर-लाघव होत गेले चांदण्याचे,
हाय येता जाग मागे राहिला गंधार माझा!

सोडवावे वाटले बेड्यांतुनी मजला तरीही
कोण जाणे का कुठेशी अडकला ओंकार माझा!

काळजाचे लख्ख तुकडे वेचुनी मोजीत बसलो,
मेळ नाही लागला अन हारला व्यवहार माझा.

राहतो ज्वालामुखी उद्विग्न माझ्या अंतरी अन
जाळतो आतून लाव्हा, पेटतो अंगार माझा!

आरसा बस तेवढा सांभाळतो माझ्या कथेतिल
एकट्याचे प्रेम आणिक एकटा शृंगार माझा

आदित्य

Thursday, April 1, 2021

पण कसे विसरून जाऊ

लाख तू म्हणशील आता, पण कसे विसरून जाऊ?
पेटवू साऱ्या स्मृती आगीत की विझवून जाऊ?

हाय मी गंधाळल्या श्वासांस माझ्या काय सांगू...
वादळे आणू पुन्हा की मृण्मयी मिसळून जाऊ?

आठवांची पालखी मी एकटा वाहू कुठेशी?
वाटले होते तया दोघे मिळुन उचलून जाऊ.

स्वप्न राहूदे सुगंधी तेवढे लाघव-क्षणांचे.
एवढे कर की अता स्वप्नी तरी हरवून जाऊ.

मालवू शकशील का तू ज्योत माझ्या आसवांची?
की स्वतःच्या भावनांची ओलही जाळून जाऊ?

पान-पाचोळा क्षणांचा सांडला इतका अचानक
की शिशिर सुद्धा म्हणे 'थोडी फुले उधळून जाऊ!'

आदित्य