Pages

Monday, August 17, 2015

अंदाज

मी स्वतःशी बोलताना सागराचा भास झाला
लाट आली एक अन माझा मला अंदाज आला

स्वप्न होते की कुणाचे मिथ्य होते वास्तवाचे
जन्म घेण्याचा पुरावा सत्य पाझरता मिळाला

पेलतो डोळ्यात ताकद हिकमती माझ्या ऋतूंची
सांगतो सूर्यास देखिल रोख तू करड्या उन्हाला

सोडुनी गेले पुजारी, भक्त सारे अन भिकारी,
राहतो कंटाळलेला देवही तेथे कशाला ?

वाहुनी नेले किनारे , धार ती कोठून आली
पाट म्हटलो मी जया तो पूर अश्रूंचा निघाला
 

गाज ऐकुन एकदा , म्हटले पहावे कोण आले
सावली माझीच अन आवाजही माझाच आला


--आदित्य 



Thursday, August 13, 2015

क्षितिजाच्या पलीकडे

मला क्षितिजाची  सीमा नव्हतीच कधी. मी त्याच्या पलीकडला आहे. आणि तिथेच जाणार अहे. एवढी छोटी बंधनं मला अडकवू नाहे शकत.  इथे जेव्हा आलो तेव्हा क्षितिजाची पायरी ओलांडून स्वैर धावलोय, खिदळलोय. माझ्या सावलीशी खेळलोय. मला इथे सावली मिळते. माझ्या बाह्यजगात सावली नाही. मीच माझा प्रतिनिधी. इथे वावरताना इथल्या मायेमध्ये कसा अडकलो तेच कळल नाही. पण आता मला बाहेर जायचय . क्षितिजाच्या पलीकडे!

---आदित्य

कर्तृत्वाचा कोण दिखावा!

कर्तृत्वाचा कोण दिखावा करता येतो!
जन्मही आता ठरवुन आम्हा घेता येतो

दु:ख मुळी तू करू नको कोणी मेल्याचे
प्रेतामध्ये जीवही अता भरता येतो

भाव लागतो सध्या भगवंताचा देखिल
खिसा तयाचा अभिषेकाने जिंकता येतो

रक्ताच्या नात्यात असूदे वा मैत्रीच्या
कोणाचा विश्वास कसाही विकता येतो

बेशरमीचा घेत कुंचला उजळपणाने
राजरोस झेंड्याचा रंग बदलता येतो

घरे बदलुनी कुंडलीतल्या दुष्ट ग्रहांची
नियतीचाही डाव पुरा उलटवता येतो

---आदित्य 

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही
अश्या  तुझ्या दानाचा काहीच उपभोग नाही
रिकामा आलास तू आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून

कुठे जाउन आलास की नव्हतच काही द्यायला?
वेळ झाली म्हणून आलास अणि चाललास पुन्हा पोट भरायला
तुझी जमीन तुझी वाट पाहते आहे
कधीतरी येशील अणि मन मोकळ करशील याची
भरभरून येशील आणि चिंब भिजवशील याची

पण तू तर रिकामा आलायस आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून…….
अश्या तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही!

 ---आदित्य 

एक मुसाफिर

एक मुसाफिर वक्त से आगे निकलकर जी गया
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया । 
 
हम नही रोयेंगे ये वादा किया था आज लेकिन
आसमाँ शामिल न था इसमे,  बिचारा रो गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

संगदिलोमे आपका चलता रहेगा कारवाँ
एक सूरज आज बस यूँ मुस्कुराहते ढल गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

---आदित्य 

कर्ज

क्षणाक्षणाला श्वास उरातुन भरतो आहे
असे कोणते कर्ज फेडण्या जगतो आहे

हात पसरुनी जगणारा नशिबाचा कैदी
भीक मागुनी रोज नव्याने मरतो आहे

सहवासाचे तेल संपले तुझे नि माझे
दिवा तरीही हृदयामधुनी जळतो आहे

सवय जाहली आहे अश्रूंना दु:खांची
उगी कोणता थेंब बरे हा रडतो आहे?

मुक्त जाहलो जरी माझिया शरीरामधुनी
तरी वाटते आहे थोडा उरतो आहे

श्रावणातल्या ओल्या प्रेमाला मुकलेला
ढगांतला पाउस कोरडा झरतो आहे

--आदित्य

Friday, March 13, 2015

आठवणींच्या कट्ट्यावरती

आठवणींच्या कट्ट्यावरती बसून येतो
हसून येतो, कधी मोकळे रडून येतो 

विझू लागता निखार जळत्या धूनीमधले
श्वास उबेचे भात्यामध्ये भरून येतो 

तुझ्या स्मृतींची पाने वाऱ्याने उलगडता 
गंध फुलांचा तिथे अचानक कुठून येतो?

जिथून गेलो सोडुन अल्लड निखळ क्षणांना
तिथेच आता  दुनियाभरचे फिरून येतो 

रोजरोजची सगळी कटकट विसरुन पुन्हा 
नव्यानेच मी स्वप्ने  गोळा करून येतो 

कणाकणाने रोज स्वत:शी मरता मरता 
क्षणात सारे  कट्ट्यावरती जगून येतो 

---आदित्य  

   

Friday, February 13, 2015

नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले


नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले
स्वप्नांमधले अर्थ नेमके पुसून गेले

तगमग देखिल उरली नाही भेटीपुरती
दोन कोरडे थेंब मात्र मुसमुसून गेले

ग्रहण कोणते, कधी लागले कळले नाही
प्रश्न मात्र कायमची हुरहुर लावुन गेले

रोप लावले होते आपण अनुरागाचे
नवी पालवी येण्यापुर्वीच मरून गेले

तुला शोधण्या माझे डोळे कितीतरीदा
अनोळखी चेहऱ्यांच्या मागे धावून गेले

चिता लागली नाही मजला जळण्यासाठी
मी विरहाच्या वणव्या मध्ये जळून गेले

---आदित्य 

Thursday, February 12, 2015

हुंदक्यांची वादळे


खोल दडलेल्या प्रतापी सागराला  जाण आता
घेतलेल्या हुंदक्यांची वादळे तू आण आता

ओढ प्रत्यंचा मनाची गर्जुदे आवाज त्याचा
थांबले आहेत भात्यातील  सारे बाण आता

पेटवोनी दे मशाली तेल घालुन आसवांचे
जाळ अंधारास आणिक सूर्य पुन्हा आण आता

प्राक्तनाला ठेव तारण, निग्रहाचे लाव तोरण
मनगटाशी तारकांचे बांधुनी संधान आता

---आदित्य 

Wednesday, February 11, 2015

झूम उठेगी शराब


हाथ लगाके देखो तुम इन प्यालोंको ये बह जाएंगे
झूम उठेगी शराब के अब होंठ आपके छू जाएंगे

नजरोंसे ही नशा दिला दो, जी जाएंगे उम्र हमारी
नजरोंसे ही जहर पिला दो, खुशी खुशी से मर जाएंगे

ख्वाब देखके रातोंको हम दिल को ये समझाते है
ख्वाबही सही, रूबरू कही, आप सामने आ जाएंगे

रिश्तोकी रंजिश मे और दुनिया की गर्दिश मे आखिर
हमे आजमाकर तो देखो, रूह छोडके आ जाएंगे

यही तमन्ना है के निकले जान आपके पहलुमे ही
इसी बहाने आसू मेरी प्रेम कहानी कह  जाएंगे

-- आदित्य

Tuesday, January 6, 2015

पाणी होऊन जगता जगता

रंग कुणाचा, ढंग कुणाचा लेउन पुरता हरवुन गेलो 
पाणी होऊन जगता जगता मर्म स्वत:चे विसरुन गेलो 
 
मल्हाराचे स्वप्न पाहुनी उत्साहाने जरी नाचलो 
थेंबा थेंबा मधून नुसते रडून निव्वळ वाहून गेलो 
 
बोलायाचे होते तेव्हा शब्द जसे विरघळून गेले 
ती गेल्यावर,गूज मनाचे स्वत:शीच मग बोलून गेलो 
 
तेढ तेवढी नाही आता समाधान मज याचे  की,
आठवणींच्या जखमांचे मी हिशोब चुकते करून गेलो. 
 
आयुष्याची नशा पुरेशी घोळून उरता रिक्त शेवटी 
उरले सुरले पेल्यामधले सत्य तेवढे रिचवून गेलो 
 
किती दाबुनी  ठेवू वादळ, दर्या  तुमच्या भिंतीमागे 
नका म्हणू मग नंतर सारे गाव बिचारे बुडवुन  गेलो !
 
---आदित्य