आग लागुदे रक्त सांडुदे उठूदे ज्वाळा शोकांच्या
घरात बसुनी आम्ही ऐकतो गाथा सरल्या प्राणांच्या
उसना आणून गहिवर गोळा करुनी दुबळ्या हाती
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
मातीमधुनी पाय रोवण्या धीर जमवला नाही
अलंकार जखमांचे लेण्या वार पेलला नाही
सौख्य आमुचे असेच निद्राधीन उबेतुन गादयांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
थंड जाहले रक्त आमुचे पाठ घोकुनी मोलाचे
देऊन दीक्षा विकुनी विद्या दूकान फळले पैशाचे
घाव घालण्या तलवारीचे पदव्या कसल्या कामाच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
घोर लढाई चाले पेटे होळी ज्यांच्या देहाची
सैतानाचे हात टांगती लक्तर वेशी वस्त्रांची
मिटून डोळे करू प्रार्थना करुणा भाकू देवांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
स्मरण करतो आम्ही न चुकता ठरल्या दिवशी
शांत राहती कुणी कुणाचे हात वक्षापाशी
कुणी ठेवतो आहे चरणी देह आपुल्या मातेच्या
वंदन करतो शूरा गातो गाथा तुझिया शौर्याच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
------- आदित्य देवधर
Friday, November 27, 2009
Tuesday, November 24, 2009
तुझ्याविना
श्वास असा हृदयात दाटला
खोल खोलवर रुतू लागला
ह्रदय आंधळे पिसाट धावे
ठोका चुकतो तुझ्याविना
नाव उमटते तुझेच लिहिता
शब्द धावती तुझ्याकडे
आठवणींतून गुरफटलेला
जीव अधूरा तुझ्याविना
एक एक हुंकार दाटला
कंठामधला शब्द आटला
गात्रामधुनी खोल आतला
स्पर्श लोपला तुझ्याविना
तार एक मी छेडिलेली
धून एक अवघडलेली
गळा दाटुनी आला आणिक
सूर फाटला तुझ्याविना
भिंतीमधून अचेतन घरच्या
निराश वाहे लकेर कसली
पाश उदासीन अवतीभवती
मजला वेढी तुझ्याविना
खिडकीमधुनी उभा एकटा
शून्य गोठते डोळ्यांमधले,
वाट पाहुनी उड़े पारवा
सांज घेउनी तुझ्याविना
मिटून डोळे घेतो मी मग
पापण्यांतुनी उदास तगमग
हलके ओठांवरती पाणी
आसू भरती तुझ्याविना
--------आदित्य देवधर
Monday, November 23, 2009
गरम पाणी
गरम पाणी लागे वाहू
कुण्डं उसंडे शेजारी
निखारयातुनी ओले होता
दोन नद्या त्या थेट उरी
धार संतत धार चालू
ओढ़ आतली धरुन किनारी
मार्ग आखुनी मार्ग मोकळे
प्रवाहातली बोच जिव्हारी
लाल जाळे लागे पसरू
शुभ्र मोकळ्या पटावरी
आरशावरी अनेक बिन्दु
ठेउन गेल्या कैक सरी
शांत जाहला पूर शेवटी
धग थांबली नसे जरी
शेष जाहती खुणा तयातुन
खारया वाटा दिसती परी
मिटूनी कळ्या डोहावरती
दव साचले कड़ेवरी
आत दाटली धूसर चित्रे
बंद ओलसर कुण्ड तरी
---------आदित्य देवधर
कुण्डं उसंडे शेजारी
निखारयातुनी ओले होता
दोन नद्या त्या थेट उरी
धार संतत धार चालू
ओढ़ आतली धरुन किनारी
मार्ग आखुनी मार्ग मोकळे
प्रवाहातली बोच जिव्हारी
लाल जाळे लागे पसरू
शुभ्र मोकळ्या पटावरी
आरशावरी अनेक बिन्दु
ठेउन गेल्या कैक सरी
शांत जाहला पूर शेवटी
धग थांबली नसे जरी
शेष जाहती खुणा तयातुन
खारया वाटा दिसती परी
मिटूनी कळ्या डोहावरती
दव साचले कड़ेवरी
आत दाटली धूसर चित्रे
बंद ओलसर कुण्ड तरी
---------आदित्य देवधर
Saturday, November 21, 2009
तुझ्या देशीच्या वाटा
कुठे वाहती वारे इथले
कुठे धावती लाटा
मला सोडुनी धरती सारे
मला सोडुनी धरती सारे
तुझ्या देशीच्या वाटा
दिसले नाहीत रंग नेटके
फिकट उदासीन फुलांतुनी
रंगहीन पाखरे भटकती
रंगहीन पाखरे भटकती
धुके पसरते क्षणांतुनी
मैफल सरली रंगांची
मैफल सरली रंगांची
अन उरी अडकला काटा
मला सोडुनी धरती सारे
मला सोडुनी धरती सारे
तुझ्या देशीच्या वाटा
डाग लागला चंद्रावरती
दिशाहीन ही ध्रुवतारा
शुद्ध हरपली रातीची अन
शुद्ध हरपली रातीची अन
नभी व्यापला मळ सारा
पुनवेलाही ग्रहण लावुनी
पुनवेलाही ग्रहण लावुनी
प्रकाश थरथरला खोटा
मला सोडुनी धरती सारे
मला सोडुनी धरती सारे
तुझ्या देशीच्या वाटा
वाळू थिजुनी रुते किनारी
थबकुनी साचे जलातुनी
बोडकी जुनी झाडे देखिल
बोडकी जुनी झाडे देखिल
समाधीत साधनेतुनी
सूर विराणी गाऊन जाती
सूर विराणी गाऊन जाती
जून फाटक्या लाटा
मला सोडुनी धरती सारे
तुझ्या देशीच्या वाटा
गंध एक परि आला धावून
निरोप देण्यासाठी
पाऊस कोसळे कुंद ऋतूचा
पाऊस कोसळे कुंद ऋतूचा
विरह सोसण्यासाठी
वारा सत्वर आला इथवर
वारा सत्वर आला इथवर
धरती ओली होता
गाव दूरचा सोडून धरल्या
गाव दूरचा सोडून धरल्या
तुझ्या देशीच्या वाटा
---------- आदित्य देवधर
Thursday, November 19, 2009
जगाची कहाणी
ऐक ज़रा तू लक्ष देउनी
गोल जगाची फोल कहाणी
हजारदा घोके गाथा
भस्मातुन लपलेला माथा
अर्थ टांगुनी वेशीवरती
हातावरुनी पाणी
उंच भरजरी नेसून कपडे
परमार्थी हे कैक आंधळे
भीक मंदिरी देती आणून
डोळ्यामध्ये पाणी
मयत जाता काष्ठांवरती
अग्नि देऊन देहावरती
वाट पाहती कितीक
खाण्या टाळूवरचे लोणी
पेशींमधुनी स्वार्थ कोंबला
कर्मांनी विश्वास सोलला
पानीपत मग घडते पुन्हा
रूप वेगळे तीच कहाणी
-------- आदित्य देवधर
गोल जगाची फोल कहाणी
हजारदा घोके गाथा
भस्मातुन लपलेला माथा
अर्थ टांगुनी वेशीवरती
हातावरुनी पाणी
उंच भरजरी नेसून कपडे
परमार्थी हे कैक आंधळे
भीक मंदिरी देती आणून
डोळ्यामध्ये पाणी
मयत जाता काष्ठांवरती
अग्नि देऊन देहावरती
वाट पाहती कितीक
खाण्या टाळूवरचे लोणी
पेशींमधुनी स्वार्थ कोंबला
कर्मांनी विश्वास सोलला
पानीपत मग घडते पुन्हा
रूप वेगळे तीच कहाणी
-------- आदित्य देवधर
Tuesday, November 17, 2009
निकाल सुख दु:खाचा
सुख कोठून पड़ते पदरी कुणी सांगाल का हो मजला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
गर्दीतून काढून वाटा मी रोज हाकतो गाडी
खड्डयांतून हिंदकळताना मणक्यांचे तुकडे पाडी
वर काम मारण्या माथी साहेब टपुनी बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
खड्डयांतून हिंदकळताना मणक्यांचे तुकडे पाडी
वर काम मारण्या माथी साहेब टपुनी बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
रोज रोजची कामे तशीच करतो आहे
हिशोब आकड्यांचे अचूक लावतो आहे
मित्र मात्र अमुचा पायरी वरची चढला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
हिशोब आकड्यांचे अचूक लावतो आहे
मित्र मात्र अमुचा पायरी वरची चढला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
ती कोणे एके काळी मला भावली होती
डोळ्यांच्या कोनामधुनी ती हळूच हासली होती
आज अचानक भाळी कुंकवाचा ठिपका दिसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
डोळ्यांच्या कोनामधुनी ती हळूच हासली होती
आज अचानक भाळी कुंकवाचा ठिपका दिसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
प्रश्न सोडवताना अमुचे ध्यान कुठेही नसते
कोरुन कोरुन चित्रे अवघे उत्तर सुरेख सजते
घंटा होता कळते की पेपर अर्धा सुटला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
कोरुन कोरुन चित्रे अवघे उत्तर सुरेख सजते
घंटा होता कळते की पेपर अर्धा सुटला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
खर्चाची मांडून गणिते मी बाकी मोजत बसतो
हप्ते देऊन देऊन आता खिसे रिकामे करतो
संसार उभा करण्या कर्जाचा डोंगर बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
हप्ते देऊन देऊन आता खिसे रिकामे करतो
संसार उभा करण्या कर्जाचा डोंगर बसला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
मी कष्ट करुनी खातो घामाची भाजी भाकर
चहा रोजचा एकच अन त्यातून मोजून साखर
पेला नव्हता माझा कसला पूर्ण कधीही भरला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
चहा रोजचा एकच अन त्यातून मोजून साखर
पेला नव्हता माझा कसला पूर्ण कधीही भरला
निकाल सुख दु:खाचा मज कधीच नाही कळला
-------- आदित्य देवधर
Sunday, November 15, 2009
वेळ
वेळ हा असा शब्दाय की ती 'असते' पण आणि 'असतो' पण. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्ही लिंगात वापरतात. वेळ आली असते, वेळ गेला असतो या दोन्ही वेळांमध्ये फरक आहे. हा कालवाचक शब्द घटना आणि कालावधी या दोन्ही संदर्भाने वापरता येतो. परीक्षेची वेळ आली आणि परीक्षेला अजुन वेळ आहे यात पाहिली वेळ घटना दर्शक तर दूसरा वेळ कालावधी दर्शक आहे. 'तो' वेळ 'त्या' वेळेचं अनेक वचन आहे.
शब्द द्वयर्थी असतात पण एकाच संदर्भात एका शब्दाचा असा 'लिंग' बदल विरळाच!
कोणाला अजुन असे काही माहित असल्यास इथे जरूर भेट दया आणि कळवा.
--------- आदित्य देवधर
शब्द द्वयर्थी असतात पण एकाच संदर्भात एका शब्दाचा असा 'लिंग' बदल विरळाच!
कोणाला अजुन असे काही माहित असल्यास इथे जरूर भेट दया आणि कळवा.
--------- आदित्य देवधर
प्यादं
विनायक बाल्कनी मध्ये चहा पीत बसला होता. आज रविवार असल्याने घरी तरी होता, नाहीतर एव्हाना तो ऑफीस मध्ये जाऊन जुना झालेला असतो. गेली सात वर्ष तो एका कंपनीत मार्केटिंगचं काम करतोय. नाव तेच असलं तरी कामाचं स्वरुप मात्र बरंच बदललय.त्याने सेल्समन म्हणुन सुरुवात केली होती आणि आता तो 'Stategic Marketing' चं काम करायला लागलाय. सिनीअर पोस्ट वर. रिपोर्ट, प्लान, बजेट असल्या शब्दांमध्ये आणि कसल्याशा अंकांमध्ये बुडालेला असतो. सात वर्षातली ही प्रगती कौतुकास्पद आहे आणि डोळ्यात येणारी पण. पस्तिशीची माणसं सर सर करत मागे हिंडतात त्याच्या. कधी कोणी याचं कारण, स्पष्टीकरण विचारलं तर त्याचं एकाच उत्तर असतं 'प्रत्येक कुलुपाची एक तरी किल्ली असतेच. ती शोधायची नाहीतर कोंडून घ्यायचं.' त्याला कधी कोंडीत अडकायचं माहितच नव्हतं. सतत कसल्याश्या शोधात, कामात असायचा. आत्ताही तो त्याच्या laptop वर काहीतरी करत होता.
त्याच्या कामाबद्दल शंका घ्यायचा काही प्रश्नच नव्हता. विनायक कमालीचा मेहनती, चतुर आणि हुशार होता . त्याचे वडिल गेले तेव्हा तो बारावीला होता आणि त्याची धाकटी बहिण,माधवी नववीला. आई घरी मेस चालवायची. त्यामुळे शिक्षण घराजवळच्याच शाळा कॉलेजातून झालेलं. तिथून त्याने जे कमावलय त्याचा अभिमान असल्यास त्यात काही गैर ठरणार नाही. त्याने जे काम केलय त्याचं चीज तर झालच आहे. पण खरंतर काही अवांतर गुणांमुळे तो इथवर आलाय. त्याच्या ओळखी. ओळख कोणाशी किती कधी आणि काशी वाढवायची हे तो कुठल्या शाळेत शिकलाय कुणास ठाऊक. त्याला ती कला जमली आहे. किराणामालाच्या दुकानावर बसलेल्या बनिया पासून साहेबाच्या इम्पोर्टेड कार मधून उधळलेल्या पोरापर्यंत सगळे याच्या ओळखीचे. खिशातालेच म्हणा ना! त्याच्या कंपनीचा मालक सिंधी आणि पोरगा नालायक. पण तोही चक्क ऑफिसला यायला लागला होता या विन्याच्या नादाने. पोराला बापाने पार्टनर करून घेतलं होतं. केवढं चपखल गणित जुळलं होतं. मग का करणार नाही विन्या 'केवल' शी मैत्री !! विनायक तसा हरहुन्नरी होता. फारसे मित्र वगैरे नसले तरी पार्ट्यांमधे एकदम वॉन्टेड होता. तो गिटार वाजवायचा, गाणीही बरी म्हणायचा पण करियर पुढे त्याने या कलांवर पाणी सोडलं होतं. पुढे जायचं असेल तर काहीतरी सोडावच लागतं. पण संधी मात्र त्याने कधीही सोडली नव्हती.
विनायकने माधवीला म्हणजे त्याच्या बहिणीला आपल्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज टाकायला सांगितलं. तिने Computer Engineering केलं होतं. आणि तिला सध्याच्या ठिकाणी फार काही मिळत नव्हतं. इथे तिला दुप्पट तरी पगार मिळणार होता. आणि तिला सिलेक्ट व्हायला फारसा काही त्रासही होणार नव्हता . साहजिकच होतं ते. मोठया खुशीत ती नवीन ठिकाणी जाऊ लागली. ती केवलच्या Department मधे होती. वर्षभरातच त्या दोघांची चांगली wavelength जमली. ती आता कामासाठी उशीरा पर्यंत थांबू लागली. शनिवार-रविवार घरी राहेनाशी झाली. तिच्याकडे आता नवीन स्कूटी आली होती. पगारवाढ़ झाली होती. महागडा मोबाईल आला होता. गळ्यातला नेकलेस आणि हातातलं ब्रेसलेट दर महिन्याला बदलत होतं. केवल तर पक्का सिंधी गोडबोल्या होता. त्याची साखरपेरणी जोरात चालू होती. तो आता बार मधल्यापेक्षा ऑफिसला जास्तं वेळ दिसत होता. ऑफिस मध्येही याची चर्चा होती. त्याच्या बापानुसार हे क्रेडिट विनायकला जात होतं. आणि ते वाढीव Allowance बरोबर दर महिन्याच्या पगारातून खात्यामध्ये रुजू होऊ लागलं होतं. दारी एक लांबडी कार नांदू लागली होती.
एका दिवस आई आणि विनायक घरी जेवण्यासाठी माधवीची वाट बघत होते. अकरा वाजले तरी माधवी घरी आली नव्हती. फोन केला तरी नुसती रिंग जात होती.
"ही काय पद्धत आहे काम करण्याची! वेळेचं भान ठेवता येत नाही का काही. मुलींनी मध्यरात्री पर्यंत घराबाहेर राहू नये हे तुमच्या कंपनीला काळात नाहिए का?" आई उद्वेगाने म्हणाली.
" अगं आई We are responsible for customer business!!" विनायक ने असलं प्रेझेंटेशन मधलं उत्तर दिलं. खरं तर तोही ज़रा चिंतित झाला होता.
" काहीही गरज नाहीये. असल्या कामांपेक्षा तिने घरी बसलेलं चालेल मला. "
विनायक ने परत फोन करायला मोबाईल उचलला. आणि बेल वाजली. माधवी आली होती. डोळे लाल झाले होते. ज़रा अपसेटही वाटत होती.
"ही काय वेळ झाली का पोरी? कुठे होतीस? इतका वेळ का लागला? पडलीस का कुठे? " असे अनेक प्रश्न एकामागोमाग एक आले.
"काहीही नाही झालेलं यातलं. मेजर इश्यू आलाय. त्यासाठी थांबावं लागलं" माधवीचं कोरडं उत्तर.
"अगं मग फोन तरी करायचा. आणि फोन का उचलत नव्हतीस? आम्ही काय समजायचं?
"आई, तू मला आता लेक्चर देणारेस का? आधीच डोकं उठलय त्यात तू ताप देऊ नकोस!!" असं म्हणून माधवी आपल्या खोलीत निघून गेली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. जेवणाचं टेबल आवरून काहीही ना बोलता तीही झोपायला गेली.
विनायकला हे ज़रा वेगळ वाटलं. माधवी असं कधी बोलली नव्हती आईला. त्याने लगेच केवल ला फोन केला. दोन रिंग नंतर लगेच त्याने उचलला.
" केवल, काय चालवलय हे. अती होतय. ही काय वेळ झाली का?"
पलीकडून फक्त हसण्याचा आवाज.
" तू दारू ढोसून बसला आहेस?
परत हसण्याचा आवाज!
"फक्त तुझ्या साठी माधवीला मी आपल्या कंपनीत यायचं सुचवलं होतं. तुला ती आवडली होती म्हणून. तू नसतं काही पैदा केलं नाहीयेस ना?"
" नाही यार....! " नशेतलं उत्तर. "तसं काही नाहिए. आज तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि माझ्या दारू बद्दल कळलय.बास!!"
"केवल, मला हे जास्तं ताणलेलं नकोय. लवकर काय तो निकाल लाव. तुझ्या आधीच्या Divorce बद्दल अजुन कोणाला कळणार नाही याची काळजी घे. आणि हे संपवून टाक."
फोन नंतर काही भानगड झाली नाहीये याचाच विनायकला जास्त समाधान होतं.
पुढच्या महिन्यातच माधवी-केवल च्या लग्नाची तारीख ठरली. आईला हे अजिबात मंजूर नव्हतं. पोरीचा हट्ट आणि त्यात मुलगाही चांगला. श्रीमंत होता. पोरीला सुखात ठेवेल या विचाराने तिने हो म्हटलं होतं. चार महिन्यात त्यांचं लग्न झालं. यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. सरड्याने रंग बदलले होते. आणि ऑफिस मध्येही रंग बदलले होते. विनायक आता "VP Marketing" झाला होता. त्याला नवीन केबिन ची किल्ली मिळाली होती. पण त्यासाठी त्याने अजुन एक प्यादं गमावलं होतं. घरातलंच एक. एक "मी" नावाचं प्यादं मात्र एकटंच पुढे गेलं. मित्र, नाती, छंद, घर यांना पणाला लावून त्याने त्या प्याद्याचा वजीर केला होता. आठ वर्षापूर्वीचं प्यादं जे फक्त एक घर पुढे जात होतं,आख्खा पट आता त्याचाच होता. मुक्त संचार करता येणार होता. राजाला शह देण्यासाठी त्याने जुळवाजुळव सुरू केली होती.
------- आदित्य देवधर
Sunday, November 8, 2009
पाऊस
संध्याकाळी पश्चिमेकडे आभाळ फाटले दूर
पिवळ्या धूसर घुमटामधुनी गदगदला एक सूर
धूळ उडवित डोळ्यांमधुनी वारा नाचत होता
देवाघरचा कमंडलू वर तिरका झाला होता
क्षितिजावरती रंगांची ही झाली होती गर्दी
सोने मिसळून अवघ्या भाळी आषाढाची वर्दी
सूर्य एका अंशामधुनी खाली लपला होता
अन आकाशाने धरतीवरती लंब टाकला होता
कण अन कण धुळीचा उठला होता आनंदाने
चातक धावला होता पहिल्या थेंबा आवेशाने
झाडांनीही लवुनी पाती मुजरा केला होता
वरुणाच्या दूताने खाली धावा केला होता
तडतड करुनी धरणीवर फोडणी पडली होती
अंगाअंगा वरची लाही लाही फुटली होती
उष्ण उष्ण वाफांवर ओला शिडकावा झाला होता
मग मातीचा गंध हवेतून दरवळला होता
रस्त्यांवरल्या लोकांची धावपळ चालू झाली
छत्रीमधुनीही भिजण्याची गंमत मजला आली
टपरीवरती तेलामधुनी घाणा पडला होता
अन गार ओला वारा घेऊन पाऊस आला होता.
--------- आदित्य देवधर
पिवळ्या धूसर घुमटामधुनी गदगदला एक सूर
धूळ उडवित डोळ्यांमधुनी वारा नाचत होता
देवाघरचा कमंडलू वर तिरका झाला होता
क्षितिजावरती रंगांची ही झाली होती गर्दी
सोने मिसळून अवघ्या भाळी आषाढाची वर्दी
सूर्य एका अंशामधुनी खाली लपला होता
अन आकाशाने धरतीवरती लंब टाकला होता
कण अन कण धुळीचा उठला होता आनंदाने
चातक धावला होता पहिल्या थेंबा आवेशाने
झाडांनीही लवुनी पाती मुजरा केला होता
वरुणाच्या दूताने खाली धावा केला होता
तडतड करुनी धरणीवर फोडणी पडली होती
अंगाअंगा वरची लाही लाही फुटली होती
उष्ण उष्ण वाफांवर ओला शिडकावा झाला होता
मग मातीचा गंध हवेतून दरवळला होता
रस्त्यांवरल्या लोकांची धावपळ चालू झाली
छत्रीमधुनीही भिजण्याची गंमत मजला आली
टपरीवरती तेलामधुनी घाणा पडला होता
अन गार ओला वारा घेऊन पाऊस आला होता.
--------- आदित्य देवधर
Saturday, November 7, 2009
मुखवटे
खेळ मुखवट्यांचा
सदासर्वदा चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
सदासर्वदा चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
भीक मागण्यासाठी
येती हात हजारो
मी खिसे पालथे घालू
की रस्ता अपुला बदलू
येती हात हजारो
मी खिसे पालथे घालू
की रस्ता अपुला बदलू
ताट भरले असता
मनी प्रश्न पड़े मजला
मान वड्याचा पहिला
की लाडू आधी उचलू
मनी प्रश्न पड़े मजला
मान वड्याचा पहिला
की लाडू आधी उचलू
रांगेत ताटकळताना
कधी उमगले नाही
असाच वेळ मी दवडू
की हळूच पाकिट ढकलू
कधी उमगले नाही
असाच वेळ मी दवडू
की हळूच पाकिट ढकलू
गाणे केविलवाणे
ऐकून कान बधीर
मी तिथेच चिंध्या फाडू
की शाबास बढिया बोलू
ऐकून कान बधीर
मी तिथेच चिंध्या फाडू
की शाबास बढिया बोलू
लादे ओझे भारी
चाकरी साहेबाची
मी साफ़ झुगारून देऊ
की फ़ुटकळ कवड्या झेलू
चाकरी साहेबाची
मी साफ़ झुगारून देऊ
की फ़ुटकळ कवड्या झेलू
आरशात पाहताना
अंतर्मुख मी होतो
मुखवटे ओढलेले
समोर ठेउन बघतो
चूक बरोबर कुठले
ही स्पर्धा यांची चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
अंतर्मुख मी होतो
मुखवटे ओढलेले
समोर ठेउन बघतो
चूक बरोबर कुठले
ही स्पर्धा यांची चालू
मी विचार करीत बसतो
की कुठला चेहरा घालू
----------- आदित्य देवधर
Friday, November 6, 2009
नकोस काही सांगू.......
नकोस काही सांगू सखये ठाऊक आहे मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
पाकळ्यांतुनी विसावणारे दोन टपोरे मोती
ओघळताना झेलले होते अलगद बोटांवरती
रातीच्या साजावरती ध्रुव जसा चमचमला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
शुभ्र गगनामधुनी काळे मेघ अवतरलेले
लुकलुकणारे तारे होते किंचित अवघडलेले
मंडळातुनी विस्कटलेल्या राग लटका दिसला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओंजळीतुनी कमळावरचे दव मी टिपले होते
शिंपल्यातल्या मोत्यांमधुनी भाव जाणले होते
गालावरचे ओघळ किंचित उष्ण भासले मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओठांवरती चंद्राची प्रथमेची नाजुक कोर
पौर्णिमेची प्रभा तयावर जशी उमटली गौर
चांदण्यातुनी नितळ गुलाबी गाली मोहर फुलला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
------------------- आदित्य देवधर
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
पाकळ्यांतुनी विसावणारे दोन टपोरे मोती
ओघळताना झेलले होते अलगद बोटांवरती
रातीच्या साजावरती ध्रुव जसा चमचमला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
शुभ्र गगनामधुनी काळे मेघ अवतरलेले
लुकलुकणारे तारे होते किंचित अवघडलेले
मंडळातुनी विस्कटलेल्या राग लटका दिसला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओंजळीतुनी कमळावरचे दव मी टिपले होते
शिंपल्यातल्या मोत्यांमधुनी भाव जाणले होते
गालावरचे ओघळ किंचित उष्ण भासले मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
ओठांवरती चंद्राची प्रथमेची नाजुक कोर
पौर्णिमेची प्रभा तयावर जशी उमटली गौर
चांदण्यातुनी नितळ गुलाबी गाली मोहर फुलला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला
------------------- आदित्य देवधर
Tuesday, November 3, 2009
मी
कुणास पुसशी कुठे धावसी ,
मज कुणी पाहिला आहे
हृदया मधल्या देवळातुनी
तुझ्या अंतरी आहे
नसे मंदिरी मूर्तींमधुनी
व्यर्थ उभा त्या गाभ्यांमधुनी
दूर कोवळ्या शेतांतून
मी मुक्त डोलतो आहे
मूठ वळुनी तळहाताची
ज्योत ललाटी उभी तेजाची
घाम मिसळूदे रक्तातून
मी वाट पाहतो आहे
दगडाला पाझर फोडुनी
लाटालाटांतून उसळूनी
पावसातल्या थेंबा मधुनी
जसा बरसतो आहे
उजळुन समई अंधारातुन
तेज चहूकडे काळोखातुन
श्वास घेउनी तव हृदयी
मी तिथेच वसलो आहे
मी बुद्धी मी शक्ती आहे
मीच क्षति मी वृद्धी आहे
कणाकणातुन क्षणाक्षणातुन
तुला व्यापले आहे
-------- आदित्य देवधर
मज कुणी पाहिला आहे
हृदया मधल्या देवळातुनी
तुझ्या अंतरी आहे
नसे मंदिरी मूर्तींमधुनी
व्यर्थ उभा त्या गाभ्यांमधुनी
दूर कोवळ्या शेतांतून
मी मुक्त डोलतो आहे
मूठ वळुनी तळहाताची
ज्योत ललाटी उभी तेजाची
घाम मिसळूदे रक्तातून
मी वाट पाहतो आहे
दगडाला पाझर फोडुनी
लाटालाटांतून उसळूनी
पावसातल्या थेंबा मधुनी
जसा बरसतो आहे
उजळुन समई अंधारातुन
तेज चहूकडे काळोखातुन
श्वास घेउनी तव हृदयी
मी तिथेच वसलो आहे
मी बुद्धी मी शक्ती आहे
मीच क्षति मी वृद्धी आहे
कणाकणातुन क्षणाक्षणातुन
तुला व्यापले आहे
-------- आदित्य देवधर
Subscribe to:
Posts (Atom)