Pages

Monday, June 25, 2012

जिंदगी कंटाळली

वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली

झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली

ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली

सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली

आठवावी लागली म्हणतेस अपुली भेट 'जी'
एवढया गर्दीतही मी 'ती' स्मृती सांभाळली

दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली

वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली

आदित्य  

No comments: