Pages

Tuesday, February 23, 2010

स्वामीसाधन

        एका कॉलेजातून एक कोर्स चालवला जातो. शिस्तीत डिग्री मिळते. 'बी. ए. इन स्वामीसाधन' अशा नावाची.गेल्या तीन वर्षां पासून इथे मुलींसाठी देखील कोर्स सुरु केलाय. त्यानांही हल्ली फार डिमांड आहे. इथे प्रत्येक जण स्वत:ला हवी ती पदवी घेऊ शकतो. सांगायचंच   झालं तर बाबा, बुवा, बापू, बाई, आई, ताई यांपैकी काहीही. दरवर्षी एखाद्या क्रिएटिव्ह पदवीला बक्षीसही मिळतं. याची पात्रता म्हणाल तर मात्र  फार अवघड आहे. सायन्स, मानस शास्त्र यांची माहिती पाहिजे. शिकलेलं असायची गरज नाही. फाटके कपडे घालायची सवय, दाढी वाढवणे, रात्री भटकणे, पत्ते, चरस, गांजा, बाटली यांची ओढ़ असल्यास फायदेशीर आहे. Admission सोपी होते हो..!!
        पहिल्या वर्षापासून यांचं Proffessional Training सुरु होतं. गणवेश मिळतो. यात पण choice आहे बरं का ! कोणी पांढरा डगला, तर कोणी काळा, कोणी भगवा सदरा तर कोणी पिवळा कुर्ता. तसंच साड्यांचं. हे रंग 'Major' प्रमाणे ठरतात. इथे दोन शाखा आहेत. एक 'अघोरी' तर एक 'अध्यात्मिक'. तुम्हाला पहिल्या वर्षापासुनच निवडावी लागते. दोन्ही शाखांना सामान स्कोप आहे. अघोरी शाखेला 'लिंबू विज्ञान' शिकवलं जातं तर अध्यात्मिक ला 'गूढ़ शास्त्र' असतं. एका अध्यात्मिक पास आउट चा मी Interview पहायला मिळाला. पहायला म्हणजे काय.. योगायोगानेच! एक भक्त त्याला प्रश्न विचारत होता. ( भक्त आणि तमाम शिष्य गण यांचे मुख्य मार्केट आहे.)
(स्वामी भगवा डगला घालून एका खोलीत गुबगुबीत गादीवर बसले होते. कपाळावर टिकली एवढ कुंकू. गळ्यात उपरणं. उदबत्ती आणि धुपाचा सुळसुळाट..स्पष्ट दिसू नये इतपत. 'ॐ' वाजणारी टेप. खोलीबाहेर गर्दीचा आव. )
भक्त : स्वामी ,  अर्घेश्वराय नम: !!! ( हे या पंथातलं 'Hello' किंवा नमस्कार शी समानार्थी ब्रीद. आणि अर्घेश्वर स्वामी हे यांचे   नामकमल! हा भक्त इतर आणि स्वामी यांना जोड़णारा दुवा आहे. मधली खाबुगिरी आणि लोचटगिरी चांगली जमते यांना )
स्वामी : कल्या SSSSSSSS ण !!!! (आणि मागे घंटेचा आवाज --- back ground music हो ....!!!!)
भक्त :  प्रातर्विधीत काही बाधा तर नाही ना ..!! ( भलते अर्थ काढू नका .... संध्या, पूजा, ध्यान वगैरे म्हणायाचं  आहे !!)
स्वामी : क्षेम आहे (उपकाराचे  भाव . नाहीतर  भाव कसा मिळेल?? )
भक्त : (छताकडे बघून आणि हात उगीच वर नेऊन) अनंत उपकार आहेत !!! (समोर साक्षात् दत्त बसल्याचा भाव.आणि यांच्या प्रातर्विधी मुळे उपकार कसे झाले  कोणास ठाऊक! ) काही गण आले आहेत ( जण च्या ऐवजी चुकून गण आलं बहुतेक तोंडात)
(काहीही न बोलता स्वामी मान डोलावतात. भक्त मागे वळून खेकसतो )
भक्त : दोघांना पाठव रे !!!! ( आत पाठवणारा गुपचुप दोघांना आत पाठवतो. याचा खिसा ही 'गळकी' दक्षिणा पेटी आहे हे लक्षात येतं.)
(दोन जण आत येतात. शिकविल्याप्रमाणे नमो नम: करतात आणि अपराध्यासारखे मान खाली घालून उभे राहतात.)
भक्त :स्वामी गांजले आहेत हे. काही प्रश्न घेउन आले आहेत.
( त्याला 'गंजले' म्हणायाचं असेल . सारखा चुकतोय हा दुवा. ते  दोघं गांजलेले  नक्कीच वाटत नव्हते . सुटलेलं पोट आणि फवारलेले कपडे घालून गांजलेले कमी पण माजलेले जास्त वाटत होते. एकमेकाना ओळख़त नसावेत. स्वामी काहीही न बोलता तोबरा प्राशन करून असतात. मंद स्मित करून मान डोलावतात. भक्त पात्र पुढे करतो. स्वामी त्यात पेंटिंग सुरु करतात.)
प्रश्नार्थी १: बिझनेसमन आहे. पैसा खुप आहे. पण झोप शांत नाही.
स्वामी: (स्मित चालूच आहे) या उपभोगाच्या मायाजालातून  कोण सुटले आहे? मोक्षाचा मार्ग खडतर आहे.
प्रश्नार्थी ला काहीही कळत नाही. तो पुन्हा तोच वाक्य उच्चारतो ' पण झोप येत नाही.'
(डॉक्टर कड़े जायचं सोडून इथे का आलाय हा ......??)
स्वामी: ( पेंटिंग करत ) ध्यान धारणा करा. प्रभूच तुम्हाला मार्ग दाखवेल.
(भक्त तर आडवा पडण्याच्या बेतात आलाय. वाकून वाकून..
( प्रश्नार्थी बहुतेक झोप विकत घ्यायच्या उद्देशाने आला होता. त्याला असलं काहीतरी म्हणजे चेष्टाच वाटली. त्याने परत एक प्रयत्न करून बघितला)
प्रश्नार्थी 1 : जमवलेला पैसा निघून  तर जाणार नाही याची सतत चिंता वाटते. लक्ष्मीचा लहरीपणा तुम्हाला माहितच आहे.
(या वाक्याने स्वामी जरा चपापतात. याला कसं माहीत अस एक प्रश्न चाटून जातो. पुन्हा भानावर येउन स्मित क्रमश: चालू...)
स्वामी: दान करा(मला दया) गरजूंना मदत करा. आश्रमासाठी खर्च करा. कल्याण होइल. चिंता मुक्त होशील. ..!!!
(प्रश्नार्थी भारावून जातो. नमस्कार वगैरे करून पाठ न दाखवता मान वाकवून उलटा चालत जातो . भक्त बाहेर खूण  करून योग्य तो निरोप पोचवतो
आता पाळी दुसरयाची)
प्रश्नार्थी २: स्वामी तुम्ही वेद आणि गीता  वाचलेत का ? मला काही प्रश्न आहेत. तुमचा सल्ला घ्यायला आलोय.
(पहिलाच बॉल बाउंसर. दोन क्षण स्वामी आणि भक्त त्याकडे पहातच बसतात. हा अता याची विकेट  घेणार असं वाटून मीही खुष होतो.)
स्वामी: बोल वत्सा..(नाही म्हणून कुठे जाणार ....)
प्रश्नार्थी २: माणूस मेल्यावर त्याच्यासाठी उदक का सोडतात ?
(यॉर्कर... डायरेक्ट बुंध्यात !)
स्वामी: आत्म्याला शांती मिळावी म्हणून वत्सा...!(अत्तापुरती वाचवली विकेट)
प्रश्नार्थी २: एखाद्या संगमावर पाणी सोडून मेलेल्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? आणि एवढीच इच्छा असेल तर तो जिवंत असताना असं का करत नाहीत?
(स्वामींना घाम फुटतोय. भक्त प्रश्नार्थी कड़े रागाने अणि स्वामींकडे आशेने बघतोय.)
(अर्धा मिनिट कोणीच काही बोलत नाही. स्वामी पाणी मागवतात. पण पीतच  नाहीत. वेळकाढूपणा... दुसरं काय ..?)
प्रश्नार्थी २: गीतेत म्हटल्याप्रमाणे माणूस आपले कर्म करत असतो. ते त्याने केलेच पाहिजे. चालू असलेला जन्म त्याच्या पाप पुण्याचा हिशोब आहे. मग अतिरेकी जे करतायत त्याला काय म्हणायाचं?
(आता भक्तही बेशुद्ध व्हायच्या मार्गावर  आहे. स्वामींचा बहुतेक हा विषय राहिला असावा दोन चारदा. स्वामी विश्रांतीची वेळ झाली म्हणून उठतात आणि पुढची Appointment देतात.)

श्रद्धेचा बाजार झालाय सध्या. आणि या सारख्या स्वामींमुळे खरया साधक लोकांची सुद्धा चेष्टा होतीए. लोकांनी ठरवायाला हवे. अशा तोतया लोकांना किती थारा द्यायचाते.
मी त्या प्रश्नार्थी ला जाऊन भेटलो. तो एक पत्रकार होता. संस्कृत  मधून डिग्री घेतली होती.  आणि आशा बाबा लोकांचे बिंग फोड़ण्याचे एका संस्थेचे काम करत होता. कौतुक वाटले. तोही उत्साहात होता आणि पुढच्या appointment ची नोंद करून निघून गेला. अजुन एका स्वामींकडे!!!

Sunday, February 21, 2010

लढाई

मी लढाई मांडली जेव्हा स्वत:शी
घाव बुद्धीने दिला होता मनाशी

काय होता माज आलेला मतीचा
काय झाला खेळ भांडूनी कुणाशी

आर्जवे केली जरी त्याची हजारो
ठाम होता आज तो अपुल्या मताशी

थोरव्यांनी धीर ही मजला दिलेला
पाठ फिरता शेपटी त्यांची बुडाशी

लाळ गाळी  जात कुत्र्यांची भिकारी
चाटुनी टाचा जमविती आज राशी

दान देताना खिसा माझा रिकामा
भीक घेता फाटली झोळी उपाशी

शेवटी जाता चितेवर प्राण माझे
आसवांची वाट मी पाहे चितेशी

 -----आदित्य देवधर

चंद्रसाक्षी

तुझ्याकडेच पाहुनी निमिष मात्र एकदा
पुन्हा पुन्हा उरातुनी उसळला ग चंद्र हा

कधी न जाणली तुझी मौनबद्ध मालकी
कधीच हा गुलाम तू पूर्ण जिंकला पहा

तुझ्याच आठवांतुनी रोज सांडला सडा
फुलून मोगरा तुझा दरवळेल गंध हा

ललाट रेषीचे तुझे लाल बिंब देखणे
सकाळची उजाडती स्वर्गसुन्दरी तरहा

हळूच डोळीयांतुनी तू भावपूर्ण पाहिले
कसे असेल वाटले समीप येउनी पहा

मुक्त सोडुनी दिली मनातली मी पाखरे
तुझ्याकडेच धावली न सांगता कुणी स्वत:

चंद्रसाक्षी प्रेम हे जपून ठेव साजणे
देह श्वास भारुनी अशीच व्यापुनी रहा

----- आदित्य  देवधर

नकळत....

नकळत सारे घडून जाई कधी न लागे पत्ता
स्वप्नांमधुनी  स्पर्शामधुनी ह्रुदयामाधुनी
तुझीच मूर्ती तुझीच तू अलबत्ता
आता कुठे जगाची चिंता

मी हरवलो विकला गेलो लिलाव माझा झाला
तुझ्या रुपाने केली खेळी खेळ संपला सारा
गुलामीतही आहे गोडी, तुझी गुलाबी सत्ता
आता कुठे जगाची चिंता

रस्ते वाटा गल्ली न गल्ली तुझ्याच घरला धावे
दिशादिशातुन कणाकणातुन तुझे चित्र उभरावे
आहेस तू जर अवतीभवती अशीच येताजाता
आता कुठे जगाची चिंता

ठाऊक आहे मजला तुझिया गुपीत हृदयातले
गवताचे मऊ पाते ओले  लवलवते पावसातले
भान हरपुनी तू  भिजलेली मिठीत माझ्या असता
आता कुठे जगाची चिंता


------ आदित्य देवधर

मन जुळले

शब्दाशब्दातून मन जुळले
घडले कसे हे सांगशील काय
स्पर्श रेशमी देऊन जाते गालावरची गुलाबी साय

खुणा दिशांच्या विस्कटलेल्या
काळवेळचे भानही नाही
वाट विचारी पत्ता मजला
काही केल्या उमगत नाही
तरी पावले रस्ता तुडवी दिशा तयांना देशील काय

डौलदार कमळावरती
पाण्याचाही मोह जड़े
सूर मारुनी क्षणोक्षणी
निर्झरातुनी उदक पड़े
सूर उधळूनी प्रीत झरा तुषार अंगी उडवून जाय

निर्मळ सुस्वर येती कानी
हसतेस मलमली जेव्हा
कृष्ण सावली सळसळती
केसात माळशी  तेव्हा
छाया निर्मळ प्रेमाची तू केवळ मजला देशील काय

फुलेही पड़ती फिकी जयाने
गंध तुझा मी ल्यालेला
कोकीळ होई मुग्ध बापडा
सूर तुझा ओठी आलेला
प्रेमबंध  सार्थकतेची पावती मजला देशील काय 

------ आदित्य देवधर

विसर

धुंदीत फुलला पिसारा मनाचा
खुजा वाटताहे पसारा नभाचा
तुझा स्पर्श होता मन हे थरारे
जसा थेंब पाण्यावरी पावसाचा

गर्द नभ काळा मनी दाटलेला
वरुण  तयाची खूण झाकलेला
बरसला शुष्क कोरड्या धरेवर
चिंब भिजला जीव चातकाचा

दूर उभी ओली भिजलेली
मिठीस माझ्या आसुसलेली
मृदगंध स्वच्छंद  उन्मत्त होता
विसर पडला क्षणाक्षणाचा

पावसात रे  भिजता भिजता
ओला स्वर कानी रुणझुणता
मोती गालांवर ओघळता
टिपून घे हा क्षण प्रेमाचा

साक्ष द्यावया हाजिर सारे
अड़खळलेले श्वास सख्यारे
डोळे मिटूनी सावरला मग
धडधडता आवेग उराचा

सौख्य लाभले असे मला
सजवूनी  तव मोह  झुला
हिंदोळे घेताना  अलगद
विसर पडला क्षणाक्षणाचा

------- आदित्य देवधर

Monday, February 15, 2010

तुला की मला

सूर अनोखे  निनादले
तुला दिले की मला दिले
कसे कुणास लाभले
तुला दिले ते मला दिले

गंधर्वाने तार छेड़ता
आसमंत व्यापून जाता
रंग नभी जे मधाळले
तुला दिले की मला दिले

मिसळून जाता रंगांमधुनी
भाव मर्म रूपात न्हाउनी
चित्र मनीचे चितारले
तुला दिले की मला दिले

तान थिरके न्यास मांडुनी
मल्हाराचे गीत गाउनी
थेंब धरित्रीवरी झुले
तुला दिले की मला दिले

वास करुनी अनंतातुनी 
ज्योत कोवळी देही तेवुनी
जीवन अमृत शिंपडले
तुला दिले ते मला दिले

 ------- आदित्य देवधर

चाहुल

इंद्रधनूच्या कड़ेकडेने अन किरणांच्या पडद्याआडुन
मंद लालसर सायंकाळी वारा फिरला उन्हें थबकली
जशी पाउले तुझी वाजली

पानांवर ओझरते पाणी हबकले जागीच थबकले
जाळीतुन विणलेली खूण दिसे परि मार्ग खुंटले
क्षणार्धात पानापानातुन नाजुक सळसळ झाली
जशी पाउले तुझी वाजली

वारा धावे सैरावैरा भान विसरुनी  क्षितीजाचे
वीज डोकवी दाट ढगांतुन आभाळी करुनी खाचे
तुझ्या स्वागता थेंब निघाला चाहुल तुझी लागली
जशी पाउले तुझी वाजली

फुले तयांची करती उधळण भ्रमरही घिरट्या घाले
ओल्या हिरव्या वाटेमधुनी ओला मृदगंध दरवळे
वसुंधरेच्या कणा कणावर तुझीच जादू झाली
जशी पाउले तुझी वाजली

दूर वळणावर भिजलेली हसलीस तू पाहून मला
डोळ्यामधुनी अंतरातल्या शब्दांना आवाज दिला
रंगांची लेउन  झालर सांज मन्मनी हसली
जशी पाउले तुझी वाजली

------आदित्य देवधर

तुझा...

शब्दात सापडे अर्थ तुझा गीतामधुनी भाव तुझा
रडतानाची ओढ़ तुझी अन हास्याचा रंग तुझा

थेंब गवतावरती पिवळ्या ओलावा थेंबात तुझा
लवलवणारी नाजुक पाती भिजण्याचा भास तुझा

संध्यासमयी पश्चिमेकडे लाल केशरी रंग तुझा
रात्रीच्या काळोखामधुनी अंधारी एकांत तुझा

चंद्र चांदणे  अवकाशी निरखे सुंदर रूप तुझे
नक्षत्रांची तुझी पालखी अन पुनवेचा चंद्र तुझा

पाट पाट वाहे सरितेचा ओघवणारा मोह तुझा
सागरातुनी मिसळून जाण्या आतुरलेला थेंब तुझा

रूप पल्लवी तुझी अनोखी रसिक फुलांचा रंग तुझा
गंध वाहतो दिशादिशातून पण वारयाचा रोख तुझा

शब्दांवाचुन गाणे माझे गाणारा आवाज तुझा
मौनातुनही  मर्म उमजुनी  ऐकू येई सूर तुझा


-------- आदित्य देवधर

ग्रहण

कधी फाटलेला नभ माझ्या दिशेला
कधी थेंब परक्यास भिजवून गेला

मी वाट चाळलेली सोडून मुक्त झालो
पक्षी उडून गेला पिंजऱ्यात कोंडलेला

सोंगटी नसे उरली पटावरी तयाच्या
भिकारी तरी अपुले दान टाकून गेला

रातीस झोपलेली बद-जात माणसांची
मौनासवे तमाचे तो खेळ मांडून गेला

ओठांवरी उमटता तम-शब्द गूढ काही
ऐकून चंद्र भासे मजला ओशाळलेला

वाती जळून रात्री तेलात काजळीच्या
प्रकाशाने उपाशी अंधार चाख़लेला

सूर्यास झाकणारा छायेतुनी स्वत:च्या
कित्येक धुंद राती उजळून भोगलेला

ग्रहण लावणारा अवसेस फक्त मजला
मिरवुनी उधारीच्या तेजात गोठलेला

----- आदित्य देवधर

सावर सखे

श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर
नाव धाव घेऊ पाहे सोडुनीया तीर

ओठ टेकवून माथी उष्ण उष्ण भास
कोवळे तव कुंतल गाली चेतविती श्वास
नयन ओघळी चिंब भिजलेले नीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

जीव ओतुनी वदती पापण्या गुलाबी
भाव डोळ्यातले धुंद भासती शराबी
गूज काय सांगतो मुकेच पैलतीर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

स्वप्न तुझे आतले हळूच सौम्य हासले
अबोल तुझे सूर मला प्रेमगीत भासले
पात्यांवर प्रीतछंद न्यास झिरझिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

शोधू पाही पारा अवघे थेंब करी गोळा
ह्रुदयाचाही चाले मग धडधडता चाळा
कोर नांदुनी ओठांवर नजर भिर भिर
श्वास तुझा सावर सखे जीव सैरभैर

---- आदित्य देवधर 

शपथ

दीर्घ दीर्घ श्वासांचे वादळ
तप्त सख्त रक्ताची सळसळ
उचंबळूदे गगनी भिडूदे
ठोक बिलंदर मेघ गर्जना उभी धरा गलित गात्र होउदे

झटकून झापड़ क्षुद्र मतिचे
तोड़ बंध बुरसट जातीचे
गंध माखुनी तव  रक्ताचे
भीष्मरक्त मग  रक्तापाशी ललकारी देण्यास निघूदे

व्यसने मम चरणांच्या पाशी
आसक्ती झटकली सुखाची
चिता जाहलो स्वत: स्वत: ची
ज्वालाही आक्रंदून माझ्या भ्रष्ट मत्त जंजाल फुंकूदे

लगाम घे दुनियेचा हाती
लक्ष लक्ष पेटवून वाती
धारदार खड्गाची पाती
लवलवती सरसावून हाती बंडाचे रणशिंग फुंकूदे

शपथ तांबडया इतिहासाची
निरपराध अमुच्या रक्ताची
पात चमकावून परशूची 
कफ़न ललाटी बांधून अंगी कालीचा संचार होउदे

-----आदित्य देवधर