दीर्घ दीर्घ श्वासांचे वादळ
तप्त सख्त रक्ताची सळसळ
उचंबळूदे गगनी भिडूदे
ठोक बिलंदर मेघ गर्जना उभी धरा गलित गात्र होउदे
झटकून झापड़ क्षुद्र मतिचे
तोड़ बंध बुरसट जातीचे
गंध माखुनी तव रक्ताचे
भीष्मरक्त मग रक्तापाशी ललकारी देण्यास निघूदे
व्यसने मम चरणांच्या पाशी
आसक्ती झटकली सुखाची
चिता जाहलो स्वत: स्वत: ची
ज्वालाही आक्रंदून माझ्या भ्रष्ट मत्त जंजाल फुंकूदे
लगाम घे दुनियेचा हाती
लक्ष लक्ष पेटवून वाती
धारदार खड्गाची पाती
लवलवती सरसावून हाती बंडाचे रणशिंग फुंकूदे
शपथ तांबडया इतिहासाची
निरपराध अमुच्या रक्ताची
पात चमकावून परशूची
कफ़न ललाटी बांधून अंगी कालीचा संचार होउदे
-----आदित्य देवधर
Monday, February 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment