Pages

Wednesday, July 18, 2018

तुझ्या फुलांचे अत्तर

सये तुला मी निरोप देताना डोळे पाणावुन गेले
तुझ्या फुलांचे अत्तर माझ्या श्वासाशी रेंगाळुन गेले

थिजले होते पाय तिथे त्या जागेवरती तू जाताना
किती न जाणो क्षण तैसे नजरेतुन सारे सांगुन गेले

अनेकदा मी आवरले हुंदके नाटकी हसता हसता
फुटला नंतर बांध केवढे मळभ शेवटी वाहुन गेले

कितीकदा वाटले म्हणावे 'थांब, सोडुनी नकोस जाऊ'
कधी वेळ तर कधी धीर नव्हता नि सांगणे राहुन गेले

अता कधी भेटशील तू या प्रश्नाचे काहूर मनाशी
विरहाच्या वणव्यातिल आगीमधुनी राती जाळुन गेले

तुला धाडले पत्र एकदा पत्ता ठाऊक नसतानाही
कुठूनसे मग दोन पारवे तुझी खुशाली सांगुन गेले

पुन्हा चालतो एकटाच मी जुन्या रोजच्या रस्त्यावरूनी
पुन्हा तुझ्या वळणावर भासाचे मृगजळ मज चकवुन गेले

वळून तू बघताना मागे उलगडला पट अपुला सारा
आठवणींतिल रंग नेमके चित्र आपुले काढुन गेले

आदित्य

Tuesday, July 17, 2018

चल होऊया पाऊस आपण

चल होऊया पाऊस आपण
तू माझा हो तसा तुझा मी
भिजवू आणिक भिजून जाऊ
एक होऊनी अंतर्यामी

चल होऊया समुद्र सरिते
मधील नाते विरघळणारे
एकमेकांत मिसळू दोघे
सौख्याने उजळून किनारे

चल खेळूया इंद्रधनूच्या
रंगांसंगे क्षितिजावरती
रंग देऊनी अपुला त्यासी
उधळू आनंदी बरसाती

चल होऊया मित्र नव्याने
मैत्रीचा मृदगंध दरवळू
व्यापुन सारा आसमंत
नवचैतन्याच्या सरी झरू

चल होऊया दोघे ओले
न्हाऊन हिरव्या रंगामधुनी
निथळू दे अंगावर पाणी
चहूकडे आभाळामधुनी

चल होऊया टिपटिपणाऱ्या
थेंबांचा आवाज अनामी
तू माझ्या प्रेमाची झरझर
कोसळता पाऊस तुझा मी

आदित्य

Monday, July 16, 2018

अदृश्य अश्रू संचिताचे

अदृश्य अश्रू संचिताचे हासुनी मी गाळतो
भेगाळल्या मातीत माझे बी सुखाचे पेरतो

जे जे मिळाले ते स्वतःचे मानले अन भोगले
जे जे कधी नव्हतेच माझे, अर्घ्य त्याचे सोडतो

वाटेतले काटे अता गालातुनी हसती मला
की मी अजूनी थेट अनवाणीच त्यांना भेटतो

माझ्याच कुठल्या अपयशाचे भूत वेताळापरी
पाठीवरी घेउन तयाचे रोज ओझे वाहतो

अंधार सध्या वाटतो मज सोबती माझा सखा
माझ्या चुकांना, वेदनांना तोच केवळ झाकतो

प्रत्येक जन्मी धावतो बघण्या यशाची पायरी
विश्राम मी घेतो मधे अन तोच मृत्यू गाठतो

काळोख रात्री वेदनांचे टोचणारे पुंजके
माझेच मानुन मी तयांचे बोचणे कुरवाळतो

आदित्य

Monday, July 2, 2018

वास्तवातला पाऊस

आकाशातील घन मनकवडा
तृषार्त हृदयी चिंब बरसतो
वास्तवातला पाऊस नकळत
स्वप्नांमध्ये रोज झिरपतो

आभाळाचे पुसून काजळ
टिपूस गळती खाली जैसे
डोळ्यांमधला मेघ अचानक
चंद्र चांदण्यातुनी उतरतो

कधी घेउनी येतो वादळ
थेट धडकतो घरास माझ्या
कधी घालुनी हळूच फुंकर
वेदनेस माझिया हसवतो

ओले असुनी दिवस जाळतो
वेदनेतल्या आगीमधुनी
आणि कोरड्या राती देखिल
जागुन डोळ्यांतुनी भिजवतो

आज अपेक्षा, उद्या उपेक्षा
असूनही आशेचा मोहर
रोज नव्या अश्रूंच्या ठायी 
अंधाऱ्या रातीस बहरतो

पाऊस राती काजळवाती
लावून ओल्या चांदण्यामध्ये
मंतरलेला चंद्र पावसामध्ये
मिसळुन मंद उजळतो

घेऊन येतो पाऊस काही
स्मृतींस माझ्या तुझ्या सोबती
पाऊस सरता ओलाव्याचा
भास तेवढा मागे उरतो

आदित्य

Thursday, June 28, 2018

सवाल आहे एवढाच की

सवाल आहे एवढाच की तुझ्यात गुंतावे की नाही
सवय एवढी लागावी अन व्यसनाधिन व्हावे की नाही

श्रावणातल्या ओल्या हिरव्या नभात वारा पिऊन सारा
पाऊस होऊन फक्त तुझ्यावर अविरत बरसावे की नाही

प्रेम म्हणू की ओढ म्हणू की भासाच्या सावल्याच नुसत्या
आभासी मृगजळात ऐशा नाते रुजवावे की नाही

एका भेटीमधली ठिणगी उठवुन गेली वादळ वणवा
हव्याहव्याशा आगीतील या निखार विझवावे की नाही

कधी वाटते जावे आणिक संपवून टाकावे सारे
चिठ्ठीतुन शेवटचे तिजला निरोप कळवावे की नाही

तू असताना वा नसताना उंच खालती घेऊन झोके
धुंद नशेचे वा विरहाचे प्याले रिचवावे की नाही

नसतील ध्यानी तुझ्या जराही माझे असले प्रश्न कदाचित
अशात तुझिया स्मृतींत मी स्वप्नांना भिजवावे की नाही

जखमा माझ्या हृदयावरच्या तशा खोलवर नाहीत अजुनी
याच समाधानावर आता स्वतःस रिझवावे की नाही

भिडल्या जर दोघांच्या नजरा उमजुन सारे मुकेच नकळत
मोजुन मापुन दोन क्षणी मग खुशाल बिघडावे की नाही

आदित्य

Tuesday, June 26, 2018

तहानलेला

अन्योन्याच्या नात्यामधला समुद्र ऐसा गहिवरलेला
'अथांग पाणी सभोवताली असूनही मी तहानलेला'

निमित्त परतोनि भेटण्याचे कसेबसे साधले तरीही
पाय घराच्या उंबरठ्यावर नकळत माझ्या अडखळलेला

रोज इथे मी मूक झुरावे प्राजक्ताच्या झाडाखाली
रोज तिथे दारात तुझ्या पाऊस फुलांचा ओघळलेला

स्वप्नामध्ये क्षितिजाच्या पलीकडे तुला मी भेटून येतो
आणिक उरतो गात्रांमधुनी स्पर्श तेवढा शहारलेला

पक्षी होऊन मन माझे घुटमळते तुझिया खिडकीपाशी
गाऊन जाते गूढ मारवा कातरवेळी अवघडलेला

कुठेतरी जाणतो तुलाही ओढ असावी माझ्याइतकी
क्षण एखादा तरी असावा स्मृतींत माझ्या विरघळलेला

दोन किनारे दोघे आपण रोज वाहतो सोबत तरिही
थेंब माझिया पाण्यामधला तुला भेटण्या आसुसलेला

आदित्य

Friday, June 22, 2018

विरघळून जाती मने

ओल्या ओल्या पावसातल्या गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अल्लड अवखळ थेंब नाचती सभोवताली
छेड काढुनी केसांशी ओघळती गाली
ओठांनी हळुवार तयांना टिपण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

कोसळणारा पाऊस बघता खिडकीमधुनी
आठवणींचे तुषार उडती अंगावरूनी
विसरून जाते भान तशातच झुरण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

उसळून सागर मनात वादळ घेऊन येतो
हजार लाटांनी आलिंगन देण्या हुरहुरतो
वाट पाहता तुझी किनारी भिजण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

पावसामध्ये रुजून येती शब्द नव्याने
भाव उमलती अस्फुट उत्कट कळीप्रमाणे
प्रेमाच्या फांदीवर डोलत फुलण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

असा पेटतो वणवा अंगी स्पर्शामधुनी
धुके पसरते उष्ण धुराच्या वाफांमधुनी
चिंब ओल्या मिठीमधुनी जळण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

अनुरागाचे सूर आपुले अवघे जुळले
नवे अर्थ सहवासामध्ये तुझ्या मिळाले
पावसातले स्पंदन उतरे गाण्यामध्ये
विरघळून जाती मने वाहत्या पाण्यामध्ये

आदित्य

Monday, February 5, 2018

गंध तुझा रेंगाळत आहे

आठवणींची छाया माझे वर्तमान झाकोळत आहे
अजून मी संदिग्धपणे नात्यास जुन्या सांभाळत आहे

स्वप्नांची दाटली अताशा भुते मनाच्या अवतीभवती
वास्तवातला दाह तयांना रोज नव्याने जाळत आहे

कधी दिसावा तुझा चेहरा गर्दीमध्ये खुणावताना
कधी वाटते चोरून मजला बघूनही तू टाळत आहे

अदृश्य असो व दृश्य खुणांशी अडखळतो मी कितीतरीदा
जाणवते की नियती सध्या काहींना चुरगाळत आहेत

अजूनही ओघळतो नयनी सुगंध माझ्या तुझ्या फुलांचा
मोहाचे निर्माल्य अजूनी त्याच स्मृतींवर माळत आहे

भास असे होतात कधी की तुझ्याच हाती हात दिला मी
स्पर्शातील त्या ऊब अताशा डोळ्यामधुनी गाळत आहे

बहर जरी ओसरला असला तुझ्या नि माझ्या अनुरागाचा
श्वासाश्वासामध्ये तरीही गंध तुझा रेंगाळत आहे

Sunday, January 28, 2018

भेटला विठ्ठल अम्हाला

काय पुण्याई असे की वर कुणाचा लाभला

भक्तीने भिजूनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


पंढरीची वाट आम्हा लागली नाही धराया

घातले नाहीच लोटांगण तुझ्या पायी पडाया

न्हाऊनी आकंठ विठ्ठल आज गीतांतून प्याला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आमुच्या अंगात भक्ती, रक्त होऊनी प्रवाहे

श्वास होऊन स्वर तुझा प्रत्यक्ष गाभाऱ्यात राहे

नाद भक्तीचा स्मरोनी टाळ गाऊ लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


गांजल्या भक्तांस माया लाभूदे ऐसी निरंतर

पावुनी पतितास उद्धारून दे अवघे चराचर

आर्जवांचा ओघ नयनी मूक वाहू लागला

भक्तीने भिजुनी सुरांच्या भेटला विठ्ठल अम्हाला


आदित्य

Wednesday, January 24, 2018

जाणतो ऐसे तुला की...

जाणतो ऐसे तुला की तू कधी माझीच होती
सोबतीची शपथ जैसे माझिया साठीच होती

यावरी विश्वास आता ठेवताही येत नाही
की जुन्या भेटींतली उब पेटण्यापुरतीच होती

वाटले विझवून टाकावे निखारे आठवांचे
आग हृदयातीलही केव्हातरी विझलीच होती

आसवांचे थांबले आहे जरी गळणे अताशा
कोरडी अन आटलेली वाट अश्रूंचीच होती

भूतकाळाच्या धुराचा दाटतो काळोख हल्ली
त्याच काळोखात जळती वातही माझीच होती

वाटते तुजला विचारावे तुझ्या हृदयातले
की तुलाही ओढ माझी तेवढ्यापुरतीच होती?

रंगल्या होत्या स्मृतींच्या परिकथा कित्येक पानी
पण भविष्याची पुरवणी आपली कोरीच होती

आदित्य

Tuesday, January 23, 2018

तू असताना

तू असताना माझ्यामधला मीच हरवतो
आयुष्याचा सूर नव्याने मग सापडतो

गंध दाटतो ऋतू ऋतूंचा तुझ्याच ठायी
धुंद तुझ्या सहवासामधुनी तो दरवळतो

तुझे नि माझे असे वेगळे नसे अताशा
श्वास सुद्धा एकाचा दोघांनाही पुरतो

रात्र तुझ्या उबदार मिठीतुनी मावळते
दिवस आपुल्या स्वप्नांसंगे उलगडतो

पडले अंतर जरी पुल्यामध्ये काही
थोडे तू अन थोडे मी चालुनी मिटवतो

सृजनाचा अध्याय नवा गे तुझा नि माझा
जीवनवेली वरती कोमल कळी फुलवतो

आदित्य

Monday, January 22, 2018

नजरेमधला तुझा दिखावा

नजरेमधला तुझा दिखावा तसा उशीरा कळला होता
मार्ग तुझा अपुल्याच दिशेला फसवुन जेव्हा वळला होता

अंधार दाटला असा अचानक डबडबलेल्या नभात जैसे
अवघडलेला सूर्य ढगांच्या आडून लवकर ढळला होता

वाळूमध्ये मी लिहिलेले नाव तुझे अन माझे जोडुन
लाटेने येऊन तुझा उल्लेख तेवढा पुसला होता

प्रत्येक माझी सांज तेवली होती अपुल्या प्रेमामध्ये
ठाऊक नव्हते नात्यामधला दिवा तुझा परि विझला होता

तुझ्यासाठी तो खेळच ठरला निरोप देण्याघेण्या पुरता
अन विरहाचा दंश माझिया अंगीअंगी भिनला होता!

एकदा जरी सांगितले असतेस मला तू खरे तेवढे
की गाण्याचा सूर मैफिली पुरता केवळ जुळला होता

रोज नव्याने स्वप्नांमध्ये तुला पाहतो शेवटचे मी
तोच तोच थिजलेला क्षण हृदयात खोलवर घुसला होता

तरळून गेल्या स्मृती तुझ्या गे डोळे  माझे मिटतानाही
आठवणींनी मृत्यू देखील क्षणिक तेवढा टळला होता

आदित्य

Wednesday, December 20, 2017

रोज तुझ्या प्रेमात

तुला पाहता स्वतःस पुरता विसरून जातो
रोज तुझ्या प्रेमात नव्याने हरवुन जातो

नजरेमधला भाव कधी ओठांवर येता
अबोल गाणे डोळ्यांमधले सुचवुन जातो

प्रकाश तव हास्याच्या ज्योतीमधुनी अवघ्या
क्षणांस साऱ्या प्रसन्नतेने उजळुन जातो

खट्याळ वारा उडवुन तव नाजूक बटांना
गंध कोवळा लेऊन मजला बिलगुन जातो

जादू चाले तुझी पावसावरती देखिल
तू नसता तो खिन्न मनाने परतुन जातो

संध्याकाळी हसून तू जाताना क्षण तो
स्वप्नमंजुषा धुंद क्षणांची उघडुन जातो

आदित्य

Saturday, December 16, 2017

टपोरी

आमचा आपला टपोरीपणा
थोडा त्यावर मुजोरीपणा
नसेल पटला ज्याला त्यांनी
खुशाल मिजासखोरी म्हणा

कुणी कशाचे दु:ख करावे
कधी कुणाचे शब्द खुपावे
कशास आम्हा चिंता याची
उगाच नुसता हळवेपणा

थेट बोलतो हृदयामधले
नाटक नसते अधले मधले
असाल जैसे वागू तैसे
जमतच नाही फसवेपणा

असेल मैत्री लाख शिव्यांशी
अंधारातील मंद दिव्यांशी
प्रकाश घेतो त्यांचा माथी
यथेच्छ त्याला चोरी म्हणा

आदित्य

Tuesday, December 12, 2017

तुझ्याच सोबत

तुझ्याच सोबत रहायचे मज आहे आता
स्वप्नांमधुनी जगायचे मज आहे आता

कसा तुला मी भेटू पुन्हा धुंद क्षणांतून
आठवणींतून उरायचे मज आहे आता

काय वाटते म्हणून सांगू तुझियाबद्दल
शब्दांमधुनी सुचायचे मज आहे आता

दाटून येता पाऊस नयनी तुझ्या कधीही
अश्रू होऊन वहायचे मज आहे आता

चाकरीतुनी श्वासांच्या मी सुटलो आहे
तुझ्या स्पंदनी स्फुरायचे मज आहे आता

--- आदित्य

Monday, October 16, 2017

तुझे होत जाणे

तुला पाहताना कसे काय जाणे
सुचे पावसाला तुझे गीत गाणे
मृदगंध वाहून आणे स्वरांना
भिजुनी तयांतून तुझे होत जाणे

स्वप्नांस माझ्या तुझा स्पर्श होतो
तुझ्या पावसाचाच मी थेंब होतो
उडतो नभातुन तुझिया सवे मी
जसे पारवे दोन प्रेमी दिवाणे

किती साठवू सौंदर्य लाघवाचे
डोळ्यांत माझ्या तुझ्या आठवांचे
घेऊन येतो पाऊस त्यांना
वेळी अवेळी करुनी बहाणे

मोत्या प्रमाणे असे हासते तू
मला श्रावणाची सर भासते तू
कधी उन्हाचे कधी पावसाचे
नाते नवे रोज वेडे शहाणे

झोकात उडवे वारा बटांना
फुटती धुमारे अवखळ क्षणांना
वाहून गंधास हलकेच येथे
संदर्भ उजळून जाती पुराणे

अशात माझी तुझी भेट होता
पाऊस तेथेही हजर होता
झेलून डोळ्यांतले थेंब अलगद
तुझ्या पावसाने भिजून जाणे

आदित्य

Saturday, September 30, 2017

शिशिर

जुन्या स्मृतींच्या अडगळीतुनी बघ मी तुला सापडतो का
पाने माझी उलगडताना हात तुझा  थरथरतो का

कितीक गहिऱ्या भाव भावना असतील थिजल्या मनामधे
अर्थ तयांचे कधी उमजता शब्द कुठे अडखळतो का

तू नसताना श्वास मला मी उधार देऊन शिल्लक उरतो
मी नसताना मला शोधण्या श्वास तुझा धडधडतो का

शिशिर कधीचा सहवासाची पिवळी पाने गाळत आहे
कधी वेचता निवडक पाने जीव तुझा गहिवरतो का

पाऊस हल्ली मजला पूर्वीइतका ओला भासत नाही
बघ ओलावा त्याच्याकडचा तुझ्याकडे सापडतो का

मी जाताना अश्रू माझे सोडून जाईन तुझियासाठी
सांग तुझ्या डोळ्यातून नंतर अश्रू तो ओघळतो का

आदित्य

Wednesday, June 28, 2017

दरवर्षी पाऊस येतो

दरवर्षी पाऊस येतो
ओले ओले करून जातो
चिंब चिंब गात्रांना पुन्हा
झिंग नव्याने देऊन जातो

ओल्या हिरव्या रंगांमधल्या
नवलाईची धरणी वरती
मुक्त करांनी करुनी उधळण
मेघ रिकामे करून जातो

आडोशाला पक्षी दोघे
बावरलेले अल्लड थोडे
अंतर त्यांच्यामधले नकळत
मिठीमधूनी मिटवुन जातो

अंग अंग रोमांचित करुनी
मंत्रमुग्ध सहवास होऊनी
भिजलेल्या रात्रीतून देखील
स्पर्शाने पेटवून जातो

पाऊस ऐसा हृदयी वसतो
स्मृतींतूनी हळुवार झिरपतो
ओठांवरती अलगद ओले
गाणे त्याचे देऊन जातो

--- आदित्य

Tuesday, June 27, 2017

श्वास मोजके मागुन घेतो

श्वास मोजके मागुन घेतो

देवळात व्यवहार नेमके जगावयाचे मांडुन येतो
अन स्वप्नांना गहाण ठेऊन श्वास मोजके मागुन घेतो

आरशात दिसणारा माणूस कोण असावा बरे कळेना
ओळख त्याची पटण्यापुरती तिथेच त्याला ठेऊन घेतो

इतक्या लक्ष्मणरेषा अवतीभवती  माझ्या काढून गेले
तरी नव्याने रोज एकदा रावण मजला ओढून नेतो

रोज सकाळी सूर्य उगवता साठवून घेतो मी थोडा
कैक भुतांना जळण्याला मग माझ्याकडचा प्रकाश देतो

कोसळताना पाऊस त्याच्या सर्वस्वाला अर्पण करुनी
सृजनाचे चैतन्य नव्याने घटाघटातुन धरेस देतो

आठवणींनी शहारलेले श्वास स्पंदता कणाकणातून
धुंद स्मृतींचा सुगंध त्यांचा भूतकाळ ओलांडुन येतो

--- आदित्य

Friday, June 23, 2017

सावली

सूर्य अस्ताला निघोनी 
रात्र उगवू लागली
मी तरीही शोधतो 
अजुनी स्वतःला सावली

पांघरोनी भीड दिवसा 
कोंडलेल्या भावनांच्या
जाणिवांची वेदना 
रात्री पुरी ओशाळली

जे मिळाले तेच तैसे 
चालवोनी घेतले
स्वप्न स्वप्नातच पहाया 
झोप राखुन ठेवली

श्वास माझे जुंपलेले 
ओढण्या आयुष्य आणिक
चक्र माझ्या पावलांची 
आंधळयाने धावली

ऊन वा अंधार 
सोसायास मी निर्ढावलो
ओल मायेची स्वतःच्या 
आसवांनी साधली

आदित्य

Tuesday, June 20, 2017

धुंद वाटा

धुंद हरवल्या वाटांमध्ये
सापडलो मी आज मला
स्वप्नांमधुनी तरंगताना
बहर प्रेमाचा फुलला

भारून सारा आसमंत
वर्षावातून अनुरागाच्या
अल्लड अवखळ मेघ नव्याने
इंद्रधनू वरती झुलला

ओल्या हिरव्या रंगांमध्ये
न्हाऊन उडता दोन पाखरे
तुषार अवघ्या नभी उधळूनी
चिंब पिसारा अवतरला

गूज सांगते लाडिक बिलगून
धुके कुंद घनदाट असे
की वाटावे मिठीत येऊन
पाऊस गाणे गुणगुणला

भाव भावना मनी उमलता,
स्पर्श शहा-यातुनी वाहता
गंध मनीचा मिसळून
मातीसंगे भवती दरवळला

गोल टपोरे मोती बरसून
सजवे पाऊस रूप तुझे अन
स्मृतींत अलगद चिरतन क्षण हा
ओठांनी हलके टिपला

नितांत निर्जन रानामध्ये
हात घेऊनि हाती ऐसे
श्वासांमधले अंतर संपून
काळ मिठी मधुनी थिजला

----आदित्य

Friday, February 3, 2017

गणगोत

एक एक पारंबी होऊन वाढत आहे
वृक्ष निरंतर रेशीम गाठी जोडत आहे

ऊन असो वा पाऊस आणिक वादळ वारे
फुला फुला ला कुशीत घेऊन बहरत आहे

नाजुक पानांवेली मध्ये पुन्हा नव्याने
जीव स्नेह अनुबंध जोडण्या ओतत आहे

जिव्हाळ्याच्या, वात्सल्याच्या पायावरती
आनंदी गणगोत सोयरा नांदत आहे

--- आदित्य

बोलताना नेमके सांगायचे सुचलेच नाही

बोलताना नेमके सांगायचे सुचलेच नाही
'सांग' म्हणणारे तसे डोळे पुन्हा भिडलेच नाही.

श्वास होते गुंफलेले लाघवी गजऱ्याप्रमाणे
फूल कैसे कोणते गळले कधी कळलेच नाही

सांडले स्वप्नांतुनी मोती स्मृतींच्या आसवांचें
आठवांनी एरवी डोळे कधी भिजलेच नाही

सांगता होताच पडदा ओढला डोळ्यांपुढे की
सावली वा भास प्रेमाचे मुळी झालेच नाही

-----    आदित्य

Wednesday, August 10, 2016

पावसापरी बरसून जा तू

पावसापरी बरसून जा तू
आलिंगन मज देऊन  जा तू
स्पर्श राहूदे इथेच ऐसे
शहा-यांतूनी उरून जा तू

गंधित ओले श्वास उष्णसे
हृदयामध्ये ओतून जा तू
आठवणीं चे नाजुक मोती
स्वप्नांमधुनी गुंफून जा तू

ओल्या ओल्या मिठीत माझ्या
हळुवार विरघळून जा तू
गात्रांना चेतवून साऱ्या
माझ्यामध्ये मिसळून जा तू

--आदित्य

Monday, May 30, 2016

बोचरी स्वप्ने सुखांची

बोचरी स्वप्ने सुखांची उसवुनी निद्रेस जाती 
बंद डोळ्यांनी अताशा जागतो कित्येक राती

कोरड्याने मेघ येती, हुंदक्यांना साथ देती
मात्र डोळे ओलित्याने वेदना-मल्हार गाती

घेऊनी आलो किती पत्रे तुझ्या अंगणात माझी
हाय धोका जाहला शिशिरात गळली सर्व पाती

या जगाचा मी कधी नव्हतो, कधी होणार नाही
सोडुनी मी नेहमी जातो सृजन-वेल्हाळ माती

तेल होते संपलेले जाळुनी स्वप्ने दिव्याची
उजळली आशा नव्याने भिजवुनी घामात वाती

---आदित्य

Thursday, May 19, 2016

अश्रूंचे अवकाळी तांडव

अश्रूंचे अवकाळी तांडव काळाच्या पटलावर घडले
आभाळाचे पाणी आभाळाच्या डोळ्यांमधेच थिजले
 
ऐन मैफिलीमधे समेवर मोजुन मापुन येता येता
हृदयाशी अवखळणारे ते सूर अचानक हवेत विरले

निरोप आला होता ज्याचा त्याला प्राक्तन घेऊन गेले
पाठीमागे आठवणींचे भूत नाचण्यापुरते उरले

श्वास रोजचे, भास रोजचे, घेऊन पुढचा दिवस निघाला
रोजरोजचे सूर्यबिंबही पूर्व क्षितीजावरी उगवले

--- आदित्य 

Monday, August 17, 2015

अंदाज

मी स्वतःशी बोलताना सागराचा भास झाला
लाट आली एक अन माझा मला अंदाज आला

स्वप्न होते की कुणाचे मिथ्य होते वास्तवाचे
जन्म घेण्याचा पुरावा सत्य पाझरता मिळाला

पेलतो डोळ्यात ताकद हिकमती माझ्या ऋतूंची
सांगतो सूर्यास देखिल रोख तू करड्या उन्हाला

सोडुनी गेले पुजारी, भक्त सारे अन भिकारी,
राहतो कंटाळलेला देवही तेथे कशाला ?

वाहुनी नेले किनारे , धार ती कोठून आली
पाट म्हटलो मी जया तो पूर अश्रूंचा निघाला
 

गाज ऐकुन एकदा , म्हटले पहावे कोण आले
सावली माझीच अन आवाजही माझाच आला


--आदित्य 



Thursday, August 13, 2015

क्षितिजाच्या पलीकडे

मला क्षितिजाची  सीमा नव्हतीच कधी. मी त्याच्या पलीकडला आहे. आणि तिथेच जाणार अहे. एवढी छोटी बंधनं मला अडकवू नाहे शकत.  इथे जेव्हा आलो तेव्हा क्षितिजाची पायरी ओलांडून स्वैर धावलोय, खिदळलोय. माझ्या सावलीशी खेळलोय. मला इथे सावली मिळते. माझ्या बाह्यजगात सावली नाही. मीच माझा प्रतिनिधी. इथे वावरताना इथल्या मायेमध्ये कसा अडकलो तेच कळल नाही. पण आता मला बाहेर जायचय . क्षितिजाच्या पलीकडे!

---आदित्य

कर्तृत्वाचा कोण दिखावा!

कर्तृत्वाचा कोण दिखावा करता येतो!
जन्मही आता ठरवुन आम्हा घेता येतो

दु:ख मुळी तू करू नको कोणी मेल्याचे
प्रेतामध्ये जीवही अता भरता येतो

भाव लागतो सध्या भगवंताचा देखिल
खिसा तयाचा अभिषेकाने जिंकता येतो

रक्ताच्या नात्यात असूदे वा मैत्रीच्या
कोणाचा विश्वास कसाही विकता येतो

बेशरमीचा घेत कुंचला उजळपणाने
राजरोस झेंड्याचा रंग बदलता येतो

घरे बदलुनी कुंडलीतल्या दुष्ट ग्रहांची
नियतीचाही डाव पुरा उलटवता येतो

---आदित्य 

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही

असा तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही
अश्या  तुझ्या दानाचा काहीच उपभोग नाही
रिकामा आलास तू आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून

कुठे जाउन आलास की नव्हतच काही द्यायला?
वेळ झाली म्हणून आलास अणि चाललास पुन्हा पोट भरायला
तुझी जमीन तुझी वाट पाहते आहे
कधीतरी येशील अणि मन मोकळ करशील याची
भरभरून येशील आणि चिंब भिजवशील याची

पण तू तर रिकामा आलायस आधीच मन मोकळं करून
आणि मी वाट पाहतेय  रोज डोळे भरून भरून…….
अश्या तुझ्या येण्याचा काहीच उपयोग नाही!

 ---आदित्य 

एक मुसाफिर

एक मुसाफिर वक्त से आगे निकलकर जी गया
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया । 
 
हम नही रोयेंगे ये वादा किया था आज लेकिन
आसमाँ शामिल न था इसमे,  बिचारा रो गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

संगदिलोमे आपका चलता रहेगा कारवाँ
एक सूरज आज बस यूँ मुस्कुराहते ढल गया ।
वक्त बेदर्दी से आखिर काम उसका कर गया ।

---आदित्य 

कर्ज

क्षणाक्षणाला श्वास उरातुन भरतो आहे
असे कोणते कर्ज फेडण्या जगतो आहे

हात पसरुनी जगणारा नशिबाचा कैदी
भीक मागुनी रोज नव्याने मरतो आहे

सहवासाचे तेल संपले तुझे नि माझे
दिवा तरीही हृदयामधुनी जळतो आहे

सवय जाहली आहे अश्रूंना दु:खांची
उगी कोणता थेंब बरे हा रडतो आहे?

मुक्त जाहलो जरी माझिया शरीरामधुनी
तरी वाटते आहे थोडा उरतो आहे

श्रावणातल्या ओल्या प्रेमाला मुकलेला
ढगांतला पाउस कोरडा झरतो आहे

--आदित्य

Friday, March 13, 2015

आठवणींच्या कट्ट्यावरती

आठवणींच्या कट्ट्यावरती बसून येतो
हसून येतो, कधी मोकळे रडून येतो 

विझू लागता निखार जळत्या धूनीमधले
श्वास उबेचे भात्यामध्ये भरून येतो 

तुझ्या स्मृतींची पाने वाऱ्याने उलगडता 
गंध फुलांचा तिथे अचानक कुठून येतो?

जिथून गेलो सोडुन अल्लड निखळ क्षणांना
तिथेच आता  दुनियाभरचे फिरून येतो 

रोजरोजची सगळी कटकट विसरुन पुन्हा 
नव्यानेच मी स्वप्ने  गोळा करून येतो 

कणाकणाने रोज स्वत:शी मरता मरता 
क्षणात सारे  कट्ट्यावरती जगून येतो 

---आदित्य  

   

Friday, February 13, 2015

नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले


नाते अपुले दूर कुठेशी राहुन गेले
स्वप्नांमधले अर्थ नेमके पुसून गेले

तगमग देखिल उरली नाही भेटीपुरती
दोन कोरडे थेंब मात्र मुसमुसून गेले

ग्रहण कोणते, कधी लागले कळले नाही
प्रश्न मात्र कायमची हुरहुर लावुन गेले

रोप लावले होते आपण अनुरागाचे
नवी पालवी येण्यापुर्वीच मरून गेले

तुला शोधण्या माझे डोळे कितीतरीदा
अनोळखी चेहऱ्यांच्या मागे धावून गेले

चिता लागली नाही मजला जळण्यासाठी
मी विरहाच्या वणव्या मध्ये जळून गेले

---आदित्य 

Thursday, February 12, 2015

हुंदक्यांची वादळे


खोल दडलेल्या प्रतापी सागराला  जाण आता
घेतलेल्या हुंदक्यांची वादळे तू आण आता

ओढ प्रत्यंचा मनाची गर्जुदे आवाज त्याचा
थांबले आहेत भात्यातील  सारे बाण आता

पेटवोनी दे मशाली तेल घालुन आसवांचे
जाळ अंधारास आणिक सूर्य पुन्हा आण आता

प्राक्तनाला ठेव तारण, निग्रहाचे लाव तोरण
मनगटाशी तारकांचे बांधुनी संधान आता

---आदित्य 

Wednesday, February 11, 2015

झूम उठेगी शराब


हाथ लगाके देखो तुम इन प्यालोंको ये बह जाएंगे
झूम उठेगी शराब के अब होंठ आपके छू जाएंगे

नजरोंसे ही नशा दिला दो, जी जाएंगे उम्र हमारी
नजरोंसे ही जहर पिला दो, खुशी खुशी से मर जाएंगे

ख्वाब देखके रातोंको हम दिल को ये समझाते है
ख्वाबही सही, रूबरू कही, आप सामने आ जाएंगे

रिश्तोकी रंजिश मे और दुनिया की गर्दिश मे आखिर
हमे आजमाकर तो देखो, रूह छोडके आ जाएंगे

यही तमन्ना है के निकले जान आपके पहलुमे ही
इसी बहाने आसू मेरी प्रेम कहानी कह  जाएंगे

-- आदित्य

Tuesday, January 6, 2015

पाणी होऊन जगता जगता

रंग कुणाचा, ढंग कुणाचा लेउन पुरता हरवुन गेलो 
पाणी होऊन जगता जगता मर्म स्वत:चे विसरुन गेलो 
 
मल्हाराचे स्वप्न पाहुनी उत्साहाने जरी नाचलो 
थेंबा थेंबा मधून नुसते रडून निव्वळ वाहून गेलो 
 
बोलायाचे होते तेव्हा शब्द जसे विरघळून गेले 
ती गेल्यावर,गूज मनाचे स्वत:शीच मग बोलून गेलो 
 
तेढ तेवढी नाही आता समाधान मज याचे  की,
आठवणींच्या जखमांचे मी हिशोब चुकते करून गेलो. 
 
आयुष्याची नशा पुरेशी घोळून उरता रिक्त शेवटी 
उरले सुरले पेल्यामधले सत्य तेवढे रिचवून गेलो 
 
किती दाबुनी  ठेवू वादळ, दर्या  तुमच्या भिंतीमागे 
नका म्हणू मग नंतर सारे गाव बिचारे बुडवुन  गेलो !
 
---आदित्य 

Friday, November 28, 2014

भैरव

भल्या पहाटे एक सिद्ध पुरूष डोळे मिटून समाधिस्थ बसला आहे. न जणो गेली कित्येक वर्ष असा असेल.  वाढलेल्या जटा त्याच्या सिद्धतेचा पुरावा देणाऱ्या. कोरीव चेहरा, सावळा काळा रंग, भव्य कपाळ, दाढी मिशांमध्ये झाकलेल्या जखमांच्या खुणा, भक्कम शरीर त्याच्याकडे नजर खिळवून ठेवतात. गळ्यातील मुंडक्यांची माळ थोडी विचित्र भीती निर्माण करून झाते. एखादे भयंकर युद्ध खेळून येउन प्रलय, विनाश आणि संहार या त्रिशूळाला शांत करत आहे असं वाटतं.
क्षितिजाला चिरत एक वीज चमकून जाते आणि तो डोळे उघडतो. काळाच्या पलीकडे पाहणारे त्याचे ते तांबूस डोळे थेट हृदयाचा वेध घेतात . करारी पण शांत डोळे. समाधानी नजर, पण प्रलयानंतरच्या शांततेचं प्रतीक असलेली. हातात त्रिशूळ घेउन तो उभा राहतो तेव्हा अख्खी सृष्टी त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असं वाटतं. समुद्राची शांतता आणि उग्रता दोन्ही त्याच्या मूर्तीत सामावलेल्या दिसतात. त्याची पूर्व क्षितिजावर नजर जाते. जणू सूर्याला उगवायची संमती देत आहे अशी. सूर्य नारायण देखील आपली पहिली किरणे त्याच्या चरणी अर्पण करतात. आशीर्वाद देऊन, मंद स्मित करून हा सिद्ध पुरूष अंतर्धान पावतो. सृष्टीची नांदी करून गेल्यासारखा. माझे डोळे मिटतात. समाधानाने ओले होतात. अस्तित्वाला आशीर्वाद देणाऱ्या त्या सिद्ध पुरुषाला मी मनोमन वंदन करतो. सृष्टी आणि विनाशाची काळात गुम्फ़ण करणारा हा भैरव. कोटी कोटी प्रणाम.

Tuesday, November 25, 2014

वल्गना


भावनांना जिंकण्याची वल्गना करता कशाला
दोन डोळ्यांतील पाणी लपवुनी फ़िरता कशाला

केवढी नाजूक नाती बांधुनी असतात धागे
उसवुनी मुद्दाम त्यांना फसवुनी शिवता कशाला

चमकणारे चेहरे लेउन रात्री रोज ऐसे
मुखवट्या आडून सूर्याच्या पुढे लपता कशाला

अर्थ सारा संपल्यावर शब्द ना उरतोच तेथे
कागदावर फक्त शाई एवढे उरता कशाला

ठेंगणे कर्तृत्व सारे अंध नशिबाच्या समोरी
आंधळ्याने आंधळी वहिवाट मग धरता कशाला


---आदित्य

Monday, November 24, 2014

तेरे नैना

तेरे नैना छुप छुप के
जो बातें मुझसे करते हैं
छू जाती हैं दिल को लेकिन
होंठ सिले ही रहते हैं

इन आंखोकी गहराईमे
गिर जाए ना चाँद कहीं
झील के किनारोंपे देखो
तारे पहरा करते हैं

खो जाता हूं कहीं न जाने
नीली नीली झील जानने
अनजाने खाबोंके रस्ते
वहीं कहींसे गुजरते हैं

याद है मुझे शाम सुहानी
आसमानसे शरमाती थी
उसी शाम के रंग सिमटकर
जजबातोंको संवरते  हैं

कह भी दो अब आँखोसे तुम
हाँ या ना जो भी सो हो
दीदार आपका  हो जाए,
बस यही तमन्ना करते हैं


---आदित्य


 

Friday, October 31, 2014

परछाई

परछाईयों से डरता हूँ
पर उनकेही संग रहता हूँ
कभी दूरसे कभी पासमे
उनकेही संग चलता हूँ

डर जाती है अंधेरेमे
परछाई, और छुप जाती है
दिया जलाके रिश्ता अपना
और उजागर करता हूँ

शाम डूबती परछाईको
ले जाएगी दूर जहां में
वही कही वो बस जाती है
मैं एक तनहा सो जाता हूँ

सूरज की परछाई भी
खो जाती है किसी शहर में
सूरज बन के उस सूरज को
कुछ परछाई दे देता हूँ

-- आदित्य 

गाफिल


डोळ्यांदेखत मनास चोरून नेले पुरते
हृदय आजच्या इतके गाफिल कधीच नव्हते

ठोका चुकला तेव्हा कळले धोका झाला
कटात हृदयाचे धडधडणे सामील  होते

रोज स्वत:ला समजावून मी सांगत असतो
रोज नेमकी नजर तिच्या नजरेशी भिडते

कसे कळेना हुरहुर वाटे हवी हवीशी
कसे कळेना तिचेच हसणे स्वप्नी दिसते

--आदित्य
 

Tuesday, October 28, 2014

ठेच


मनास माझ्या थांबायाला सांगत नाही
ठेच लागुनी पडलो तरीही लागत नाही

वारा वादळ पिउन निघालो सूर्य गिळाया
तसे एवढ्यानेच पुरेसे भागत नाही

शब्दांना मी भावनांमध्ये म्यान करवतो
परी धार पिंजऱ्यात राहणे मानत नाही

भूक जाळण्यासाठी इंधन नकोच आता
झॊप तशी भरलेल्या पोटी लागत नाही

सावर आता जरा स्वत:ला, रोज सांगतो
तोल फक्त सांभाळुन नुसते चालत नाही

मनस्वितेची गुलाम सवयी आणिक व्यसने
उपभोगुनही बुद्धी आता बाधत नाही

--- आदित्य
 

Wednesday, October 22, 2014

दिवे लागले

मूक मनाच्या अव्यक्ताला 
अस्तित्वाचे तेज लाभले 
अंधाराच्या पणतीमध्ये 
चैतन्याचे दीप लागले 

कर्माच्या पुण्याईवरती 
लकेर आशेची अवतरली 
काळ स्मृतीतुन मागे सरला, 
तमास जाळुन तेज दाटले  

उन्मेषाची ज्योत कोवळी 
मोहक सृजनाने थरथरली 
ओंजळीतुनी जणू स्वत:च्या 
आनंदाचे अर्घ्य पाजले 

स्वर्गातुनही तारे येती 
खेळ खेळण्या पृथ्वीवरती  
खळखळते तेजामृत अवघ्या
मनी मनी उस्फूर्त वाहिले

दीप उत्सवामध्ये येथे 
प्रत्येकाची ज्योत तेवते 
हृदयामधले गीत सांगते 
दिवे लागले दिवे लागले

--- आदित्य 

Friday, October 17, 2014

तरंग


खडा टाकता पाण्यामध्ये कितीक उठती तरंग तेथे
निळे बुडबुडे सोडुन जाती भूतकाळचे तवंग तेथे

गहिऱ्या पाण्यावरती येती आणिक जाती कितीक लाटा
घेऊन येती स्वप्नांना अन ठेऊन जाती उमंग तेथे

कधी वादळे कधी उन्हाळे कधी धुक्याचे खेळ निराळे
तरी धरूनी असेल आशा आयुष्याचा पतंग तेथे

कडू तिखट ताटाचे जेवण रोज लाभते यथेच्छ येथे
परी शोधतो दोन घडीचा खाऊ थोडा खमंग तेथे

अशी कोठली शर्यत येथे पळतो आहे सदा सर्वदा
जिथे थांबतो पळता पळता उभा ठाकतो तुरुंग तेथे

अंधाराच्या वलयामध्ये नव्या नशेने पेटून उठतील
हजार डोळे, हजार जिव्हा, हजार वृत्ती सवंग तेथे


--- आदित्य

 

कधी जायचे

भविष्य केवळ रेघांमध्ये सोडुन  गेली
असी कशी आशाच निराशा करून गेली

'कधी जायचे' स्वप्नामध्ये काळ म्हणाला
'उद्या' म्हणोनी वेळ आजची मारून नेली

लाखांचीही उरली नाही फिकीर मजला
पैशांनी नात्यांची जेव्हा चिता मांडली

भले रोज मी नीटनेटका असतो तरिही 
घडी मनाची रोजरोजची विस्कटलेली

कधी वेळ सांगून का येते कोणावरती
हयात सारी वाट तिची बघण्यातच गेली


--- आदित्य

Tuesday, March 26, 2013

खबर

आज उनकी खबर ने जिंदा किया हमे
यादोंकी  गहराई में दफना  दिया हमें

कुछ तो सुकून मिला एक पलभरही सही
पलभर की ही बारिश ने गीला किया हमें

नहीं समझा सके इन आंखोकी नमी को
यही कहा दिल ने 'क्यों रुला दिया हमें?'

सहमेसे इस दिल ने अब पत्थर बनके
गीली गीली यादोंसे बस पर्दा किया हमें

----आदित्य

Saturday, March 23, 2013

वाहतो असाच मी

वाहतो असाच मी एक ओंडक्यापरी
ना प्रवाह थांबतो, हा प्रवास जोवरी

मावलो कुठेच ना, भंगलो जिथे तिथे
सांडलो कुठूनसा, वाहतो कुठेतरी

ठाव ना मला इथे मी कशास राहतो
मार्ग थांबती जिथे, थांबतो अशा घरी

एक तू पुन्हा पुन्हा तेच दान टाकतो
एक मी पुन्हा पुन्हा त्याच त्या पटावरी 

'मीच एकदा अता सोडतो कधी मला '
एवढाच काय तो प्रश्न खोल अंतरी 

-----आदित्य

Wednesday, June 27, 2012

एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
मैं  साथ नहीं रह पाऊंगा
मैं देख सकूंगा  तुझको 
लेकिन साथ नहीं दे पाऊंगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
दो आंसू  होंगे आंखोंमे
फिसल गिरेंगे गालोंपरसे
मोती बनके हाथोंमे
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
सब  मिट्टीमें मिल जायेगा
फिर उभरेगा जो पौधा
वो आसमान छू जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
जब आँखे अपनी बंद करोगे
मन की आँखे धुल जायेगी
जग उजियारा दिखलायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
हम सूरज खुदका बन जायेंगे
रोशन होंगी मंजिल अपनी
और अंधेरा मिट जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा

एक ऐसा भी दिन आयेगा
हम और नहीं गिर पायेंगे
फैलाके पंखोंको अपने
उडनाही रह जायेगा
एक ऐसा भी दिन आयेगा 
 
आदित्य 

Monday, June 25, 2012

जंगलातली गंमत

जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मासे होते झाडावर अन् उडत होत्त्या गाई
मी काय सांगू आई

वाघोबाला फुटली होती हत्ते एवढी सोंड
जिराफ होते लावून काळे कोल्होबाचे तोंड
ससे छोटूले झाले होते लांडगोबांच्या एवढे
हरणाने तर दात लावले होते केवढे केवढे
नदी रंगली होती जैसे पेनामध्ये शाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

उंटाने भर उन्हामध्ये घातला होता स्वेटर
सिंह होते हाटेलातील गरीब बिचारे वेटर
उंदीरमामा घोड्यासंगे मारत होते दुडक्या
झाडामध्ये केल्या होत्या छोटया छोटया खिडक्या
कासवदादा पळत होते कसली होती घाई
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मोठी मोठी शिंगे होती चित्ता महाशयांना
चार पाय फुटले होते अजगर महाराजांना
अस्वल होते सरपटणारे काढे मोठा फणा
माकडचाळे सोडून माकड शिकवे शहाणपणा
मगरी म्हणती मजला आता पोहता येत नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई

मला देखिल आले होते एक हिरवे शिंग
आणि होते अंगावरती काळे पांढरे रंग
आली केवढी डरकाळी मी आ करता नुसता
सारे जंगल गायब झाले हा म्हणता म्हणता
कमी येथे मजला आता कसली म्हणता नाही
जंगलात काय गंमत झाली काय सांगू आई
मी काय सांगू आई


आदित्य

दान मागतो

तुझिया चरणी ठेऊन माथा दान मागतो तुजला
दे बुद्धी, दे शक्ती, दे ज्ञान निरंतर मजला
मी दान मागतो तुजला

चराचराचा तूच विधाता
तू करुणा अन् तूचि त्राता
अखंड माया मोह प्रपाता
भवसागर हा तरावयाला वरदहस्त दे मजला
मी दान मागतो तुजला

वज्रापरी दे छाती आम्हा
खड्गाची वैखरी असू दे
शौर्याची देवता वसू दे
अंधाराचे फाटून पडदे ज्ञान मिळूदे मजला
मी दान मागतो तुजला

आदित्य

बंद कोनाडा

बंद कोनाडा कधीचा किर्र अंधारून आहे
दु:ख ज्याचे तो उराशी खोल सांभाळून आहे

पावसाशी भांडणा-या बोडक्या उघड्या घरांची
भिंत, द्वंद्वाची कहाणी अन् खुणा राखून आहे

झाड उरले काटके गाळून सारी एक पाने
हे उभे असले तरी नि:शब्द प्रेत म्हणून आहे

कोण जाणे काय होतो मागल्या जन्मी कुणाचा
वाटते की मागले काहीतरी साठून आहे

भोवतालीच्या सुखांना सांग तू, दरडाव थोडे
की म्हणावे दूर जा दु:खात मी मश्गूल आहे

आदित्य

मैत्र

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

उडू बागडू दिशात दाही
साथ आमुची सदैव राही
पुढे न मागे कुणी आमुच्या
मनमर्जीचे राजे आम्ही

खांद्यासंगे भिडवू खांदा
दिवस रात्र हा एकच धंदा
सावलीपरी दुजा संगती
लपंडाव साकारू आम्ही

कधी पायरी घसरून पडलो
चालत जाताना अडखळलो
हात पुढे सरसावून होतो
एक एक पारंबी आम्ही

भावनांतुनी विरघळताना
मनात अलगद हुरहुरताना
अवघडलेल्या शब्दांसंगे
ओझरणा-या धारा आम्ही

तरंगणा-या बेटावरती
अशी  उमलती नाजुक नाती
तुषार उडवू, फुलवत राहू
मैत्रीची कारंजी आम्ही

असे ऋतूही कधी उगवतील
उजाड रानी कोणी नसतील
तरी दाखवू दिशा दुजाला
चंद्र होऊनी नभात आम्ही

मैत्राच्या या नभांगणातुन विहंगणारे पक्षी आम्ही
कधी द-यातुन कधी ढगांतुन दुमदुमणारे नाते आम्ही

आदित्य



जिंदगी कंटाळली

वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली

झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली

ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली

सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली

आठवावी लागली म्हणतेस अपुली भेट 'जी'
एवढया गर्दीतही मी 'ती' स्मृती सांभाळली

दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली

वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली

आदित्य  

मैं रंग चुरालूं पानीका

काली बदरा जल बरसाये
बूंदोके त्योहार सजाये
इस सावन भरी कहानीका
मैं रंग चुरालूं पानीका

मन मतवाला महक उठा है
पंछी बनके चहक उठा है
गीली खुशबू और सुरोंमें
रंग भिगौके झूम उठा है

अब रंग कहां? ये ढंग बना
जिस हाथ लगा, वो संग बना
इस सावन भरी रवानी का
मैं रंग चुरालूं पानीका\


आदित्य  


 

फूल खिला है आंगन में

कोयल कूक लगायेगी और
तितली भी मंडरायेगी
फूल खिला है आंगन में
हर सांस महकसी जायेगी

हर सावन पिछला रुखा था
कुछ गीला था कुछ सूखा था
अब बारिश ऐसे आयेगी
बस खुशियाँही बरसायेगी

बूंद बूंदसे गीत गिरेगा
गीत गीत से मन झूमेगा
प्यारी बतिया लोरी बनके
किन सपनोंमें खो जायेंगी

चांद सितारे रातोंको
एक नयी कहानी लायेंगे
नन्ही कोमल एक परी
मीठीसी गुनगुन गायेगी

प्यार भरी बूंदोंकी झालर
गालोंपरसे आ फिसलेगी
नन्ही नाजुक एक कली जब
पंखुडीयोंको फैलायेगी

आदित्य

Monday, September 19, 2011

खुणा

तुझ्या पुस्तकामध्ये 
जेवढी पाने असतील
प्रत्येक पानावरती 
माझ्याच खुणा दिसतील

गहिरे कागद वाचून 
काळीज ओले होता
शब्दांच्या माझ्या चिंध्या 
डोळ्यांच्या काचा पुसतील

माझी सारी स्वप्ने 
इथे स्वत: मी पुरली
इथेच आता त्यांची 
भुते नव्याने उठतील

तुझ्या सोहळ्यासाठी 
बरेच येतील, गातील
शब्दांच्या गर्दीमध्ये 
पण अर्थ तेवढे नसतील

जखमा पुसल्या जातील 
अश्रूंच्या  टपटपण्याने 
हृदयाच्या अंधारातील 
घाव मात्र चुरचुरतील

कशास पुन्हा काढू 
तुझी जुनी ती पत्रे
स्मृती विरूनी जातील 
नि भास उशाशी उरतील

आज भले तू गेलीस 
सोडून एकटे मजला
पण माझ्या असण्यासाठी 
तुझेच क्षण हुरहुरतील

----आदित्य देवधर

Sunday, September 18, 2011

हत्या

मुक्यानेच ती जाता जाता रडून गेली
माउली तिला कशी एकटी टाकून गेली

डाव साधला ऐसा या दैवाने देखिल
कळी बिचारी फुलण्याआधीच खुडून नेली

तेजस्वी गंधाने पोटी दरवळणारी
ज्योत  देखणी पाण्यामध्ये विझून गेली

चैतन्याची धार वाहिली उगमातुन पण,
सृजनाची ती नदी कोरडी आटून गेली

गळा घोटला तिचा तिच्या जन्माच्या आधी
आमच्याच आईची जैसे हत्या केली

ती जोडून होती तुम्हास तुमची सृष्टी होऊन
नाळ तिच्या सृष्टीची का हो कापून नेली

--आदित्य देवधर

Wednesday, May 25, 2011

मोक्ष

मी:  देवाला अजूनही असं वाटत नाही कि माझं काम संपलंय?
       रोज येऊन विचारतो खरा!
तो:  अजून याला तिथेच राहुदे की संपलंय याचं काम ?
       संपलंय असं वाटतंय खरं !

मी व तो :  कधी मिळणार आहे मला मोक्ष?


----आदित्य देवधर

Friday, May 20, 2011

मायेचा हात

पडते इवले पाउल आणिक
ठसे उमटती सान कोवळे हृदयावरती
भिरभिरणारे डोळे बघता
तरळून जाते पाणी अलगद डोळ्यांपुढती

श्वास उतरती-चढती , देती
अस्फुट हुंदके थरथरत्या ओठांच्या मधुनी
साद घालती बोल बावरे
कवटाळून घेण्यास उराशी अंगावरती

नाजुक नाजुक कळीप्रमाणे
बंद कोवळी मूठ सांधती इवली बोटे
फूल उमलता मंजुळ रावे
भिरभिरती स्वप्नांना घेऊन पंखावरती

चंचल डोळे ओले बघुनी
होतो अपुला जीव कापरा कधी घाबरा
आणि पुसटसे हासू देखील
घेऊन जाते मनास अपुल्या स्वर्गावरती

किणकिणता पायांतील वाळे
नाद मनोहर कानांपाशी करिती गप्पा
उन पावसापरी बहरते
हसरी रडकी राग रागिणी हृदयाभवती

कधी खेळणे वाटे मजला
कधी लाघवी उशी शेवरी मउमऊशी
स्वप्नांतून ते रमून जाते
मायेचा मम हात ठेवता पाठीवरती


----- आदित्य देवधर

Tuesday, May 17, 2011

हसून पाहशील का

हसून पाहशील का वळून एकवार तू
भरून वाहशील का उरात प्रेमधार तू

बळे जपून ठेवले मनास कोंदणात मी
कटाक्ष एक टाकता क्षणात आरपार  तू

मधाळ हासता कधी मला खरेच भासते
नितळ चांदण्यातली झुळूक थंडगार तू

जरा कुठे विसावता तुझेच स्वप्न पाहतो
तुझ्यासवे सुखावतो, मनातला ऋतू ऋतू

जरा कुठे कधी भिडेल नेत्र दोन चारदा
क्षणात रोखुनी त्या कट्यार धारदार तू

सुरेल गाउनी करे विहंग वाहवा तुझी
वसंतही तुझ्याविना झुरे अशी बहार तू

कधी उदास वाटता, उरात भाव दाटता
उभा समोर ठाकतो, कधी मला पुकार तू

---आदित्य देवधर

याद

एक ही चेहरा हमें बस याद आये
दर्द का एहसास जब भी याद आये

भीतरी कोनेसे उठकर रो पडा गम
आँसुओ में मुस्कुराना याद आये

ढूंढ के हम थक गए दिल को हमारे
प्यार का उठता जनाज़ा याद आये

भूलके भी रात को सोते नहीं जब
ख्व़ाब को दिल से मिटाना याद आये

तरसा किये थे आपके दीदार को हम
यादको ही याद करना याद आये 

---आदित्य देवधर