Pages

Thursday, December 2, 2021

ओला पाऊस पाऊस


ओला पाऊस पाऊस 

आला अनाहूतपणे

उभ्या डोळ्यांत डोळ्यांत

चांदण्याचे बरसणे


निखळून गेली पार

हळवीशी मोती माळ

आठवांचा तळ्याकाठी

थिजूनिया जाई काळ


चिंब बरसे अल्लड

ढग पांघरून झूल

गंध-मातीचे उभारे

नभापर्यंतचा पूल


भिजूनिया कवडसे

उतरती अंगणात

खेळ चाले पावलांशी

अन हुंदका मनात 


धुके खिडकीमधुनी

पसरते घरातून

ओला निरोप मिळतो

पानांवर दवातून


गेला पाऊस पाऊस

मागे सोडून उसासे

स्वप्नांमधून उरती

रोज रोजचे दिलासे


आदित्य

Thursday, November 18, 2021

अमृत गोडी

आयुष्याला अवघ्या लाभो

अनंत अमृत-गोडी

पदरी लोभसवाणी सुंदर

नक्षत्रांची जोडी


नभी विलक्षण उत्सव

घडतो अमूर्त आनंदाचा

उजळुन जाई उत्साहाने

पडदा अवकाशाचा


ममतेचा गंगौघ कोसळे

मनात ठायी ठायी

हृदयी कवटाळूनिया होई

धन्य धन्य ती आई


काळोखाला उजळुन आली

सूर्याची नव किरणे

आता केवळ उत्साहाने

आनंदाचे झरणे


अद्वैताचे बंध जुळूदे

लक्ष्मी सरस्वतीचे

आशीर्वाद उभयतां लाभो

अखंड शिवशक्तीचे



आदित्य


Tuesday, November 2, 2021

उजळू दे

उजळू दे हळुवार स्मृतींना
सुगंध- ज्योती दिव्या दिव्यातुन
ओल्या हळव्या आठवणींचा
फुटु दे पान्हा मनामनातुन

उजळू दे तिमिराच्या गगनी
धगधगणारी सूर्य चेतना
लक्ष लक्ष मार्तंड तारका
प्रकाशण्याची पूर्त कामना

उजळू दे नात्यांच्या ज्योती
हृदयातील अंधाऱ्या काठी
जिवंत सारे आज किनारे
मैत्र प्रवाही करण्यासाठी

उजळू दे अज्ञानी कुंभ
अमृत घेऊन विज्ञानाचे
अवकाशाच्या पटलावरती
दीपक ज्ञानी नक्षत्रांचे

उजळू दे शस्त्रांच्या अंगी
लखलखणारी तेज-शलाका
नाश होउदे रिपू रिपूचा 
विजयाची चढवून पताका

उजळू दे सौख्याचा दीपक
स्वागत करण्या आनंदाचे
मंतरलेल्या ऐन दिवाळी
उज्ज्वल नाते सौभाग्याचे

Tuesday, October 26, 2021

कधी सांजवेळी

कधी सांजवेळी तुझ्या आठवांच्या
नभी पावसाचे फुलोनी पिसारे
उठे दरवळूनी उरी गंध- लाघव
व्यापून अवघे मनीचे किनारे 

सरी कोसळाव्या जशा पावसाच्या
तसे तू मिठीतून भेटून जावे
उत्फुल्ल व्हावे, अंगी रुजावे,
गंधाळलेले शहारे शहारे 

असे ओघळावेस स्पर्शामधूनी
कवळून साऱ्या मुक्या जाणिवांना
जसे स्वर व्हावे उरी भावनांवर
बेभान ओथंबुनी रानवारे

सखे सोडूनी ये खुळ्या बंधनांना,
घेऊन स्वप्नील रंगी क्षणांना 
उभा वाट पाहे इथे एकटा मी
आणि एकटे गंध वेडे किनारे


Thursday, October 21, 2021

काय सांगू

 आसवांची मी कहाणी काय सांगू....

प्रेम का ठरले अडाणी, काय सांगू ...


खेळ अर्ध्यातून का सोडून गेले

तोच राजा, तीच राणी, काय सांगू ...


मोजकी उरलीत आता फक्त मागे

तेवढी गीते पुराणी, काय सांगू...


भेटलो जर आठवांच्या लक्तरांशी,

ओळखीची मी निशाणी काय सांगू ?


रोज माझ्या मैफिलीमध्ये अताशा,

नांदते केवळ विराणी, काय सांगू...

Saturday, April 17, 2021

निचरा

पाऊस ओळखीचा जेव्हा पडून गेला,
निःशब्द भावनांचा निचरा करून गेला

ही कोणत्या स्मृतींची चाहूल आज लागे
की पेटता निखारा, नुकता जळून गेला?

मी न्याय आंधळ्यांचे जेव्हा अमान्य केले
जो जो दिसेल तो तो मजला हसून गेला

हा दोष ना तुझा की हे प्रेम होत गेले,
मी मोहरून गेलो तो क्षण जगून गेला

मी मानले स्वतःचे गुणदोष सर्व काही
तेव्हा अहं स्वतःचा पुरता जळून गेला

मी वेचल्या फुलांचे निर्माल्य आज पुन्हा
आषाढ आठवांचा ताजे करून गेला

श्वासांत चांदण्याचे स्फुरले सुरेल गाणे
ओठांस चंद्र माझ्या वेणू करून गेला

आदित्य

Thursday, April 15, 2021

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा

राहिल्या मागे कुठेशी सावल्या डोहातुनी,
आजही येतात ऐकू खोल जखमांच्या कळा

सांडतो शब्दांमधूनी भावगंधाचा सडा,
सोसतो प्राजक्त राती चांदण्याच्याही झळा

सत्य माझे शोधण्या प्रतिबिंब माझे पाहिले,
भासला मज आरसाही सत्यवादी आंधळा

जन्म मृत्यू जोडणारा एक माझा पूल हा,
दुःख माझे एकट्याचे, एकट्याचा सोहळा

सोडुनी जाता कधी मी देवळातिल पायरी
देव झाला बंधनामधुनी स्वतःच्या मोकळा

आदित्य

Monday, April 12, 2021

रंगवू अंधार माझा

आंधळ्या अश्रूंमधूनी दाटतो हुंकार माझा,
'कोणत्या रंगात आता रंगवू अंधार माझा?'

स्वप्न दैवी सूर-लाघव होत गेले चांदण्याचे,
हाय येता जाग मागे राहिला गंधार माझा!

सोडवावे वाटले बेड्यांतुनी मजला तरीही
कोण जाणे का कुठेशी अडकला ओंकार माझा!

काळजाचे लख्ख तुकडे वेचुनी मोजीत बसलो,
मेळ नाही लागला अन हारला व्यवहार माझा.

राहतो ज्वालामुखी उद्विग्न माझ्या अंतरी अन
जाळतो आतून लाव्हा, पेटतो अंगार माझा!

आरसा बस तेवढा सांभाळतो माझ्या कथेतिल
एकट्याचे प्रेम आणिक एकटा शृंगार माझा

आदित्य

Thursday, April 1, 2021

पण कसे विसरून जाऊ

लाख तू म्हणशील आता, पण कसे विसरून जाऊ?
पेटवू साऱ्या स्मृती आगीत की विझवून जाऊ?

हाय मी गंधाळल्या श्वासांस माझ्या काय सांगू...
वादळे आणू पुन्हा की मृण्मयी मिसळून जाऊ?

आठवांची पालखी मी एकटा वाहू कुठेशी?
वाटले होते तया दोघे मिळुन उचलून जाऊ.

स्वप्न राहूदे सुगंधी तेवढे लाघव-क्षणांचे.
एवढे कर की अता स्वप्नी तरी हरवून जाऊ.

मालवू शकशील का तू ज्योत माझ्या आसवांची?
की स्वतःच्या भावनांची ओलही जाळून जाऊ?

पान-पाचोळा क्षणांचा सांडला इतका अचानक
की शिशिर सुद्धा म्हणे 'थोडी फुले उधळून जाऊ!'

आदित्य

Tuesday, March 23, 2021

शहीद-पर्व

मुक्त मोकळ्या स्वातंत्र्याचा साज चढवला मातेला
अर्पण प्राणांच्या ज्योती उगवाया स्वतंत्र सूर्याला
सुपुत्र तू अवतार ईश्वरी तारून नेले देशासी
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

बीज रोवले अभिमानाचे तू कणखर मातीमध्ये 
कल्पवृक्ष बहारोनी आले ओजस्वी हृदयामध्ये
स्वप्न उतरले वास्तवामध्ये पडलेले जे आईला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

तेजस्वी बलिदानाचे फळ आज भोगतो गर्वाने 
उंचावुनिया मान, दाखवू दिशा यशाची ज्ञानाने
हीच आज श्रद्धेची ओंजळ अर्पण दैवी त्यागाला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

एक असे वरदान दे अम्हा, नको करंटेपणा अता
अंश तुझ्या रक्ताचा लाभो ठायी ठायी इथे अता
तुझ्याच आशीर्वादाने मग बळ देऊ या देशाला
नतमस्तक मी चरणी करतो वंदन शहीद-पर्वाला

आदित्य

Sunday, March 21, 2021

कृष्ण सख्या..

घननीळ्या पावसापरी नित येत रहा तू
आठवणींचे मोरपिसारे देत रहा तू

वास्तवातली नाती अपुली नसोत जुळली,
स्वप्नांच्या आनंद महाली नेत रहा तू

अधीन रे आहेच तुझ्या मी अष्टौप्रहरी,
तरी सुगंधी स्वरांतुनी मोहीत रहा तू

नको वाजवू पावा आता दुसरा कुठला
श्वास माझिया वेणूतुन फुंकीत रहा तू

दहा दिशांतुन तुला भेटण्या जावे वाटे,
जाणाऱ्या प्रत्येक नव्या वाटेत रहा तू

विरह नको अन त्याग तुझा मज नकोच आता,
कृष्ण सख्या , या राधेच्या समवेत रहा तू

आदित्य

कविता

कुठे जरासा अवघडलेला 
विचार येता घडते कविता
अव्यक्ताच्या डोहातुन मग
जिवंत अवखळ झरते कविता

बंद कुंद कोनाड्यामधुनी
एक स्वयंभू ठिणगी पडता
अंधाराच्या कडेकडेने 
प्रकाशणारी दिसते कविता

अतर्क्य अघटित लाटांवरूनी
स्वार होऊनी बळ जी देते
आयुष्याच्या वादळातली
जन्मजान्हवी ठरते कविता

सृजनाचे वरदान होऊनी
अशी लेखणी झरू लागते,
आईच्या उदरात जणू की
गर्भ होऊनी स्फुरते कविता

स्वप्नांच्या अन क्षितिजांच्याही
पल्याड मजला घेऊन जाते
आणिक माझ्या अस्तित्वाचे
रूप घेउनी फुलते कविता

अथांग काळ्या कागदावरी 
शब्द मनस्वी उधळण करता
अवकाशाच्या पटलावरती
नक्षत्रांची बनते कविता

तुटलेल्या हृदयाच्या तारा
जोडत जातो कसाबसा मी
आठवणींच्या पडद्याआडुन
रोज निरंतर झुरते कविता

नभात काळ्या अश्रू अवघे
पाऊस होऊन साठत जाता
बांध फुटावा नयनी तैसे
ढगातुनी कोसळते कविता

आदित्य

Friday, March 5, 2021

परतीचा प्रवास

परतीच्या वाटेने चालू प्रवास आता..
हिशोब सारे सांगावे मी कुणास आता..?

रमता रमता बागेमधल्या फुलांमधूनी
दरवळतो मी होउन तेथे सुवास आता

सोन्याच्या घरट्यातिल पक्षी होण्यापेक्षा
सोडुन देतो मुक्त मोकळे मनास आता

इतक्या झाल्या शोभेच्या या इमारती की,
देव नकोसा वाटावा मंदिरास आता?

दहा दिशांतुन बघतो मी बहराचा मौसम
कुठेच नाही शिल्लक काही भकास आता...!

उंबरठा ओलांडू कुठल्या क्षितिजावरचा?
दारे, खिडक्या, भिंती नाहित घरास आता

नव्या ठिकाणी असेल सारे हवेहवेसे..
तेवढाच तो काय दिलासा जिवास आता

शब्द तेवढे उरतिल मागे साक्ष सांगण्या..
आठवणींच्या पावसातल्या उन्हास आता

फूल गळोनी मिसळुन जाता मातीमधुनी,
मृदगंधाचे वस्त्र मिळावे तयास आता.

आदित्य