शब्दात सापडे अर्थ तुझा गीतामधुनी भाव तुझा
रडतानाची ओढ़ तुझी अन हास्याचा रंग तुझा
थेंब गवतावरती पिवळ्या ओलावा थेंबात तुझा
लवलवणारी नाजुक पाती भिजण्याचा भास तुझा
संध्यासमयी पश्चिमेकडे लाल केशरी रंग तुझा
रात्रीच्या काळोखामधुनी अंधारी एकांत तुझा
चंद्र चांदणे अवकाशी निरखे सुंदर रूप तुझे
नक्षत्रांची तुझी पालखी अन पुनवेचा चंद्र तुझा
पाट पाट वाहे सरितेचा ओघवणारा मोह तुझा
सागरातुनी मिसळून जाण्या आतुरलेला थेंब तुझा
रूप पल्लवी तुझी अनोखी रसिक फुलांचा रंग तुझा
गंध वाहतो दिशादिशातून पण वारयाचा रोख तुझा
शब्दांवाचुन गाणे माझे गाणारा आवाज तुझा
मौनातुनही मर्म उमजुनी ऐकू येई सूर तुझा
-------- आदित्य देवधर
Monday, February 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment