विनायक बाल्कनी मध्ये चहा पीत बसला होता. आज रविवार असल्याने घरी तरी होता, नाहीतर एव्हाना तो ऑफीस मध्ये जाऊन जुना झालेला असतो. गेली सात वर्ष तो एका कंपनीत मार्केटिंगचं काम करतोय. नाव तेच असलं तरी कामाचं स्वरुप मात्र बरंच बदललय.त्याने सेल्समन म्हणुन सुरुवात केली होती आणि आता तो 'Stategic Marketing' चं काम करायला लागलाय. सिनीअर पोस्ट वर. रिपोर्ट, प्लान, बजेट असल्या शब्दांमध्ये आणि कसल्याशा अंकांमध्ये बुडालेला असतो. सात वर्षातली ही प्रगती कौतुकास्पद आहे आणि डोळ्यात येणारी पण. पस्तिशीची माणसं सर सर करत मागे हिंडतात त्याच्या. कधी कोणी याचं कारण, स्पष्टीकरण विचारलं तर त्याचं एकाच उत्तर असतं 'प्रत्येक कुलुपाची एक तरी किल्ली असतेच. ती शोधायची नाहीतर कोंडून घ्यायचं.' त्याला कधी कोंडीत अडकायचं माहितच नव्हतं. सतत कसल्याश्या शोधात, कामात असायचा. आत्ताही तो त्याच्या laptop वर काहीतरी करत होता.
त्याच्या कामाबद्दल शंका घ्यायचा काही प्रश्नच नव्हता. विनायक कमालीचा मेहनती, चतुर आणि हुशार होता . त्याचे वडिल गेले तेव्हा तो बारावीला होता आणि त्याची धाकटी बहिण,माधवी नववीला. आई घरी मेस चालवायची. त्यामुळे शिक्षण घराजवळच्याच शाळा कॉलेजातून झालेलं. तिथून त्याने जे कमावलय त्याचा अभिमान असल्यास त्यात काही गैर ठरणार नाही. त्याने जे काम केलय त्याचं चीज तर झालच आहे. पण खरंतर काही अवांतर गुणांमुळे तो इथवर आलाय. त्याच्या ओळखी. ओळख कोणाशी किती कधी आणि काशी वाढवायची हे तो कुठल्या शाळेत शिकलाय कुणास ठाऊक. त्याला ती कला जमली आहे. किराणामालाच्या दुकानावर बसलेल्या बनिया पासून साहेबाच्या इम्पोर्टेड कार मधून उधळलेल्या पोरापर्यंत सगळे याच्या ओळखीचे. खिशातालेच म्हणा ना! त्याच्या कंपनीचा मालक सिंधी आणि पोरगा नालायक. पण तोही चक्क ऑफिसला यायला लागला होता या विन्याच्या नादाने. पोराला बापाने पार्टनर करून घेतलं होतं. केवढं चपखल गणित जुळलं होतं. मग का करणार नाही विन्या 'केवल' शी मैत्री !! विनायक तसा हरहुन्नरी होता. फारसे मित्र वगैरे नसले तरी पार्ट्यांमधे एकदम वॉन्टेड होता. तो गिटार वाजवायचा, गाणीही बरी म्हणायचा पण करियर पुढे त्याने या कलांवर पाणी सोडलं होतं. पुढे जायचं असेल तर काहीतरी सोडावच लागतं. पण संधी मात्र त्याने कधीही सोडली नव्हती.
विनायकने माधवीला म्हणजे त्याच्या बहिणीला आपल्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज टाकायला सांगितलं. तिने Computer Engineering केलं होतं. आणि तिला सध्याच्या ठिकाणी फार काही मिळत नव्हतं. इथे तिला दुप्पट तरी पगार मिळणार होता. आणि तिला सिलेक्ट व्हायला फारसा काही त्रासही होणार नव्हता . साहजिकच होतं ते. मोठया खुशीत ती नवीन ठिकाणी जाऊ लागली. ती केवलच्या Department मधे होती. वर्षभरातच त्या दोघांची चांगली wavelength जमली. ती आता कामासाठी उशीरा पर्यंत थांबू लागली. शनिवार-रविवार घरी राहेनाशी झाली. तिच्याकडे आता नवीन स्कूटी आली होती. पगारवाढ़ झाली होती. महागडा मोबाईल आला होता. गळ्यातला नेकलेस आणि हातातलं ब्रेसलेट दर महिन्याला बदलत होतं. केवल तर पक्का सिंधी गोडबोल्या होता. त्याची साखरपेरणी जोरात चालू होती. तो आता बार मधल्यापेक्षा ऑफिसला जास्तं वेळ दिसत होता. ऑफिस मध्येही याची चर्चा होती. त्याच्या बापानुसार हे क्रेडिट विनायकला जात होतं. आणि ते वाढीव Allowance बरोबर दर महिन्याच्या पगारातून खात्यामध्ये रुजू होऊ लागलं होतं. दारी एक लांबडी कार नांदू लागली होती.
एका दिवस आई आणि विनायक घरी जेवण्यासाठी माधवीची वाट बघत होते. अकरा वाजले तरी माधवी घरी आली नव्हती. फोन केला तरी नुसती रिंग जात होती.
"ही काय पद्धत आहे काम करण्याची! वेळेचं भान ठेवता येत नाही का काही. मुलींनी मध्यरात्री पर्यंत घराबाहेर राहू नये हे तुमच्या कंपनीला काळात नाहिए का?" आई उद्वेगाने म्हणाली.
" अगं आई We are responsible for customer business!!" विनायक ने असलं प्रेझेंटेशन मधलं उत्तर दिलं. खरं तर तोही ज़रा चिंतित झाला होता.
" काहीही गरज नाहीये. असल्या कामांपेक्षा तिने घरी बसलेलं चालेल मला. "
विनायक ने परत फोन करायला मोबाईल उचलला. आणि बेल वाजली. माधवी आली होती. डोळे लाल झाले होते. ज़रा अपसेटही वाटत होती.
"ही काय वेळ झाली का पोरी? कुठे होतीस? इतका वेळ का लागला? पडलीस का कुठे? " असे अनेक प्रश्न एकामागोमाग एक आले.
"काहीही नाही झालेलं यातलं. मेजर इश्यू आलाय. त्यासाठी थांबावं लागलं" माधवीचं कोरडं उत्तर.
"अगं मग फोन तरी करायचा. आणि फोन का उचलत नव्हतीस? आम्ही काय समजायचं?
"आई, तू मला आता लेक्चर देणारेस का? आधीच डोकं उठलय त्यात तू ताप देऊ नकोस!!" असं म्हणून माधवी आपल्या खोलीत निघून गेली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. जेवणाचं टेबल आवरून काहीही ना बोलता तीही झोपायला गेली.
विनायकला हे ज़रा वेगळ वाटलं. माधवी असं कधी बोलली नव्हती आईला. त्याने लगेच केवल ला फोन केला. दोन रिंग नंतर लगेच त्याने उचलला.
" केवल, काय चालवलय हे. अती होतय. ही काय वेळ झाली का?"
पलीकडून फक्त हसण्याचा आवाज.
" तू दारू ढोसून बसला आहेस?
परत हसण्याचा आवाज!
"फक्त तुझ्या साठी माधवीला मी आपल्या कंपनीत यायचं सुचवलं होतं. तुला ती आवडली होती म्हणून. तू नसतं काही पैदा केलं नाहीयेस ना?"
" नाही यार....! " नशेतलं उत्तर. "तसं काही नाहिए. आज तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि माझ्या दारू बद्दल कळलय.बास!!"
"केवल, मला हे जास्तं ताणलेलं नकोय. लवकर काय तो निकाल लाव. तुझ्या आधीच्या Divorce बद्दल अजुन कोणाला कळणार नाही याची काळजी घे. आणि हे संपवून टाक."
फोन नंतर काही भानगड झाली नाहीये याचाच विनायकला जास्त समाधान होतं.
पुढच्या महिन्यातच माधवी-केवल च्या लग्नाची तारीख ठरली. आईला हे अजिबात मंजूर नव्हतं. पोरीचा हट्ट आणि त्यात मुलगाही चांगला. श्रीमंत होता. पोरीला सुखात ठेवेल या विचाराने तिने हो म्हटलं होतं. चार महिन्यात त्यांचं लग्न झालं. यानंतर जे व्हायचं होतं तेच झालं. सरड्याने रंग बदलले होते. आणि ऑफिस मध्येही रंग बदलले होते. विनायक आता "VP Marketing" झाला होता. त्याला नवीन केबिन ची किल्ली मिळाली होती. पण त्यासाठी त्याने अजुन एक प्यादं गमावलं होतं. घरातलंच एक. एक "मी" नावाचं प्यादं मात्र एकटंच पुढे गेलं. मित्र, नाती, छंद, घर यांना पणाला लावून त्याने त्या प्याद्याचा वजीर केला होता. आठ वर्षापूर्वीचं प्यादं जे फक्त एक घर पुढे जात होतं,आख्खा पट आता त्याचाच होता. मुक्त संचार करता येणार होता. राजाला शह देण्यासाठी त्याने जुळवाजुळव सुरू केली होती.
------- आदित्य देवधर
No comments:
Post a Comment