Pages

Monday, June 25, 2012

जंगलातली गंमत

जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मासे होते झाडावर अन् उडत होत्त्या गाई
मी काय सांगू आई

वाघोबाला फुटली होती हत्ते एवढी सोंड
जिराफ होते लावून काळे कोल्होबाचे तोंड
ससे छोटूले झाले होते लांडगोबांच्या एवढे
हरणाने तर दात लावले होते केवढे केवढे
नदी रंगली होती जैसे पेनामध्ये शाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

उंटाने भर उन्हामध्ये घातला होता स्वेटर
सिंह होते हाटेलातील गरीब बिचारे वेटर
उंदीरमामा घोड्यासंगे मारत होते दुडक्या
झाडामध्ये केल्या होत्या छोटया छोटया खिडक्या
कासवदादा पळत होते कसली होती घाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मोठी मोठी शिंगे होती चित्ता महाशयांना
चार पाय फुटले होते अजगर महाराजांना
अस्वल होते सरपटणारे काढे मोठा फणा
माकडचाळे सोडून माकड शिकवे शहाणपणा
मगरी म्हणती मजला आता पोहता येत नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मला देखिल आले होते एक हिरवे शिंग
आणि होते अंगावरती काळे पांढरे रंग
आली केवढी डरकाळी मी आ करता नुसता
सारे जंगल गायब झाले हा म्हणता म्हणता
कमी येथे मजला आता कसली म्हणता नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मी काय सांगू आई


आदित्य

No comments: