असे कोणते पाप माझिया हातुनि घडले
किती भोगले दुःख तरीही कमीच ठरले
स्वयंवराच्या सोहळयात संयोग घडावा
तिथेच नियतीचा हा ऐसा डाव जुळावा
चुकले का मी मनोमनी श्रीरामा वरले?
सुखात होती मिथिलानगरीमध्ये जानकी
डोलत होती ऐश्वर्याची जणू पालखी
सोडुन सारे मी रामाच्या रंगी रमले
राज्याची नव्हतीच मनीषा मजला काही
जरी होतसे जयजयकार दिशातुन दाही
तरी तेवढे कारण शिक्षेसाठी पुरले
वरदान कुणी मागावे अन ते मी भोगावे
वने तुडवुनी अरण्यातुनी वास करावे
नशीबाचेही असेच काही होते ठरले
श्रीरामांच्या संगे केला राज्यत्याग मी
भगवे वल्कल नेसुन त्यजिली माझी भूमी
अन पदराशी शंकेहुन काही ना उरले
दु:खाचाही असा सोहळा आम्ही मांडला
आनंदाने छोटासा संसार थाटला
वैराग्याचे सुख नियतीला अशात सलले
पतिव्रता मी, हरुनी गेला रावण मजला
आकाशाचा श्वास नभातुन तिथेच थिजला
अंधारापलीकडले मज काही ना दिसले
जपले मी पावित्र्य मनाचे अन शरीराचे
भकास परी मी जगले जीवन सन्मानाचे
आकांते डोळ्यातील अग्नी देखिल विझले
साद घातली कितीकदा श्रीरामा तुजला
सोडव येउन कैदेतुन कायमचे मजला
विश्वासाच्या श्वासावर केवळ मी जगले
असुरांचा संहार जसा केला श्रीरामा
सीतेचीही परतुनिया आली मग गरिमा
शंकेचे परि काहूर मनी का ऐसे उठले
दगड ठेवुनी छातीवरती थेट निघाले
प्रवेश करुनी अग्नितुन मी पवित्र झाले
परीक्षेत या अनलाचेही डोळे भिजले
पावित्र्याची अशी परीक्षा का मी द्यावी
अन रामाची सुटका यातुन सहजच व्हावी
मीच एकटी का हे पातक घेऊन फिरले?
अता पोरकी झाली श्रीरामाची सीता
चारित्र्याच्या प्रश्नावर उरला ना त्राता
संशय घेणाऱ्यांशी का श्रीराम ना लढले?
न्याय मला मिळवोनी देण्या कुणी न आले
ना लक्ष्मण वा हनुमंताचे मन गहिवरले
भक्त फक्त रामाचे सारे कट्टर ठरले
पुन्हा घडे वनवास अता कायमच्यासाठी
राम उभा पुरुषोत्तम होउन लोकांपाठी
दुःख एकट्या मातेचे मातीतुन विरले
आदित्य