Pages

Tuesday, December 1, 2020

आज एकट्या संध्याकाळी

आज एकट्या संध्याकाळी तुझ्याविना मन उदास आहे
आठवणींचा गाभारा संदर्भावाचुन भकास आहे

सांडुन गेले आहे सारे गंधफुलांचे अत्तर आता
श्वास तरीही पारिजातकापाशी शिल्लक कशास आहे?

माझ्यापाशी नाही काही तसे तुला बघ देण्यासाठी
फक्त तेवढ्या शब्द कळ्यांचा मोहरलेला सुवास आहे

कोरे आहे पुस्तक माझे तशाच कोऱ्या आठवणींचे
परंतु पानांवरी पुसटसा ओरखड्यांचा समास आहे

संधिकाळचे रंग अताशा विरून जातील रातीमधुनी
इंद्राधनुष्यापासुन अवसेचा हा कसला प्रवास आहे?

आदित्य

Thursday, November 26, 2020

तेजाची गाथा

काळ्या करड्या ओंजळीतुनी
अर्घ्य वाहतो डोंगरमाथा
भव्य ललाटी निळ्या नभावर
पूर्वेला तेजाची गाथा

पहाटवारा होई भैरव
वाजविताना वेणू रानी
सळसळणाऱ्या झाडांमधुनी
सूर-भैरवी पानोपानी

नव्या जगाचे, उत्साहाचे
जणू बारसे रात-दिनाचे
केशर, पिवळे आणि तांबडे
रंग उधळती उल्हासाचे

चाले क्षितिजावरी तयारी
यज्ञ उषेचा मंगल होवो
तिमिराची देताच आहुती
ज्ञानसूर्य नित तळपत राहो

असंख्य किरणे घेऊन येतील
चाहुल अवघ्या उत्कर्षाची
फूल, पाखरे डोलत डोलत
गीते गातील आनंदाची

उजळून जाता दिगंत मंडळ
उजळुन सारे नवे जुने,
दिवसाची सुरुवात सुमंगल
होता जुळतील मने मने

आदित्य

पाऊस ओला..

श्रावणातला मेघ अजूनी
डोक्यावरूनी सरला नाही
पाऊस हल्लीचा आताशा
इतका ओला उरला नाही

मोरपंख फिरवून नभातुन
जरी जाहली कृष्ण संगती
तरी आज राधेस कुठेही
कृष्ण बापडा दिसला नाही

साद घालती कधी कवडसे,
कधी सरींचे थेंब परंतु
गाणे गुणगुणणारा कोकिळ
पानांमधुनी फिरला नाही

अंगणातला पाऊस झाला
डबक्यामधला गढूळ पारा
तिथेच उरला आणि साचला
परी कधी ओसरला नाही

सुकलेल्या वेळूचा पावा
आकस्मित अवकाळी भिजला
श्वास फुंकला असला तरीही
सूर मोकळा खुलला नाही

चंद्र, सूर्य, निस्तेज चांदण्या
लपंडाव मेघांशी करती,
राज्य चालता अंधाराचे
दिवा कुठेही दिसला नाही

सुकायला जरी आला पिंपळ
स्वप्नांचा अन विश्वासाचा
ओलाव्याचा पाऊस कोठे
जरासुद्धा गहिवरला नाही

आदित्य

Saturday, November 21, 2020

पाऊस थोडा

सोबत माझ्या तुझ्या असावा पाऊस थोडा
छत्रीतुन हळुवार गळावा पाऊस थोडा

कोसळून गेल्यावर सुध्दा आठवणींच्या
शहाऱ्यातुनी अजुन उरावा पाऊस थोडा

तुझ्या नि माझ्या मधले अवघडलेले अंतर
मिटवाया दररोज पडावा पाऊस थोडा

ऋतूगंध कोवळा नि हिरवा लेऊन अंगी
प्रेमाच्या मातीत रुजावा पाऊस थोडा

रूक्ष कोरड्या जमिनीवर सुकलेल्या बागा
भिजण्यापुरता तरी असावा पाऊस थोडा

आठवणींचे घेऊन वारे धुंद मोसमी,
तुझ्या ऋतूतुन रोज भिजावा पाऊस थोडा

आदित्य

Friday, November 20, 2020

वाट प्रीतीसंभवाची रोज मी पाहू किती
भेटण्यासाठी बहाणे सारखे आणू किती

आपल्यातले अंतर

तू जरी नसलीस येथे,
मी तुझ्यापाशीच आहे
आपल्यातले अंतर केवळ
सांगण्यापुरतेच आहे

तू मला दिसतेस सध्या
रोज कोठेही अचानक

Thursday, November 19, 2020

मला वाटते जे..

मला वाटते जे, तुला वाटते का,
कधी दुःख माझे उरी दाटते का?

असो सर्व काही, तरी प्रश्न पडतो..
कमी आज काहीतरी राहते का?

दिवास्वप्न माझे तुझ्या सोबतीचे
कधी वास्तवाचे, खरे भासते का?

मनातील माझ्या मुक्या भावनांचे,
तळे अंगणाशी कधी साठते का?

निळ्या सांजवेळी उभी स्तब्ध राधा..
निळ्या कृष्ण-वेणूसवे डोलते का?

पहाटे पहाटे तुला जाग येता,
स्मृती चिंब स्वप्नातली लाजते का?

कधी आज पुन्हा नव्यानेच अपुली,
नवी भेट व्हावी, असे वाटते का?

आदित्य

Tuesday, November 17, 2020

भरारी

मायेच्या पंखा खाली
एक पिल्लू होते छान
छोट्याश्या घरट्यामधला
आईचा तो अभिमान

आनंदे उद्भवणारा
नितदिनी असावा सण
चोचीने घास भरविता
ममतेची हो उजवण

इवल्याश्या पंखांखाली
बळ असोत वात्सल्याचे
घालील गवसणी ऐसी
की कळस खुजे गगनाचे

गरुडाची उंच भरारी
घेऊन दिले आव्हान
इवलासा तोच विहंग
उंचावून गेला मान

ममतेचा पाऊस येथे
आनंदाने पाझरतो
कीर्तीची , उत्कर्षाची
रुजवात निरंतर करतो

आदित्य

Sunday, November 15, 2020

आणि तू..

एक कॉफी, एक सिगरेट,
एक संध्याकाळ आणि तू

गरम गरम वाफाळलेल्या
गंधामध्ये विरघळलेल्या
थोडी कडवट थोडी गोड
चवीप्रमाणे आयुष्यातुन
डोकावणारी, गहिवरणारी, 
रेंगाळणारी आठवण तू

कॉफीच्या वाफेवर होतो
स्वार धूर अन एकच झुरका
पुरतो, झुरतो आणिक केवळ
आठवणींचा पिक्चर उरतो
तिथेच रुजते एकटीच जळणारी
माझी नशा नशा तू

शब्द उमटती, शब्द घसरती
भाव बिलोरी कागदावरी
अन कॉफीच्या वाफेसोबत
अश्रू झरता पावसापरी,
ओल्या ओल्या शाईमधली
अव्यक्ताची कविता तू

खेळ बिलंदर करुनी सारे 
रंग पसरती संध्याकाळी
तुझे हासणे, तुझे लाजणे,
कॉफीसोबत गुणगुणणारे
वाफेमधला स्पर्श जरासा
अंगी अंगी दरवळणारे
आयुष्याचे गाणे तू

आदित्य

Saturday, November 14, 2020

भेट अशी तू मला

भेट अशी तू मला की क्षण तो पुरेल मजला जगण्यासाठी
वाट तुझी मी बघेन पुन्हा पुन्हा भेटी घडण्यासाठी

ताजा आहे अजूनही तो स्पर्श तुझा अन सुगंध फुलवा
जपून ठेवीन काळजात मी आठवणीतुन झुरण्यासाठी

विचारले नाहीच तुला मी 'येशिल का तू सोबत माझ्या'
वाट परी पाहिली तशी मी उत्तर मजला कळण्यासाठी

शब्द कोरड्या कळ्याच उरल्या काळजातली घरे बनूनी
बंद पाकळ्या आतुर साऱ्या मोहरुनी उलगडण्यासाठी

दुःख तेवढे नाही की तू नाहीस माझ्या नशिबी आता
दुःख एवढे मात्र जरासा वेळ लागला कळण्यासाठी

आदित्य



दिव्य दिवाळी

तिमिर पसरला अथांग अपुल्या अवतीभवती
दहा दिशांतुन कैक क्षणांच्या असंख्य राती
प्रकाशमहिमा उजळुन येता काळोखातुन
अंधाराला सोबत अवघ्या आयुष्यातुन

काळाच्याही पलिकडल्या सृष्टीला व्यापुन
खेळ चालतो काळोखाचा उजेड झाकुन
सूर्य उगवतो अन मावळतो क्षितिजावरती
मिळून येती तेज-तमाची नवीन नाती

अंधःकारामुळेच आहे अर्थ दिव्याला
जळतो जेथे दिवा, उजळतो तिथे तमाला
लक्ष दिव्यांनी सजवू राती क्षणाक्षणांनी,
काळोखाच्या उसवू गाठी कणाकणांनी

असूदेत अंधार, तसाही असणारच तो
स्वतः स्वतःचा प्रकाश होता मार्ग गवसतो
अवसेला हो चंद्र, तळपता सूर्य सकाळी,
चला साजरी करू स्वयंभू दिव्य दिवाळी

आदित्य

Thursday, November 5, 2020

तर्पण

तेजस्वी ज्योतीचे तर्पण 
हृदयातील भयसंभव डोही
उधळो तेजाची ओंजळ
अंधार जळेतो दिशांत दाही

असंख्य काळ्या गूढ सावल्या 
येतिलही अवसेच्या पायी
पेटो मग धगधगता वणवा
धडधडत्या श्वासांतच काही

अंधाऱ्या शहरात पेटुदे
रस्त्या रस्त्यावरती होळी
उगवूदे सूर्यास तुझ्यातील
उत्कर्षाची देऊन ग्वाही

तूच तुझा हो प्रकाश आणिक
तूच तुझ्या आत्म्याची ज्योती
उद्धाराचा मंत्र निरंतर
होवो अर्पण अनंत देही

अचल शुभंकर तेवत जा तू
कालातीत उजेड स्वयंभू
तूच तुझ्या सृष्टीचा त्राता
तूच तुझा आनंदाग्राही

आदित्य

Sunday, November 1, 2020

खिडकीमधला पाऊस

अंधाऱ्या रातीस एकटा खिडकीतुन मी पाऊस बघतो
दूर कुठेशी गडगडणारा मेघ इथे डोळ्यातुन झरतो

टपटपणारे थेंब टपोरे नाचुन जाती जमिनीवरती
अन पानांवर ओघळ कुठल्या स्मृतींमधूनी तिथेच रमतो

काळ्या काळ्या नभी साचतो कुठे गुलाबी डोह अचानक
आणि उसळुनी केवळ माझ्यासाठी ओला चंद्र झिरपतो

मनपटलावर क्षणात एका वीज बिलोरी तडकुन जाता,
एकामागुन एक जुन्या जखमांना पुन्हा हुंदका फुटतो

प्रकाशसुद्धा ओला होतो रस्त्यावरच्या पाण्यामधुनी,
कातर कातर होऊन जाता अंधाऱ्या सावलीत विरतो

मोत्यांची लडिवाळ माळ जी एकेकाळी जपली होती
पावसात या एक एक मोती आता डोळ्यांतुन गळतो

खिडकीच्या काचेवर माझ्या धुके दाटते धूसर धूसर
आणिक ओल्या आठवणींचा पाऊस केवळ मागे उरतो

पाऊस अलगद भिजवुन जातो कवितेतील शब्दांना माझ्या
कवितेमधुनी तुला भेटण्यासाठी हल्ली पाऊस पडतो

आदित्य

Thursday, October 22, 2020

देणाऱ्याचे हात माग तू

देणाऱ्याचे हात माग तू, दान नको
उगाच जळण्यासाठीचे सामान नको

म्हणूदेत आम्हाला भोळे श्रद्धाळू पण
देवच नाही म्हणणारे विज्ञान नको

मान स्वतःचा राखण्यास खोटा खोटा,
वेळोवेळी बळजबरी अभिमान नको

अगम्य आणिक अर्थावाचुन गाण्यापेक्षा
नकोस गाऊ, परंतु पोकळ तान नको

आठवणींचे पुस्तक चाळत जाता जाता
तुझी स्मृती नसलेले कुठले पान नको

माणसातला देव कुठे बघ सापडतो का
फक्त देवळातला मला भगवान नको

ठरले आहे तर मग पुरते झोकुन दे तू,
दोन क्षणांचे वरवरचे अवसान नको

बांध शीड तू स्वतः स्वतःच्या होडीचे, पण
होडीतुन वादळासवे संधान नको

आदित्य

Saturday, October 17, 2020

घे पुन्हा अवतार तू

चंडिके, दुर्गे,भवानी घे पुन्हा अवतार तू
तारण्या आम्हास माते मार महिषासूर तू
रक्त उसळू दे धरेचे स्त्री कधी हरता कुठे
जन्म घे होऊन शक्ती, कर पुन्हा संहार तू

माजल्या आहेत रावण होऊनी वृत्ती इथे
माय भगिनी आमची नित सर्वथा मरते इथे
होउदे दे सीताच काली घे तुझी तलवार तू
चंडिके, दुर्गे,भवानी घे पुन्हा अवतार तू

हात लक्ष्मी पूजणारे आज उठती स्रीवरी
जन्म मातेचा विनाशी का ठरावा भूवरी
सोड तू कमलासना अन रुंडमाळा घाल तू
चंडिके, दुर्गे,भवानी घे पुन्हा अवतार तू

शारदे विघ्नेश्वरी जगदंब तू वरदायिनी
शक्ती तू शिवचण्डिका भय कष्ट संकट हारिणी
तेजगायत्री अम्हाला अमृताची पाज तू
चंडिके, दुर्गे,भवानी घे पुन्हा अवतार तू

होऊनी नतमस्तकी अर्पण तुझ्या चरणी भवानी
स्वीकरी वंदन तुझ्या या पामराचे दो करांनी
पेटुदे रुद्रास थोडा अंश पदरी घाल तू
चंडिके, दुर्गे,भवानी घे पुन्हा अवतार तू

Monday, October 5, 2020

पिंपळ

झाड पिंपळाचे आता सुरकुतले आहे
असोत हिरवे, परी जरासे सुकले आहे
किती उन्हाचे आणि मोसमी ऋतू बघितले,
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे

पार मोकळा फूल-पिसारे फुलण्यासाठी
जणू मंदिरी उभी माऊली तुमच्यासाठी
कितीतरी जन्मांचे सार्थक घडले आहे
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे

घडले अंकुर किती तुझ्या छायेच्या काठी
बाग नव्याने फुलले तव मायेच्या पोटी
अंगण अमृत कुंभांनी नांदवले आहे
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे

जरा कुठे आधार हवा झाडाला आता
मायेचा शिडकावा बस शब्दांचा आता
फार कुठे, बस जरासेच ते दमले आहे
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे

नकोत कुठल्या वेली अंगी मिरवायाला
नको मंजिऱ्या नको कळ्यांनी उगवायाला
सुख म्हणजे केवळ तुमचे हसणे उरले आहे
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे

कधी वाटते एक एकटे अता मनाशी
एक एकट्या भिंती अन अंधार तळाशी
त्यात ऐकतो झाड जुने उन्मळले आहे
तरी सावली देण्या अजुनी तरले आहे



Friday, October 2, 2020

अत्तरात मी बुडून येतो

तुझी आठवण येता, डोळे मिटून घेतो
धुंद स्मृतींच्या अत्तरात मी बुडून येतो

तू नसता हृदयात अनामिक धडधड असते
तू असता चुकलेला ठोका जुळून येतो

तुझेच अल्लड स्वप्न फिरुनी रोज झिरपते
चिंब तुझ्या मग पावसात मी भिजून घेतो

कधी गुंतता तुझे नि माझे क्षण नकळत, मी
डोळ्यात तुला हळुवारपणे साठवून घेतो

वास्तवातुनी मी हसतो ते नावापुरते
आरशातुनी कधी एकटे रडून घेतो

भेटत नसलो तरी खुशाली कळून जाते
तू ना देता निरोप हा मग कुठून येतो?

कधी चांदणे खूण तुझी रेंगाळुन जाते
आणि सूर गझलेचे मी ओवाळुन देतो

आठवणींचा पिंपळ अजुनी हिरवा आहे
रोज तिथे जो पाऊस हळवा पडून येतो!

Saturday, September 26, 2020

तू मला विसरून जा

'तू मला विसरून जा', आता असे सांगू नको तू.
फार तर याच्यापुढे आता मला भेटू नको तू!

वाटले होतेच ऐसे की मला सोडून जाशिल,
पण तरी प्रेमात मी पडलो तुझ्या विसरु नको तू.

हात धरुनी मी तुझा जे पाहिलेले स्वप्न अपुले,
राहुदे ते माझिया सोबत तया मागू नको तू!

वाटले जर आठवावे सोबतीचे क्षण तरीही,
स्वप्नवेड्या आठवांना सादही घालू नको तू!

पेटला आहेच जर वणवा अता मग पेटुदे तो..
तू जरी विझलीस, माझी आग ही विझवू नको तू!

आसवे होतील माझी पावसाच्या कैक कविता.
घन निळ्या राती दवांच्या बरसतिल, ऐकू नको तू!

आदित्य

वास्तवाचा लेश

दाटले आभाळ अन कल्लोळ उठला
पावसाचा तोच ढग पुन्हा बरसला
साचलेली राख साऱ्या आठवांची
पेटली आणि निखारा परत फुलला

कोंडलेला काळ जो काचेतुनी मी
आरशामध्ये जणू पाहून हसला
संधिकाली होत गेली वेळ कातर
अन निळ्या स्वप्नातला पाऊस भिजला

माझियापुरताच पाऊस येत गेला
तो तिथे रडला नि माझा बांध फुटला
मी भिजूनी आसवांचा होत गेलो
ऊन आले मात्र ओला डाग उरला

वाटले यावे पुन्हा या पावसाने
फक्त यावे घेउनी हळुवार तुजला
मी तुझ्या संगे सये मन-मुग्ध व्हावे
अन नसावा वास्तवाचा लेश कुठला

आदित्य

Thursday, September 24, 2020

माझिया क्षितिजास ओलांडून गेलो

नाव माझे मी इथे टाकून गेलो
माझिया क्षितिजास ओलांडून गेलो

पेरुनी बी खोल मातीच्या उराशी
फूल नकळत अंगणी लावून गेलो

गात गेलो गीत दैवाने दिलेले
अन स्वरांच्या ओंजळी उधळून गेलो

घेउनी सामान माझे मी निघालो
मृण्मयी सारे इथे ठेऊन गेलो

मोह मज नव्हताच काही सोडताना
मात्र इवल्या लोचनी तरळून गेलो

वीण होती घट्ट नात्यांची परंतू
शेवटी जर तेवढी उसवून गेलो

देव होते कैक सारे मांडलेले
देव माझा तेवढा उचलून गेलो

आदित्य

Saturday, July 18, 2020

मनात साठवलेला पाऊस

असा बरसुनी जातो पाऊस,
गहिवरलेला ओला पाऊस,
भरून येतो क्षणात पुन्हा
मनात साठवलेला पाऊस

तशी कोरडी जमीन होती,
गंध पालवी नवीन होती,
वीज तडकता कातर कातर
गळतो हिरमुसलेला पाऊस

स्वप्नांमधल्या ऐलतीरावर
वारा वादळ घेऊन येतो
अन धूसरशा पैलतीरावर
झरतो अवघडलेला पाऊस

कधी अवेळी भरून येते
मनात आभाळाचे गाणे
तरी हुंदके आणिक अश्रू
थांबवतो रुसलेला पाऊस

निळ्या जांभळ्या राती मजला
दूर खुणवती पाऊसवेळा
खोल घेऊनी जातो तेथे
स्वप्नी मंतरलेला पाऊस

क्षितिजावरती चालू होते
घननीळ्या वेणूची जादू
अन टपटपतो इथे माझिया
स्मृतींतुनी भिजलेला पाऊस

------- आदित्य देवधर

Tuesday, July 14, 2020

आठवण

अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी
अंधुक चित्रे जुळुनी आली लख्ख उजेडी सारी

पडदा पडला होता मोकळ्या मंचावरती
नशा शिल्लक होती केवळ माझ्यापुरती
लाल रंग होता डोळ्यांवरती चढला
काचेच्या तुकड्यांमधुनी तुझाच चेहरा दिसला
स्मृृती झळकली प्रेमाच्या त्या शपथांची मग सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

मी तिथेच अर्धा  पेला आलो होतो सोडून
डोळ्यात निखारा घेउन हृदयात शहारा घेउन
हात टाळ्या वाजवणारे थोटे झाले होते
नाटक अपुले मंचामगील खोटे झाले होते
बोच सोडुनी गेलीस तू कायमची जिव्हारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

बंद करुनी वाटा मी काजळ धुतले होते
रंग नव्याने भवती मजला दिसले होते
कुलूप ठोकले होते काळ्या कोनाडयावरती
पत्रे पडली  होती तेथे धुळीत चित्रांभवती
विस्कळीत अर्थाची पाने पाने माझी सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

आज सामोरी पाहून तुजला ज्योत जागली होती
नसांमधुनी आठवणींची सळसळ झाली होती
जखमा उलून आल्या खपली गळून पडली होती
आठवणींची सुरी माझिया हृदयी घुसली होती
विरली मग त्या आठवणींची भुते शेेवटी सारी
अवेळीच तू का आलीस आज अचानक दारी

-------- आदित्य देवधर

उत्तरे शोधू नको तू...

आपुले नाते कधी अपुल्यासही कळणार नाही
उत्तरे शोधू नको तू, प्रश्न मी पुसणार नाही

दूर मजपासून जाण्या, यत्न तू केलेस सारे
वाढले अंतर जरी ते तेवढे टिकणार नाही

तू वळूनी पाहताना पाहिलेले मी कितीदा
अन तुझे हे टाळणे आता असे पटणार नाही

झालीच जर नजरानजर तू लाजुनी हसतेस केवळ
लाजणे, हसणे असे आयुष्यभर पुरणार नाही

पाहतो मी वाट की मज भेटुनी जावीस तू पण
वेळ सरता थांबण्याची, मी तिथे असणार नाही

उमगली नाही अटींची लांब यादी, त्यातही अन,
ती कधी माझी नसावी, हे असे जमणार नाही

भांडण्यासाठी तरी भेटून जा मज एकदा तू
मी पुन्हा समजूतदारीचा गुन्हा करणार नाही

गुंतलेल्या भावनांना राहूदे ऐसेच आता
शेवटी कोडे तुझे माझे कधी सुटणार नाही

आदित्य

Monday, July 13, 2020

बाजी

रुद्राचा अवतार प्रकटला,
पावन झाली माती माझी
चंडी ची तलवार होऊनी
कडाडला शत्रूवर बाजी

दहा दिशातुन वीज कोसळे
काळोखाच्या छातीवरती
रक्ताचा अभिषेक घातला
स्वातंत्र्याच्या सूर्यावरती

अजस्त्र लाटा घेऊन आले 
बाणांचे वादळ ते जहरी
निधडी छाती झेलुन गेली
हसुन तयांना अष्टौप्रहरी

सडा सांडला रक्ताचा अन
श्वासांचा त्या खिंडीपाशी
तिथे वाहिली गंगा, झाली
ती या स्वातंत्र्याची काशी

अजूनही जयघोष शिवाचा
डोंगर वाटांतुन त्या घुमतो
तांडव करणारा तो बाजी
अजूनही मातीतुन दिसतो

आदित्य

Monday, June 29, 2020

फूल माझे...

फूल माझे राहूदे गे तुझ्याच सोबत
शब्द होतील गझल येथे तू दिलेले
गीत होईल फूल तेथे मी दिलेले

फूल माझे माळ तू केसात तुझिया
आठवांचा गंध पसरुन भोवताली
पाकळ्यांचा श्वास होईल वर खाली

फूल माझे हासुनी गाईल गाणे
'काय वेडे मन तुझे झुरते अजूनी?
सांजवेळी तू कुणा स्मरते अजूनी!'

फूल माझे दवकणांनी चिंब होईल
चांदणे स्वप्नातले रडवेल जेव्हा
ते टिपूनी घेत मी उगवेन तेव्हा

फूल माझे ठेव तू जपुनी कुठेशी
भेटलो नाही जरी तुजला कधी मी
देउनी जाइन कळ्या माझ्या तरी मी

फूल माझे लाव तू परसात अलगद
रोज मी येइन स्मृतींच्या ओळखीने
दरवळू होऊन अत्तर सोबतीने

आदित्य

फक्त एकदा

स्वप्न साठले पापण्यांत जे फक्त एकदा
ओघळले, नभ डोह जाहले रिक्त एकदा

पिंजऱ्यामधे लिहून गेलो साधे काही
वादळ उठले अवघे, होता व्यक्त एकदा

व्याकुळ होई चकोर माझा तुझिया वाचुन
यायचेस की पौर्णिमेपरी फक्त एकदा!

बरसुन गेला कलुषित होउन शुभ्र मेघ तो,
जसा जाहला धरेवरी आसक्त एकदा!

काळे, गोरे किती भांडले रंग तरीही
'लाल सांडतो फक्त' म्हणाले रक्त एकदा

आपलाच मी होतो कौतुक करेपर्यंत
ठोकरला गेलो मी होता सख्त एकदा

'इथेच ऐसा उभा राहतो' देव म्हणे, पण
'भेटुन जावा कुणी खरा बस भक्त एकदा!'

अश्रूंचा अभिषेक घालते जर्जर काया
रोज मागणे एकच, व्हावे मुक्त एकदा!

आदित्य

Thursday, June 18, 2020

वेदनांचा बाजार

माणसांच्या वेदनांचा केवढा बाजार भरतो
मी इथे दुःखात असतो अन कुठे दर-भाव ठरतो

गाव माझ्या आत आहे एक वसलेले कुठेशी
सांजवेळी रोज येथे एकटा अज्ञात उरतो

वेळ आणिक प्राक्तनाची कैद मी भोगीत जाता
टोचणारा क्षण घड्याळावर तिथे अडकून पडतो

शून्य ठरते एक बाजू माझिया साऱ्या सुखांची
अन तिथे दुसरीकडे तर यातनांचा ढीग असतो

कोणत्या ऐशा यशाची पायरी अपयश असावी?
पायऱ्या संपूनही मी वाट ती शोधीत बसतो

बोचती नजरा जगाच्या वेगळे करताच काही
जीर्ण पिंपळपान होतो जीव अन विश्वास गळतो

मोजतो कित्येक छिद्रे आणि भेगा जीवनाच्या
शोधतो रंगीत नक्षी त्यात अन तैसेच जगतो

गुंततो नात्यांत साऱ्या मानुनी अपुले तयांना
वाढतो गुंता गळ्याशी अन विखारी फास बसतो

आदित्य

Wednesday, June 17, 2020

वाटले नव्हते..

वाटले नव्हते मला की एवढ्या जुळतील तारा
छेडुनी हळवे तराणे, भारिला तू देह सारा

अडकलो नजरेत मी पहिल्याच भेटीतून पुरता
अन मला कळलाच नाही तू दिलेला तो इशारा

ओळखीचे होत जाता मी कुठे हरवून गेलो!?
शोधले क्षितिजावरीही अन इथे झुरला किनारा

पापण्यांच्या ओंजळीतुन सांडले थोडे उसासे
अन कुठेशी हुंदक्यांचा जाहला मग कोंडमारा

मी जपूनी ठेवलेले पान होते ते गुलाबी
सोबती काळ्या निळ्या शाईतला निव्वळ पसारा

सर्व काही ठीक होते फक्त तू नव्हतीस तेव्हा,
श्वास होते चालले पण व्यर्थ होता अर्थ सारा

आदित्य

Wednesday, June 10, 2020

एवढी का आवडावी

का कळी बघता तुला खुदकन खुलावी
सांग तू मज एवढी का आवडावी

मी तुझ्या मागे पुढे इतके करावे
मात्र तू का मान हसुनी वेळवावी

होत जावे मी तुझे तन अन मनाने
एवढे की तूच केवळ मज दिसावी

मोतीयाचे थेंब व्हावे तू सकाळी
अन स्मृतींनी गे तुझ्या नित सांज व्हावी

स्वप्नही ऐसे पडावे लाघवी की
होऊनी सर पावसाची तूच यावी

एकदा भिडले जसे डोळे तुझ्याशी
तेवढ्या नजरेत माझी हार व्हावी?!

आठवण इतकी तुझी दाटून ये की
रातराणी स्वागताला ओघळावी

प्रीतसंभव फूल हृदयी उमलताना
वेल नाजुक अंगणामध्ये रुजावी

श्वास ऐसे तरळती गझलेपरी की
तूच त्यांचे सूर लय रुजवात व्हावी

आदित्य

Sunday, June 7, 2020

पाऊस

वाजवून दारावर टिचक्या 
रात्री पाऊस निघून गेला
श्वास जुन्याश्या स्वप्नांमध्ये 
मंद सुगंधी भरून गेला

आठवणींचा पूर वाहिला
उंबऱ्यातुनी माझ्या घरच्या
नाव गुलाबी कवितांची मग
माझ्यासाठी सोडुन गेला

जपलेले ते क्षण सापडले 
जुन्याच पिंपळपानावरती
ओलावा मग पुन्हा नव्याने 
ठसे वहितुन उमटुन गेला

एक एक फुटलेला अंकुर 
जळला होता वणव्यामध्ये
थेंब आज भिजलेल्या राखेमधुनी
निखार फुंकुन गेला

पावसात मी भिजता घेऊन 
कवेत पाउस हृदयामधला
स्मृतींतला तो श्रावण आला
परतुन आणिक बरसुन गेला

अजूनही मी गाणे गातो
पावसातले तुझे नि माझे
पाऊस सुद्धा आज अचानक 
गाणे अपुले गाउन गेला

अशी आठवण आली की तो
पाऊस सुद्धा माझा झाला
तुझे चांदणे मिसळुन अवघे
पाऊस मजला भिजवुन गेला

आदित्य

भय इथले संपत नाही

डोळ्यांत उतरती चंद्र
पुनवेच्या क्षितिजावरूनी
पाझरती अश्रू नकळत
परसात चांदण्यामधुनी
सुकलेल्या पिंपळपानी
ओलेती धार उमटते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

कोसळतो मेघ उपाशी
जन्मांचा जणू भुकेला
गहिवरतो जीव बिचारा
घन-चिंब उभा भिजलेला
अन साचत जाता डोही
ओढून मला ती नेते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते..

अंधार वेदना हृदयी
घेऊन मुसाफिर निघतो
तेजाचा दिवा कुठेशी
शोधीत निरंतर फिरतो
अश्रूंच्या वाटेवर मग
आत्म्याशी ओळख होते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते

स्वप्नांच्या गावी येतो
मन कवडा ईश्वर उठुनी
अतृप्त वास्तवामधल्या
तुटलेल्या काचा धरुनी
रंगीत आरसे जुळता
अस्तित्व बिलोरी उरते
भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते.

आदित्य

Thursday, January 2, 2020

माणसे

खूप सारी श्वापदासम वागणारी माणसे
माणसांना माणसे ना मानणारी माणसे

लावुनी हसरे दिखाऊ चेहरे फिरतात ही
रोज अवघे सत्य खोटे पाडणारी माणसे

झापडे लावून येथे हरवती आयुष्य सारे
बंद डोळ्यांनीच मुक्ती शोधणारी माणसे

झाकलेली मूठ अपुली मिरवताना या जगी
सूर्य चष्म्याआड काळ्या झाकणारी माणसे

'त्रास होतो काजव्यांचाही अम्हाला' सांगती,
खोल अंधाऱ्या घरातुन राहणारी माणसे

जीव दुखवोनी कुणाचा वागुनी दैत्यापरी
देव दगडाला मनाने मानणारी माणसे

फक्त 'माझे', 'माझियापुरतेच' अंगण अन तिथे
'मी पणाचे' झाड मोठे लावणारी माणसे

आदित्य