Pages

Thursday, June 16, 2022

सल

पुन्हा भेट व्हावी सुगंधी क्षणांची
कुपी ओघळावी तुझ्या अत्तराची
नभी मेघ यावे निळ्या पावसाचे
मिठी घट्ट व्हावी तुझ्या आठवांची

पुन्हा रानजाई सजावी नव्याने
कळी शुभ्र ऐसी भिजावी दवाने
धुके पांघरोनी निळी सांज यावी
नवी भेट व्हावी जुन्या सावल्यांची

पुन्हा काजव्यांची मैफिल जमावी
जुनी शीळ अलवार ओठी रूळावी
उजळून याव्या स्मृती धुंद साऱ्या
फुले पाझरावी क्षणिक आसवांची

निळा डोह भरतो निळ्या चांदण्याने
झरे शब्द होतात अल्लडपणाने
कुठे भावनांच्या उसळतात लाटा
भिजे नाव अश्रूंत मग कागदाची

निर्माल्य होतात क्षण ते फुलांचे
गंधाळलेल्या मुक्या आठवांचे
उरतो तिथे डोहात एकटा मी
लेऊन डोळ्यांत सल चांदण्याची

आदित्य

Saturday, April 9, 2022

बासरी

पाण्यात ओघळावे प्रतिबिंब चांदण्याचे
गुंतून राहु द्यावे अस्तित्व लोचनांचे
गाण्यास मोगऱ्याचा यावा सुगंध ऐसा
घन चिंब कोसळावे बेधुंद आठवांचे

अंगावरी शहारे यावे तसे तू यावे
रोमांतुनी पिसारे बहरूनिया फुलावे
ओठांवरी जुळोनी यावेत शब्द ऐसे
हृदयातल्या सुरांचे अनुराग गीत व्हावे

क्षितिजा वरी कुठेशी येतात सूर कानी
मंजूळ बासरीचे संगीत कुंद रानी
बोलावतो जणू तो मज कातर संधिकाली
ओढून नेत जातो चित्तास चहु दिशांनी

घनदाट आठवांच्या डोहात एकटी मी
वाहून जात आहे कोठे अशी कशी मी
लाभेल का मलाही कोठे तुझा किनारा
तेथें तुझ्या सुरांची होईन बासरी मी

आदित्य

Sunday, February 6, 2022

देव निघून गेला

देव निघून गेला

मायेचा ओलावा मागे ठेऊन गेला
देव तयाचे गावी अखेर निघून गेला

भक्तांच्या हृदयात वसावा असा निरंतर
प्रसाद दैवी स्वरा स्वरांतुन ठेऊन गेला

चाले ना नियतीच्या पुढती देवाचेही
हासत हासत निरोप प्रेमळ देऊन गेला

आशीर्वाद सुरांच्या रूपे देता देता
नतमस्तक अन डोळे ओले करून गेला

एक सूर विरहाचा लाखो ह्रदयांमधला
कृष्णाच्या वेणूत भैरवी भरून गेला

आठवणी उरतील तेवढ्या गाणी होऊन
तीर्थक्षेत्र गाण्याचे ऐसे बांधुन गेला

शब्द अपूरे पडले ज्या भगवंतासाठी
तोच स्वरांची ओंजळ पदरी घालुन गेला

चंद्र सूर्य हे उगवतील यापुढे सुद्धा, पण 
ग्रहण एक अदृश्य तयांना लावुन गेला

आदित्य

Friday, February 4, 2022

रात्र

हळुवार ओढुनी दुलई मंद धुक्याची
निःशब्द पहुडली रात्र निळ्या रंगाची
मी कवळुन घेता अंधाराला माझ्या
विसरूनिया जाते ओळख अस्तित्वाची

झिरपते चांदणे मंद मंद श्वासात
उतरते क्षितिज घेऊन चंद्र डोळ्यांत
बोलवता कुठला पैलतीर पायांना
तरळते अनामिक नशा गूढ रस्त्यांची

आकाशमितीचे स्पंदन अंगी येते 
मन गोठुनिया हृदयाशी गोळा होते
मी हरवुन जातो सृष्टीच्या रंगात
अन् अलगद नेतो काळ मला डोहाशी

अस्तित्वाच्या पलीकडल्या जगताचा
मी होऊन जातो भाग त्याच सृष्टीचा
स्वप्नांचा कोठे गाव लागतो तेथे
संबंध ठेवण्यापुरता मर्त्य जगाशी

मी रोज रोज त्या वेशीपर्यंत जातो
अन् तोच बंद दरवाजा तेथे असतो
मग कोण मला तेथुनिया ओढुन नेते?
परतीच्या वाटेवरती क्षितिजापाशी

रोज चालतो एकच प्रवास ऐसा
रात्रीच्या गर्भात हरवण्या जैसा 
मग ऐलतिरावर सूर्य उगवतो माझा
घेऊन मनीषा वास्तवात जगण्याची

आदित्य

Tuesday, February 1, 2022

किनारा किनारा

निळ्या सागराचा 
निळा गाज वारा
जुळू दे मनाशी
मनाचा किनारा

तुझा भास होतो,
तुझा श्वास होतो,
तुझे स्वप्न होतो,
शहारा शहारा

कधी सांजवेळी,
पहाटे अवेळी, 
तुझ्या आठवांचा
नभाचा इशारा

तुझ्या लाघवाचा
तुझ्या श्रावणाचा
उरी जन्म घेतो
सुगंधी धुमारा

तुझा हात हाती
निशी-गंध राती
सवे संथ अपुल्या
किनारा किनारा

आदित्य

Monday, January 31, 2022

तुकडे तुकडे

तू हरवलास की मीच हरवले होते
अन् श्रावणात ही धुंद बहरले होते

स्वप्नात काय तू फुंकर घालुन गेला,
बागेत फुलांनी स्वर्ग सजवले होते

त्या आठवणीची वीज लकाकत जाता
आषाढ घनाचे मेघ बरसले होते

मी तुझ्या तेवढ्या एका हाकेवरती
बाकीची नाती पूर्ण विसरले होते

क्षितिज ठेंगणे वाटत होते मजला,
काय न जाणो असे गवसले होते

मी जोडत असते तुकडे तुकडे आता,
या डोळ्यांतील जे स्वप्न विखुरले होते 

आदित्य

Friday, January 28, 2022

शब्द डोळ्यांत दाटले

काळजातल्या जखमांना मोकळे वाटले
ओठावरचे शब्द जसे डोळ्यांत दाटले

बोलुन गेल्या स्मृती जशी सत्याची भाषा
भावनांतले समुद्र खोटे पूर्ण आटले

अंधाऱ्या डोहात निरंतर मूक बापड्या
दुःखाचे निर्माल्य आसवांतुनी साठले

उभारलेले श्रध्देने मी देउळ जे जे
देव त्यातले दुनियादारी करुन बाटले

उधळुन गेले शब्दांना नियतीचे वादळ
अन् पुस्तकातले तुझे तेवढे पान फाटले

स्वप्ने ठरली वाळू मधले महाल माझे
लाटांनी ते विरता पुन्हा नवे थाटले

जगताना सापडले नाही क्षितिज जे कधी
मरता कोणी पैलतिरी ते सहज गाठले

आदित्य

Saturday, January 22, 2022

पैलतीरी वाट पाहे

पैलतीरी वाट पाहे चेहरा भव संभ्रमाचा
अंतरी दररोज चाले खेळ सारा सावल्यांचा

संपता संपेचना वहिवाट पायाखालची अन
दूर जाई रोज थोडा वेध माझ्या मंदिराचा

कोण जाणे कोणत्या जन्मांस मी भोगून आलो
अन् किती जन्मांस अजुनी डाव आहे भोगण्याचा?

घोटला कित्येक वेळा जाणिवांचा श्वास माझ्या
शेवटी ज्वालामुखी उद्रेक झाला संगराचा

लागले आहे मनातुन प्रेम ओहोटीस आता
एकदा भरतीस यावा प्रीत सागर भावनांचा

रोज मी श्रीमंत होतो जाणता ‘ मी मर्त्य आहे!‘
रोज मी मार्गस्थ होतो देह यज्ञी तर्पणाचा

शेवटी ऐसे निघाले फूल सोडूनी तरुला
गंध मागाहुन निरंतर तेथ उरला अत्तराचा

आदित्य



Wednesday, January 5, 2022

निमित्त काही लागत नाही

उगाच काही खुळी कारणे सांगत नाही
तुला भेटण्या निमित्त काही लागत नाही

रोज नवे क्षण जुळूनी यावे तुझे नि माझे,
जुन्या आठवांवरी अताशा भागत नाही

काळ थिजूनी जातो तुझिया सोबत असता
मीच हरवतो असा की पत्ता लागत नाही

पाऊस येतो असा अवेळी मधेच अपुल्या
श्रावणही मग श्रावणापरी वागत नाही

तुझा किनारा अखंड लाभो या लाटांना
समुद्र माझा दुसरे काही मागत नाही

श्र्वासांची येतात जुळूनी गीते माझ्या
शब्दांना शोधावे आता लागत नाही

आदित्य