Pages

Tuesday, March 15, 2011

एकदातरी

मजकडे बघायचेस वळून एकदातरी
दाखवायची मिजास म्हणून एकदातरी

वाद घालुनी बरेच रुसून जायचो मुळी
चोरुनी पहायचेस चुकून एकदातरी

तुझ्याच मैत्रिणीकडे बघून हासता कधी
राग राग व्हायचेस जळून एकदातरी

कितीकदा दिली तुला प्रिये तृषार्त हाक मी
मिठीत यायचेस विरघळून एकदातरी

भेटलो तुला जिथे तिथेच येत राहिलो
पुन्हा तशीच भेटशील म्हणून एकदातरी

आड आडुनी मला पहायचीस, जाणतो.
लाजुनी हसायचेस लपून एकदातरी

लिहीत राहिलो उदास, मूक प्रेमभावना
एक ओळ व्हायचेस हसून एकदातरी.


-----आदित्य देवधर 

No comments: