Pages

Monday, June 25, 2012

मैत्र

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

उडू बागडू दिशात दाही
साथ आमुची सदैव राही
पुढे न मागे कुणी आमुच्या
मनमर्जीचे राजे आम्ही

खांद्यासंगे भिडवू खांदा
दिवस रात्र हा एकच धंदा
सावलीपरी दुजा संगती
लपंडाव साकारू आम्ही

कधी पायरी घसरून पडलो
चालत जाताना अडखळलो
हात पुढे सरसावून होतो
एक एक पारंबी आम्ही

भावनांतुनी विरघळताना
मनात अलगद हुरहुरताना
अवघडलेल्या शब्दांसंगे
ओझरणा-या धारा आम्ही

तरंगणा-या बेटावरती
अशी  उमलती नाजुक नाती
तुषार उडवू, फुलवत राहू
मैत्रीची कारंजी आम्ही

असे ऋतूही कधी उगवतील
उजाड रानी कोणी नसतील
तरी दाखवू दिशा दुजाला
चंद्र होऊनी नभात आम्ही

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

आदित्य



1 comment:

Anonymous said...

भा पो ..!