संध्याकाळी पश्चिमेकडे आभाळ फाटले दूर
पिवळ्या धूसर घुमटामधुनी गदगदला एक सूर
धूळ उडवित डोळ्यांमधुनी वारा नाचत होता
देवाघरचा कमंडलू वर तिरका झाला होता
क्षितिजावरती रंगांची ही झाली होती गर्दी
सोने मिसळून अवघ्या भाळी आषाढाची वर्दी
सूर्य एका अंशामधुनी खाली लपला होता
अन आकाशाने धरतीवरती लंब टाकला होता
कण अन कण धुळीचा उठला होता आनंदाने
चातक धावला होता पहिल्या थेंबा आवेशाने
झाडांनीही लवुनी पाती मुजरा केला होता
वरुणाच्या दूताने खाली धावा केला होता
तडतड करुनी धरणीवर फोडणी पडली होती
अंगाअंगा वरची लाही लाही फुटली होती
उष्ण उष्ण वाफांवर ओला शिडकावा झाला होता
मग मातीचा गंध हवेतून दरवळला होता
रस्त्यांवरल्या लोकांची धावपळ चालू झाली
छत्रीमधुनीही भिजण्याची गंमत मजला आली
टपरीवरती तेलामधुनी घाणा पडला होता
अन गार ओला वारा घेऊन पाऊस आला होता.
--------- आदित्य देवधर
Sunday, November 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment