आग लागुदे रक्त सांडुदे उठूदे ज्वाळा शोकांच्या
घरात बसुनी आम्ही ऐकतो गाथा सरल्या प्राणांच्या
उसना आणून गहिवर गोळा करुनी दुबळ्या हाती
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
मातीमधुनी पाय रोवण्या धीर जमवला नाही
अलंकार जखमांचे लेण्या वार पेलला नाही
सौख्य आमुचे असेच निद्राधीन उबेतुन गादयांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
थंड जाहले रक्त आमुचे पाठ घोकुनी मोलाचे
देऊन दीक्षा विकुनी विद्या दूकान फळले पैशाचे
घाव घालण्या तलवारीचे पदव्या कसल्या कामाच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
घोर लढाई चाले पेटे होळी ज्यांच्या देहाची
सैतानाचे हात टांगती लक्तर वेशी वस्त्रांची
मिटून डोळे करू प्रार्थना करुणा भाकू देवांच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
स्मरण करतो आम्ही न चुकता ठरल्या दिवशी
शांत राहती कुणी कुणाचे हात वक्षापाशी
कुणी ठेवतो आहे चरणी देह आपुल्या मातेच्या
वंदन करतो शूरा गातो गाथा तुझिया शौर्याच्या
सलाम करतो शूरा, जाशी चितेत हसुनी बाणांच्या
------- आदित्य देवधर
Friday, November 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment