Pages

Thursday, March 31, 2011

जगण्याची ही मौज निराळी

जगण्याची ही मौज निराळी
मुक्त उडावे चिर आभाळी
तुडवून शिखरे उंच ढगांतील
लेऊन घ्यावे चंद्र कपाळी
हे जगण्याची मौज निराळी

हर रातीची नशा पिऊनी
अंधाराशी डाव मांडुनी
वळवू फासे मनाप्रमाणे
जिंकू अस्तित्वाची खेळी
हे जगण्याची मौज निराळी

झटणा-याचे हात बनू अन
उडणा-याचे पंख बनू
नाठाळांना वज्र बनोनी
हाणू दंडे भ्रष्ट कपाळी
हे जगण्याची मौज निराळी

एक वस्त्र भगवे अन हाती
निधडी शस्त्रे, निधडी छाती
मनगटावरी बांधून तारे
भिडू सर्वदा काळोखाशी.
हातावरच्या आखू रेषा
अमुच्या आम्ही, या आवेशा
मशाल देउ स्वातंत्र्याची
बंड उभारू चंडाळाशी
शपथ घेउनी अशी निघालो
आदित्याला स्मरून निघालो
लोळ वन्हीचे उडवून जाळू
घोर पिशाच्चे काळी काळी
हे जगण्याची मौज निराळी
तुडवून शिखरे उंच ढगांतील
लेऊन घ्यावे चंद्र कपाळी
जगण्याची ही मौज निराळी

---आदित्य देवधर

1 comment:

समीर चाफेकर said...

अप्रतिम ... :)