Pages

Friday, November 6, 2009

नकोस काही सांगू.......

नकोस  काही सांगू सखये ठाऊक आहे मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला

पाकळ्यांतुनी विसावणारे दोन टपोरे मोती
ओघळताना झेलले होते अलगद बोटांवरती
रातीच्या  साजावरती ध्रुव जसा चमचमला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला

शुभ्र गगनामधुनी काळे मेघ अवतरलेले
लुकलुकणारे तारे होते किंचित अवघडलेले
मंडळातुनी विस्कटलेल्या राग लटका दिसला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला

ओंजळीतुनी कमळावरचे दव मी टिपले होते
शिंपल्यातल्या मोत्यांमधुनी भाव जाणले होते
गालावरचे ओघळ किंचित  उष्ण भासले मजला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला

ओठांवरती चंद्राची प्रथमेची नाजुक कोर
पौर्णिमेची प्रभा तयावर जशी उमटली गौर
चांदण्यातुनी नितळ गुलाबी गाली  मोहर फुलला
नक्षत्रांचा पडदा सारून चंद्र सारे वदला

------------------- आदित्य देवधर

No comments: